जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पोक्रा प्रकल्पाचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पोक्रा प्रकल्पाचा आढावा

    वाशिम, दि. ०५ (जिमाका) : जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) विविध योजनांचा आढावा जिल्हाधिकारी तथा जिल्हा समन्वय समीतीचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी ४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित सभेत घेतला. यावेळी जिल्हा समन्वय समीती सहअध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा जिल्हा समन्वय समितीचे सदस्य सचिव शंकर तोटावार यांची प्रमुख उपस्थिती होती.

        या सभेत योजनानिहाय राज्यस्तरावरील उपविभागनिहाय देण्यात आलेल्या गुणांकनावर चर्चा करण्यात आली. राज्यातील 36 उपविभागामध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु आहे. राज्यस्तरावर गुणानुक्रमे वाशिम उपविभागाचा रॅंक 5 व्या क्रमांकावर आहे. पोक्रा प्रकल्पाच्या व्यक्तीगत लाभाचे घटक व प्रशिक्षण या घटकामध्ये सुधारणा केल्यास आपला उपविभाग वरच्या क्रमांकावर येऊ शकतो, त्यासाठी वरील घटकांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. तसेच व्यक्तीगत लाभाच्या घटकांची मानोरा, मालेगाव, मंगरूळपीर या तालुक्याची प्रगती समाधानकारक नसल्याने त्यासाठी पूर्वसंमती प्राप्त शेतकरी व शेतीविषयक साहित्य पुरवठादारांची एकत्रित कार्यशाळा घेण्याची सूचना उपस्थित सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 

        शेतकऱ्यांना प्रकल्पाअंतर्गत व्यक्तीगत लाभ देण्यासाठी पोक्रा प्रकल्पातील गावातील 5 हेक्टर पर्यंतच्या पात्र लाभार्थ्याची संख्या 40 हजार 515 असून 33 हजार 939 शेतकऱ्याची डिबीटी पोर्टलवर नोंदणी केली आहे. नोंदणीची टक्केवारी 83.77 टक्के इतकी आहे. पुढील एका महिन्यात 90 टक्के पात्र लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करावी असे जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यावेळी म्हणाले.

        डिबीटी पोर्टलवर व्यक्तीगत लाभाचे 34 हजार 648 पात्र अर्ज प्राप्त झाले असून आजपर्यंत 20 हजार 918 अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली आहे. पूर्वसंमती दिलेल्या 11 हजार 808 लाभार्थ्यांनी विविध साहित्य खरेदी केलेले आहे. संबधीत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 29 कोटी 99 लक्ष रुपये अनुदान जमा केले आहे.  डिबीटी पोर्टलवर त्रृटीमधील अर्ज विविध स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित ठेवलेली आहेत. संबधीत लाभार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पुढील आठ दिवसाचा कालावधी दयावा व त्यानंतर या अर्जांवर निर्णय घ्यावा. विविध स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे ऑनलाईन डिबीटी पोर्टलवर प्रलंबीत असलेले अर्जही पुढील आठ दिवसात निकाली काढावेत. अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

        जिल्हयात मृद व जलसंधारणाची एकूण 3498 कामे आराखड्यामध्ये प्रस्तावित करण्यात आलेली आहे. त्यापैकी 682 कामांना तांत्रिक मंजूरी दिलेली आहे. 623 कामांच्या ई-निविदा काढण्यात आलेल्या आहेत. 584 कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहे त्यापैकी 329 कामे पूर्ण झालेली आहेत. पूर्ण झालेल्या कामापैकी 175 कामांचे संबधीत कंत्राटदारांचे 3 कोटी 63 लक्ष रुपयांची देयके अदा करण्यात आलेली आहेत. उर्वरीत झालेल्या कामांची देयके एनआरएम पोर्टलवर संबधीत कर्मचाऱ्यांनी अपलोड न केल्यामुळे संबधीत कंत्राटदारांची देयके अदा करता आलेली नाहीत. पुढील 7 दिवसात झालेल्या कामांची देयके ऑनलाईन अपलोड करण्याबाबत व तांत्रिक मंजूरी प्राप्त कामे सुरु करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांनी यावेळी दिले.

        पोक्रा प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी/गट यांच्या मार्फत डिबीटी पोर्टलवर विविध उद्योगांचे 238 प्रस्ताव प्राप्त झाले आहे. त्यापैकी 134 उद्योगांचे काम पूर्ण झालेले आहे. 105 उद्योगांना 9 कोटी 77 लक्ष रुपये अनुदान संबधीतांच्या बँक खात्यावर वितरीत करण्यात आले आहे. शेतकरी उत्पादक कंपनी/गटांना मोठ्या प्रमाणात उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन द्यावे व मोठ्या प्रमाणात उद्योग जिल्हामध्ये उभारावेत. पोक्रा प्रकल्पातील गावांमधील शेती शाळेमध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात करावा. व्यक्तीगत लाभाचे घटक जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खरेदी करावेत. यासाठी प्रकल्पातील कृषी विभागाच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात योजनांचा प्रचार प्रसार करावा. मृद व जलसंधारणाची प्रस्तावित कामे विहीत मुदतीत पूर्ण करावीत. असेही श्री. षण्मुगराजन यावेळी म्हणाले.

        या सभेला पोक्रा प्रकल्पाच्या जिल्हा समन्वय समीतीचे सदस्य पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. गणेश पवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधिक्षक पी. टी. सरकटे, राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. भारत गिते, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार, उपविभागीय कृषी अधिकारी निलेश ठोंबरे, लेखाधिकारी प्रशांत पुंडे, प्रकल्प कृषी विशेषज्ञ मिलिंद अरगडे तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व कृषी पर्यवेक्षक उपस्थित होते.

        सभेत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. तोटावार यांनी सादरीकरण केले. या सभेच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प विशेषज्ञ (मनुष्यबळ विकास) विश्वजित पाथरकर, प्रकल्प विशेषज्ञ (कृषी व्यवसाय) ज्ञानेश्वर बुधवंत, प्रकल्प सहाय्यक राजकुमार खिल्लारी, प्रकल्प लेखा सहाय्यक राजेश बनचरे, राजेश कोकाटे, धीरेंद्र देवहंस व अविनाश चिल्लोरे यांनी परिश्रम घेतले.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे