शेतामध्ये साचलेल्या पाण्यापासून पिकांचे संरक्षण करा कृषी विभागाचे आवाहन



शेतामध्ये साचलेल्या पाण्यापासून

पिकांचे संरक्षण करा

कृषी विभागाचे आवाहन

       वाशिम, दि. 14 (जिमाका) : जिल्हयात खरीप पिकाच्या पेरण्या पूर्ण होऊन उगवण सुध्दा चांगली झाली आहे. जिल्हयातील ४६ राजस्व मंडळापैकी ५ मंडळामध्ये १३ जुलै रोजी व १६ मंडळामध्ये १४ जुलै रोजी अतिवृष्टी झाली आहे. १३ जुलै रोजी ५०.३ मि.मी. व १४ जुलै रोजी ५७.० मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. खरीप २०२२-२३ च्या हंगामात जिल्हयातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली घरगूती सोयाबीन बियाणे वापर, बिजप्रक्रिया करुन योग्य खोलीवर पेरणी केली. अंदाजे ३० ते ३५ टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीकरीता बीबीएफ यंत्र, सरी वरंब्यावर टोकण पध्दतीने लागवड तसेच बेडवर टोकण यंत्राद्वारे पेरणी करणे या बाबींचा अवलंब केल्यामुळे मागील चार दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसाचे पाणी सरीमध्ये जमा होऊन शेताबाहेर काढण्यास मदत झाली. पिकांच्या साचलेल्या पाण्याशी संपर्क न आल्यामुळे पीक परिस्थिती उत्तम आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी साध्या पेरणी यंत्राद्वारे पेरणी केलेल्या ठिकाणी पाणथळ जमीनीत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. साचलेल्या पाण्यामध्ये पिकांचे मुळाद्वारे श्वसनक्रिया मंदावते व पिकाला अन्नद्रव्य घेता येत नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटते. सोयाबीन व तुर या सारख्या पिकात मर रोग होण्याचा संभव आहे.

          शेतात साचलेले पाणी लवकर शेताबाहेर कसे काढता येईल याची उपाययोजना करावी. वापसा येताच आंतरमशागतीची कामे करून घ्यावी. ज्या शेतकऱ्यांनी साध्या पेरणी यंत्राद्वारे पेरणी केली आहे, अशा शेतकऱ्यांनी वापसा आल्यानंतर दर सहा ओळीनंतर डवऱ्याच्या जाणकुडाला दोरी गुंडाळून मृत सरी काढूण घ्यावी, कारण मागील तीन वर्षामध्ये ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे पिकाचे नुकसान झालेले आहे. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी मृत सरी काढून घेतल्यास पडलेल्या पावसाचे पाणी सरीद्वारे शेताबाहेर निघुन जाईल व पिकाचे नुकसान टाळता येईल. तरी सर्व शेतकरी बांधवांनी सोयाबीन व तुर या पिकामध्ये ७२ तासापेक्षा जास्त पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी कळविले आहे

                                                                                                                                       *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे