देशाच्या प्रगतीत ऊर्जा क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे - आमदार अमित झनक
देशाच्या प्रगतीत ऊर्जा क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे
जोगदलरी येथे “ उज्वल भारत, उज्वल भविष्य ” महोत्सव
वाशिम, दि. 27 (जिमाका) : देश स्वातंत्र्य झाला तेंव्हाची आणि आताच्या परिस्थितीमध्ये मोठा फरक आहे. वीज बचतीसोबत वीज निर्मितीत आपला देश आज आत्मनिर्भर होत आहे. यावरुन देशाच्या प्रगतीत ऊर्जा क्षेत्राचे योगदान सुध्दा महत्वाचे आहे हे लक्षात येते. असे प्रतिपादन आमदार अमित झनक यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “ उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य ” या महोत्सवाचे आयोजन मालेगाव तालुक्यातील जोगलदरी येथील काळामाथा मंदीर येथे आज 27 जुलै रोजी करण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन आमदार श्री. झनक बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव, पंचायत समिती सदस्य रंजित घुगे, महावितरण अकोलाचे मुख्य अभियंता अनिल डोये, महावितरण अकोला येथील पायाभूत सुविधाचे अधिक्षक अभियंता अनिल वाकोडे, केंद्र सरकारच्या पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे मंडळ अधिकारी पी.एस. मिश्रा, कार्यकारी अभियंता रत्नदिप तायडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे व जोगलदरीच्या सरपंच सुनिता राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. झनक म्हणाले, देश अमृत महोत्सवानिमित्त चांगल्या दिशेने जात आहे. आपण स्वावलंबनाकडे वाटचाल करीत आहोत. विजेची बचत हेच आपले दायीत्व आहे. सोलार पंपाचा चांगला वापर आज शेतकरी करीत आहे. वीज ग्राहकांना वीज व्यवस्थीत मिळाली पाहिजे, ही माफक अपेक्षा व्यक्त करुन ते पुढे म्हणाले, जिल्हयाचे अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे. जिल्हयात सिंचन प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या शेतीला योग्यवेळी वीज उपलब्ध झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
श्री. पवार म्हणाले, मागील आठ वर्षात ऊर्जा क्षेत्रात देशाने मोठी प्रगती केली आहे. ऊर्जा क्षेत्रात केलेल्या विविध उपाययोजनांमुळे जनतेला शाश्वत वीज पुरवठा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. डोये म्हणाले, मागील आठ वर्षात केंद्र सरकारने उर्जा क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा उत्सव या कार्यक्रमातून साजरा करण्यात येत आहे. वाशिम जिल्हयात मागील 5 वर्षात उर्जा विकासावर 265 कोटी रुपये खर्च केले आहे. ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा वेळेवर करुन महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महावितरणचे वाशिम येथील अधिकारी गणेश चव्हाण आणि मोहन वाघमारे यांनी देशभक्ती गीत सादर केले. उर्जा क्षेत्राच्या प्रगतीवर विविध प्रकारच्या ध्वनी चित्रफिती यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आल्या. वाशिमच्या बालकीवाल विद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक श्री. काळे यांच्या मार्गदर्शनात विजेचे महत्व सांगणारे पथनाटय सादर केले. किन्हीराजा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थीनींनी आदिवासी ढेमसा नृत्य सादर केले.
या कार्यक्रमात संजय निमकर, संतोष वाडले, वासुदेव अवचार, श्रीमती सोनू खरात या लाभार्थी वीज ग्राहकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी या लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला मालेगाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक अभियंता पंकज माळी यांनी केले. आभार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे यांनी मानले.
Comments
Post a Comment