वाशिमच्या सुंदर वाटिकेत आपला दवाखाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन


वाशिमच्या सुंदर वाटिकेत आपला दवाखाना

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन 

वाशिम दि.१(जिमाका) आज १ मे रोजी महाराष्ट्र स्थापना दिनी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत वाशिम शहरातील सुंदर वाटिका भागात सुरू करण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले.
            सुंदर वाटीका येथे सुरू करण्यात आलेल्या आपला दवाखानाची आमदार लखन मलिक यांनी आयोजित कार्यक्रमात फीत कापून उद्घाटन केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विजय काळबांडे व प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
         आमदार मलिक यावेळी म्हणाले,आपला दवाखाना हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.शहरी भागातील दाटीवाटीने वसलेल्या भागांपासून तसेच झोपडपट्टी वस्त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना या दवाखान्यात चांगल्या आरोग्याच्या सेवा मिळण्यास मदत होणार आहे. तेव्हा शहरी भागातील रुग्णांनी आपला दवाखान्यातून मिळणाऱ्या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा.असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. 
            यावेळी डॉ.श्रीमती देशमुख यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाअंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवा सुविधाबाबतची विस्तृत माहिती दिली.या दवाखान्यात दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत बाह्य रुग्णसेवा,मोफत औषधोपचार,मोफत तपासणी,टेलीकन्सल्टेशन,गर्भवती मातांची तपासणी व लसीकरण करण्यात येणार आहे.
            महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी,बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणी,मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन व आवश्यकतेनुसार विशेषतज्ञ संदर्भ सेवा देण्यात येणार आहे.तसेच फिजिशियन,बालरोगतज्ञ नेत्ररोगतज्ञ,त्वचारोगतज्ञ,मानसोपचार तज्ञ आणि नाक,कान,घसा तज्ञांच्या सेवा देण्यात येतील.हे तज्ञ सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत उपलब्ध असतील.कामगार वर्ग कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना या सेवांचा लाभ घेता येईल तसेच गरजेनुसार अतिरिक्त सेवा आपला दवाखान्यात वाढविण्यात येणार असल्याची माहिती डॉ.श्रीमती देशमुख यांनी दिली.
          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा चव्हाण,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. ज्ञानेश्वर ससे,नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी दिगंबर ढोले ,सुंदर वाटिका येथील आपला दवाखानाचे वैद्यकीय अधिकारी सुशील खुळे ,साथरोग अधिकारी विरु मनवर तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. 
              कार्यक्रमाला आरोग्य विभागातील अधिकारी - कर्मचारी, नागरिक,आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार काटा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय काळे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे