आयआयटी मुंबईकडून मिळणार आरोग्यविषयक प्रशिक्षण




आयआयटी मुंबईकडून मिळणार

आरोग्यविषयक प्रशिक्षण

       वाशिम, दि. 30 (जिमाका) : जिल्हयात उपलब्ध संसाधनातून संपन्न आरोग्यकरीता प्रशिक्षण या योजनेतंर्गत भारतीय प्राद्यौगिक संस्था मुंबई अर्थात आयआयटी यांच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. या योजनेकरीता जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या प्रयत्नातुन मानव विकास कार्यक्रमातून निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे संनियंत्रणाखाली ही योजना राबविण्यात येत आहे.

         जिल्हयातील कमी वजनाची बालके, कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागातंर्गत विशेष प्रयत्न केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाअंतर्गत जिल्हयातील वैद्यकिय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व इतर संबंधित कर्मचारी यांचा समावेश आहे. या प्रशिक्षणासाठी अधिकारी व कर्मचारी यांची दोन टप्प्यांमध्ये निवड चाचणी होणार आहे. त्यापैकी उत्कृष्ट ३०० कर्मचारी यांची प्रशिक्षक म्हणून निवड केली जाईल. निवडण्यात आलेल्या ३०० कर्मचाऱ्यांना आयआयटी मुंबई हे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणार आहे.

            हे प्रशिक्षक प्रशिक्षणानंतर जिल्हयातील इतर अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षीत करणार आहेत. निवड चाचणीचा पहिला टप्पा पुर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवड चाचणीकरीता अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षणाबाबतचे व्हिडीओ दाखवून प्रशिक्षीत करण्यात येत आहे. जिल्हयात दुर्बल घटकातील महिला व नागरीकांमध्ये अपुऱ्या अन्नाचे स्त्रोत व पोषणविषयक असलेल्या अज्ञानामुळे बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचबरोबर गरोदर व स्तनदा माता यांना आहाराबद्दल पुरेशी माहिती नसल्यामूळे कमी वजनाची बालके जन्माला येतात व अशा बालकांमधील मृत्युचे प्रमाण जास्त असते. या प्रशिक्षणाव्दारे दुर्बल घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचवून बालकांच्या पोषणाबाबत जागृती निर्माण करुन बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल तसेच कमी वजनाच्या बालकांचे जन्माचे प्रमाण निश्चित कमी करण्यास देखील मदत होईल. या प्रशिक्षणाचा उपयोग दुर्बल घटकातील बालकांच्या व या पुढच्या पिढीचे जीवनमान निरोगी राखण्यासाठी होईल. प्रशिक्षणाव्दारे मातामृत्यु दर कमी करणे तसेच नवजात शिशु आणि ५ वर्षाखालील बालकांचे टाळता येण्याजोगे मृत्यु थाबविता येतील.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे