आला उन्हाळा आरोग्य सांभाळा उष्मालाटेपासून बचावासाठी घ्यावयाची दक्षता




आला उन्हाळा आरोग्य सांभाळा

उष्मालाटेपासून बचावासाठी घ्यावयाची दक्षता

       वाशिम, दि. 16 (जिमाका) : मे २०२३ पासून ते जुन २०२३ पर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. उष्माघातामुळे होणारे मृत्य टाळण्याकरीता व उष्माघात होऊ नये याकरीता करावे व काय करु नये. याबाबतची जनजागृती प्रत्येक गावामध्ये स्थानिक वैद्यकीय अधिकारी व सामुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती यांच्यामार्फत आरोग्य शिक्षण देऊन स्थानिक लोकांचा सहभाग घेऊन आरोग्य शिक्षणाव्दारे जनजागृती करण्यात येत आहे.

         प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर उष्माघात वातानुकुलीत कक्ष स्थापन करुन त्यामध्ये २ बेड, कुलर, पंखा तसेच लागणारा औषधीसह अद्यावत ठेवण्यात आलेला आहे, सतत तापमानात होणाऱ्या वाढीमूळे उष्माघात लागण व मृत्युची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता. उष्माघाताबाबत घ्यावयाची खबरदारी व उष्माघातापासून होणारे संभाव्य मृत्यु कसे टाळता येतील याबाबत व उष्माघाताची चिन्हे, लक्षणे तसेच त्यावर करावयाच्या उपाययोजनेबाबत जनतेस सविस्तर मार्गदर्शन आरोग्य शिक्षण प्रचार व प्रसिध्दी (आयईसी) प्रत्येक घरातील कुटूंबातील व्यक्तींना प्रत्यक्ष भेट देऊन प्रचार व प्रसिध्दी साहित्य वाचून दाखवून उष्माघात होऊ नये याबाबत घ्यावयाची खबरदारी व आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे.

         उन्हाळयामध्ये नागरीकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता पुढीलप्रमाणे आहे. पूरेसे पाणी प्यावे. तहान लागली नसली तरीही दर अर्ध्यातासाच्या अंतराने पाणी प्यावे. घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपी व पांढरा शेला/दुपट्टयाचा वापर करावा. सुर्य प्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पड़दे आणि झडपांचा वापर करावा. उष्णतेच्या लाटेची माहिती जाणून घेण्यासाठी रेडीओ, टिव्ही किंवा वर्तमानपत्राचा वापर करण्यात यावा. हलके पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत. प्रवासात व कामाच्या ठिकाणी मुबलक थंड पिण्याचे पाणी सोबत ठेवावे व जवळच व्यवस्था करावी. ऊन्हात काम करणे टाळावे. टोपी, शेला, छत्री किंवा ओल्या कपडयाने डोके, मान व चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस घरगुती उपाय लिंबुपाणी, ताक, लस्सी प्यावे. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ईत्यादी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

        गुरांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच त्यांना पूरेसे पाणी पिण्यास दयावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे शटर व सनसेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघडया ठेवाव्यात. घरामध्ये कुलर व पंख्यांचा वापर करावा. सुर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कारखाना व उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना सूचना दयाव्यात. गरोदर स्त्रिया व आजारी कामगार यांची अधिक काळजी घ्यावी. पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.

          उन्हाळयामध्ये नागरीकांनी उष्मालाटेपासुन बचाव होण्याच्या दृष्टीने काय करू नये याबाबत पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी. दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान घराबाहेर पडू नये. शक्यतो बाहेर जाणे टाळावे. दारु, चहा, कॉफी आाणि कार्बोनेट थंड पेय पिऊ नये. ऊन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करणे टाळावे. स्वयंपाक घराच्या दारे खिडक्या उघडया ठेवाव्यात. लहान मुले अथवा पाळीव प्राणी यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. उच्च प्रथिनयूक्त व शिळे अन्न खाणे टाळावे. गडद घट्ट व जाड कपडे अंगात घालणे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास किंवा ऊन्हात कष्टाची शारीरिक श्रमाची काम करणे टाळावे. अशाप्रकारे उन्हाळयामध्ये नागरीकांनी उष्मालाटेपासुन बचाव होण्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे