कल्याणकारी योजनांच्या लाभासाठी मग्रारोहयोच्या कामगारांनी कामगार मंडळात नोंदणी करावी कामगार विभागाचे आवाहन


कल्याणकारी योजनांच्या लाभासाठी

मग्रारोहयोच्या कामगारांनी कामगार मंडळात नोंदणी करावी

कामगार विभागाचे आवाहन

        वाशिम, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध कामांचा अंतर्भाव (वृक्ष लागवड व रोपवाटिका ही कामे वगळून) इमारत व इतर बांधकाम कामाच्या व्याख्येत नमूद केलेल्या कामांमध्ये होत असल्याने या कामावर काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात करून त्यांना मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येतो.

          जिल्ह्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत एकूण 23 हजार 666 कामगारांची नोंदणी झाली आहे. सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाअंतर्गत ऑक्टोबर 2020 पासून नोंदणी, नूतनीकरण आणि विविध कल्याणकारी योजनांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले आहे. एकूण नोंदणी आतापर्यंत 11 हजार 721 कामगारांची झाली असून नुतनीकरण केलेल्या कामगारांची संख्या 3 हजार 943 व ऑनलाईन पध्दतीने एकूण 3 हजार 361 लाभार्थी कामगारांना विविध कल्याणकारी योजनेअंतर्गत लाभाचे वाटप करण्यात आले आहे. एकूण नोंदणीपैकी 5 हजार 806 एवढया कामगारांना ऑनलाइनच्या माध्यमातून ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत कामगारांना नियोजन पद्धतीने ओळखपत्रांचे वाटप करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन लाभाचे अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.

         महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत जिल्ह्यामध्ये नोंदणी केलेल्या जीवित पात्र लाभार्थ्यांना विविध कल्याणकारी योजनांच्या लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. कोविड-19 प्रादुर्भावाच्या कालावधीत नोंदीत सक्रीय बांधकाम कामगारांना लाभ देण्यात आला आहे. यामध्ये प्रथम अनुदान टप्प्याअंतर्गत प्रत्येकी 2 हजार रुपये याप्रमाणे 8 हजार 28 एवढ्या बांधकाम कामगारांना मंडळस्तरावरून लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात, दुसऱ्या अनुदान टप्प्यात प्रत्येकी 3 हजार रुपये याप्रमाणे 8 हजार 28 कामगारांना त्यांच्या बँक खात्यात अर्थसाहाय्य जमा करण्यात आले आहे. कोविड- 19 चा प्रादुर्भावाच्या कालावधीत तिसरा अनुदान टप्प्याअंतर्गत प्रत्येकी 1 हजार 500 रुपये याप्रमाणे 9 हजार 26 एवढया बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात थेट अर्थसहाय्य वाटप करण्यात आले आहे.

         जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संबंधित सर्व कामगारांनी मागील वर्षात 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केले असेल अशा कामगारांच्या नावांची यादी संबंधित विभागाचे प्राधिकृत अधिकारी यांनी प्रमाणित करून संबंधित कामगारास mahabocw.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्याबाबत कळवावे. तसेच प्रमाणित कामगारांच्या यादीची एक प्रत कामगार कल्याण अधिकारी कार्यालय येथे सादर करावी. जेणेकरून कामगारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देणे सोयीचे होईल. असे सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे यांनी कळविले आहे.

                                                                                                                                                 *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे