मतदार ओळखपत्राला आधार लिंकसाठी १ ऑगस्टपासून विशेष मोहिम


मतदार ओळखपत्राला आधार लिंकसाठी

१ ऑगस्टपासून विशेष मोहिम

·        मतदार ओळखपत्राचे आधार क्रमांकाशी जोडणी करा

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

    वाशिम, दि. 29 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांच्यावतीने निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम, २०२१ अन्वये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० मध्ये सुधारणा केल्या आहेत. यामध्ये कलम २३ नुसार मतदार याद्यातील तपशिलाशी जोडण्याकरीता आणि प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छीकपणे आधारची माहिती संग्रहीत करण्याबाबतच्या सुधारणा अंतर्भूत आहेत. त्याआधारे मतदार नोंदणी नियम, १९६० मधील नियम 26 बी मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणाची अंमलबजावणी ०१ ऑगस्ट २०२२ पासून लागू होणार आहे. कायदा आणि नियमामध्ये केलेल्या सुधारणानंतर मतदार नोंदणी अधिकारी हे मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तींकडून विहीत स्वरुपात आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आलेले आहेत. अधिसूचना १७ जुन २०२२ मध्ये निर्दीष्ट केल्यानुसार ०१ एप्रिल २०२३ पर्यंत किंवा त्यापूर्वी मतदार यादीत आलेली व्यक्ती यांचा आधार क्रमांक उपलब्ध करुन देऊ शकतो. यानुसार भारत निवडणूक आयोगाच्या कालबध्द पध्दतीने मतदारांकडून आधार क्रमांक प्राप्त करुन घेण्यासाठीचा कार्यक्रम सुरु करण्याचे निश्चित केले आहे.

        मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांचा आधार क्रमांक भरण्यासाठी नमुना अर्ज ६-ब तयार करण्यात आला आहे. अर्ज क्रमांक ६-ब हा भारत निवडणूक आयोगाच्या (eci.gov.in) आणि मुख्य निवडणूक आयोगाच्या (https://ceoelection.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मतदारांना ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्रमांक ६-ब हा ERO Net, GARUDA, NVSP, VHA माध्यमांवर देखील उपलब्ध आहे. अर्ज ६-ब छापील प्रती देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एकाच व्यक्तीचे विविध ठिकाणी मतदार यादीत नांव असते त्याचा मतदानाच्या टक्केवारीवरही परिणाम होतो. त्यामुळे अशी नावे ओळखून कोणत्याही एकाच मतदार संघातील मतदार यादीत नाव कायम ठेवता यावे या उद्देशाने आता मतदारकार्ड सोबत आधार क्रमांक लिंक केला जाणार आहे. जिल्हयात ०१ ऑगस्टपासून ही मोहिम व्यापक प्रमाणात राबविण्यात येणार आहे.

        आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांना ऐच्छीक आहे. अर्ज क्रमांक ६-ब बिएलओ यांचे मार्फतही घरोघरी भेटी देऊन गोळा करण्यात येणार आहे. विशेष शिबीराच्या आयोजनामधुनही अर्ज क्रमांक 6-ब जमा करण्यात येणार आहे. मतदारांकडे आधार क्रमांक नसल्यास अर्ज क्रमांक ६- ब मध्ये दर्शविलेल्या ११ पर्यायी कागदपत्रांपैकी एक कागदपत्र सादर करता येईल. उदा. मनरेगा जॉबकार्ड, बँक अथवा पोस्ट ऑफीस कार्यालयाकडून निर्गमित केलेले फोटोसहीत पासबुक, आरोग्य विमा स्मार्टकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, पॅनकार्ड, एनपीआर अंतर्गत आरबीआयमार्फत वितरीत केलेले स्मार्टकार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसहीत पेन्शन कागदपत्रे, केंद्र व राज्य शासन कर्मचाऱ्यांचे छायाचित्रासह ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र इत्यादी मतदार यादीशी आधार क्रमांकाची जोडणी करणे ऐच्छीक आहे. केवळ आधार क्रमांक सादर करण्यास असमर्थतेमुळे मतदार यादीतून नाव काढले जाऊ शकत नाही. तरी मतदार यादीतील नावाशी ०१ ऑगस्ट २०२२ पासून मोठया संख्येने आधार क्रमांकाची जोडणी करुन घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

                                                                                                                           *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे