आपत्तीवर मात करण्यासाठीयंत्रणांनी सज्ज राहावे - षण्मुगराजन एस. मान्सूनपूर्व आढावा सभा
- Get link
- X
- Other Apps
आपत्तीवर मात करण्यासाठी
यंत्रणांनी सज्ज राहावे
- षण्मुगराजन एस.
मान्सूनपूर्व आढावा सभा
वाशिम, दि. 02 (जिमाका) : पावसाळ्याच्या दिवसात येणाऱ्या आपत्तीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे.असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी दिले.
आज 2 मे रोजी मान्सूनपूर्व तयारीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हाधिकारी श्री.षन्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.यावेळी ते बोलत होते.सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार व निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.षन्मुगराजन म्हणाले, पावसाळ्याच्या दिवसात संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात धान्य पुरवठा करतांना या गावांना तीन महिन्याचे धान्य उपलब्ध करुन द्यावे.जलसंधारण विभागाच्या प्रकल्पाचे स्ट्रक्चर सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित विभागाने करावी.विजेला अटकाव करणारी यंत्र सुस्थितीत असावी.शहरी भागातील नाले सफाई त्वरित करण्यात यावी. त्यामुळे शहरी भागातील वस्तीत पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचणार नाही.शहरी भागातील धोकादायक इमारती व झाडांची पाहणी करुन योग्य ती कार्यवाही करावी.पाटबंधारे व जलसंपदा विभागाने आपल्या प्रकल्पावर बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वीत करुन सूचना फलक लावावे.असे त्यांनी सांगितले.
पावसाळ्याच्या दिवसात आरोग्य विभागाने विशेष सतर्क राहावे असे सांगून श्री.षन्मुगराजन म्हणाले, जलजन्य आजाराला आळा घालण्यासाठी आवश्यक तेवढा औषधीसाठा प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात उपलब्ध असावा.साथीच्या रोगाबाबत तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करावी.नियंत्रण कक्ष स्थापन करुन आरोग्य पथके सज्ज ठेवावी.वीज वितरण कंपनीने वाकलेले पोल व तारेवरच्या झाडांच्या फांद्या वेळीच तोडाव्यात.दुरुस्ती पथके तैनात करावी.रस्त्यावरील धोकादायक वाळलेली झाडे तोडणे,पीकाच्या नुकसानीचे मोजमाप करण्यासाठी तसेच दूरसंचार व्यवस्था या काळात खंडीत होणार नाही याची दक्षता घेवून संबंधित विभागाने आपली जबाबदारी पार पाडावी.असे श्री. षन्मुगराजन यावेळी म्हणाले.
शोध व बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी, असे सांगून श्री षन्मुगराजन म्हणाले, ज्या गावांना व शहरातील वार्डाना अतिवृष्टीचा धोका पोहचू शकतो, अशा ठिकाणची नालेसफाई तातडीने करण्यात यावी.तालुका नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवून तेथील दूरध्वनी सुरु असल्याची खात्री करावी. तालुकास्तरावर या काळात सेवाभावी संस्थांची मदत घेण्यासाठी त्याच्या संपर्कात राहावे.अतिवृष्टीमुळे गावात गावतलावाचे पाणी येणार नाही यासाठी गावपातळीवर उपाययोजना करण्याचे काम गट विकास अधिकारी यांनी करावे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मान्सूनपूर्व तयारीची माहिती श्री.हिंगे यांनी दिली.जून ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत जिल्ह्यात ८४५.०९ मि.मी असा १०७.२ टक्के पाऊस झाला.जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्याच्या वेढयामुळे वाशिम तालुक्यातील उकळीपेन आणि रिसोड तालुक्यातील बाळखेड,पेनबोरी व चिचांबापेन आणि नाल्याला येणाऱ्या पुरामुळे मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा (खु) या गावाचा नेहमी संपर्क तुटतो.नदी व अतिवृष्टीमुळे १५४ गावे व वार्डांना धोका पोहचतो.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून शोध व बचाव पथकासाठी तालुकानिहाय उपलब्ध असलेल्या साहित्याची माहिती यावेळी श्री. हिंगे यांनी दिली.
या सभेला कारंजा उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्यंकट मिठ्ठेवाड, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष आकोसकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपकार्यकारी अभियंता नीलेश राठोड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे प्रतिनिधी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, सर्व तहसिलदार, सर्व गट विकास अधिकारी व नगरपरिषद/नगरपंचायतचे मुख्याधिकारी व सेवाभावी संस्थेचे श्याम सवाई व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांची उपस्थिती होती.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment