जास्तीत जास्त असंघटीत कामगारांची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश



जास्तीत जास्त असंघटीत कामगारांची

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

       वाशिम, दि. 13 (जिमाका) : जिल्हयातील असंघटीत कामगारांना भविष्यात विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळावा, या दृष्टीने जास्तीत जास्त असंघटीत कामगारांची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.

          आज 13 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीची सभा श्री. षण्मुगराजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, समितीचे सचिव सरकारी कामगार अधिकारी गौरव नालींदे, सदस्य शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचे प्रतिनिधी उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे प्रतिनिधी उपशिक्षणाधिकारी आकाश आहाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी डॉ. अमोल धंदर, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे प्रतिनिधी डॉ. लक्ष्मीकांत राठोड, सहायक मत्स्य विकास अधिकारी ए.व्ही. जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे प्रतिनिधी भागवत डोईफोडे, वाशिम गट विकास अधिकारी प्रमोद बदरखे, समाज कल्याण निरीक्षक आर.ए. शिरभाते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे प्रतिनिधी सुजय पगार, सहायक लागवड अधिकारी एस. यू. सानप व चाईल्ड लाईनचे शाहीद खान यांची उपस्थिती होती.

          श्री. षण्मुगराजन म्हणाले, असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टलचे 26 ऑगस्ट 2021 रोजी उदघाटन करण्यात आले. असंघटीत कामगारांकरीता सामाजिक सुरक्षा योजना हया राष्ट्रीय डाटाबेसच्या आधारावर अंमलात आणल्या जाणार आहे. नोंदणीकृत कामगारांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा एका वर्षाचा 12 रुपये वार्षिक हप्ता केंद्र सरकार भरणार आहे. जिल्हयातील असंघटीत कामगारांची ई-श्रम पोर्टलवरील नोंदणी प्रक्रीया गतीमान करण्यात यावी. असे ते यावेळी म्हणाले.

          श्री. नालींदे यांनी असंघटीत कामगारांच्या ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीबाबतची माहिती यावेळी दिली. 16 ते 59 वर्ष वयोगटातील असंघटीत कामगाराला ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करता येते. तो आयकर भरणारा नसावा. भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा निगमचा तो सदस्य नसावा. जिल्हयात 25 ऑक्टोबर 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 दरम्यान बाजार भरत असलेली मोठी गांवे, तालुका आणि शहरातील बाजारपेठेत विशेष नोंदणी शिबीर घेण्यात आले. 1 जानेवारी 2022 ते 30 जून 2022 या कालावधीत जिल्हयातील 1 लाख 8 हजार 623 असंघटीत कामगारांची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यात आली. जिल्हयातील विटभट्टयांवर काम करणाऱ्या कामगारांची या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी तहसिलदार यांना विटभट्टी आस्थापनांची माहिती मागण्यात आल्याचे श्री. नालींदे यांनी सांगितले.  

                                                                                                                                       *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे