मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

*गेटवे ऑफ इंडिया येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव दिमाखात साजरा*

          मुंबई, दि. १४ : मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे) ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ही घोषणा केली.

      या महोत्सवाला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आरोग्य मंत्री प्रा. डॅा.तानाजी सावंत, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार यामिनी जाधव, राजमाता जिजाऊ यांचे वंशज विजयराव जाधव, संयोजक व्यासपीठावर उपस्थित होते.

 *गड, किल्ल्यांच्या जतन,संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध*
         मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य, बलिदान नव्या पिढीला दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. राज्यातील गड, किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतिस्थळ वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही जागांचा विकास आराखडा राबविण्यात येत आहे. हा ऐतिहासिक ठेवा येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे. मुंबईतील कोस्टल हायवे परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा उभारला जाईल. मराठा समाज बांधवांना सर्व सोयीसुविधा देण्याची जबाबदारी राज्य शासनाची असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

*छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य करणार*
         छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मुंबईतल्या गेटवे ॲाफ इंडिया येथे पहिल्यांदाच साजरी होतेय याचा आनंद आहे. महोत्सवाच्या माध्यमातून त्यांचे स्मरण प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक असून शिवशंभुरायांचे कार्य, योगदान जतन करणे ही आनंदाची बाब आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव देशभरात पोहचवला जाईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य करण्याची तयारी देखील राज्य शासन करित असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. 
         यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
                  ००००

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे