जलयुक्त शिवार अभियानातजिल्हयातील 166 गावांची निवड· टंचाई परिस्थीतीवर होणार मात· कृषी क्षेत्रासाठी होणार सिंचनाची सुविधा· अभियानात लोकसहभागावर भर


जलयुक्त शिवार अभियानात

जिल्हयातील 166 गावांची निवड

·        टंचाई परिस्थीतीवर होणार मात

·        कृषी क्षेत्रासाठी होणार सिंचनाची सुविधा

·        अभियानात लोकसहभागावर भर

       वाशिम, दि. 11 (जिमाका) : पिक वाढीच्या काळातच पावसाची अनियमितता आणि पावसाचा खंड यामुळे टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होते. याचा परिणाम कृषी क्षेत्रावर होतो. पावसाची अनिश्चितता लक्षात घेवून ज्या गावांमध्ये जलसंधारणासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अर्थात एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा प्रकल्प राबविण्यात येत आहे अशा जिल्हयातील 166 गावांची निवड जलयुक्त शिवार अभियान - 2.0 राबविण्यासाठी यावर्षी करण्यात आली आहे. यामध्ये वाशिम तालुका- 26, रिसोड तालुका- 21, मालेगांव तालुका- 28, मंगरुळपीर तालुका- 23, मानोरा तालुका- 33 आणि कारंजा तालुक्यातील 35 गावांचा समावेश आहे.

          166 गावांच्या शाश्वत विकासासाठी जलसंधारणाचे यापूर्वी झालेल्या कामांची देखभाल दुरुस्ती करणे, मुलस्थानी जलसंधारणाचे उपचार करणे, सुक्ष्म सिंचनाचा वापर वाढविण्यासोबतच पाण्याच्या ताळेबंदाच्या माध्यमातून जलसाक्षरता वाढविण्याच्या उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या गावांच्या शाश्वत विकासाला हातभार लागण्यास जलयुक्त शिवार अभियानाची मदत होणार आहे.

          जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी संरक्षित करण्यास, विकेंद्रीत जलसाठे निर्माण करुन पिकांसाठी संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण होण्यास मदत होणार आहे. मृद व जलसंधारणाची ही कामे लोकसहभागातून करण्यात येणार आहे. गावाच्या पाण्याच्या अंदाजपत्रकामध्ये गावातील पिण्याच्या पाण्याची गरज, शेतीसाठी लागणारे पाणी व जनावरांसाठी लागणारे पाणी विचारात घेतले जाणार आहे. पाणलोटामध्ये उपलब्ध पाणी, वाहून जाणाऱ्या पाण्यामधून किती पाणी अडविले आणि किती पाणी अडवू शकतो याबाबी ताळेबंद करतांना विचारात घेण्यात येतील. या अभियानात पाणलोट हा नियोजनाचा केंद्र बिंदू राहील. माथा ते पायथा या तत्वावर कामे हाती घेण्यात येतील.

          अपुर्ण/ प्रगतीपथावरील कामे, क्षमता पुन:स्थापीत करण्याबाबतची दुरुस्ती व नुतनीकरणाची, क्षेत्र उपचार, नाला उपचार, लोकसहभागाची/सार्वजनिक खाजगी भागीदारातील कामांना प्राधान्य देण्यात येईल. जलसाक्षरतेबाबत संबंधित गावातील सरपंच/ महिला प्रतिनिधी/ ग्रामकार्यकर्ता/शेतीमित्र/ जलसेवक/ प्रगतीशिल शेतकरी/ पुरस्कार प्राप्त शेतकरी/ ग्राम रोजगार सेवक तसेच गावाशी संबंधित असलेल्या शासकीय क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे यशदा, पुणे येथील जलसाक्षरता केंद्राकडून तीन दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.  

          पाण्याच्या ताळेबंदाचा लेखाजोखा ग्रामसभेसमोर मांडण्यात येईल. पिकाच्या उत्पादकतेत शाश्वतता आणण्यासाठी आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी जलसंधारणाच्या समतल मशागत व उताराला आडवी पेरणी, आंतरपिक पध्दती/मिश्रपिक पध्दती, मृतसरी उघडणे/काढणे, रुंद वरंबा सरीपध्दतीने पेरणी, शुन्य मशागत तंत्रज्ञान, हिरवळीचे खत, नॅडेप कंपोस्टींग व गांडूळ खत इत्यादी माध्यमातून जमिनीतील शेंद्रीय कर्ब वाढविण्याचा आराखडयात समावेश करण्यात येणार आहे. या अभियानात सुक्ष्म सिंचन पध्दतीच्या वापरावर भर देण्यात आला असून या गावांमध्ये शेतकऱ्यांना सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी आणि जलसंधारणाच्या कामातून उपलब्ध झालेल्या पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी शेतकऱ्यांना सामुहिक सिंचन सुविधेसाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियान- 2.0 मुळे पावसाचे पाणी अडवून भूगर्भात पाण्याची पातळी वाढवून कृषी क्षेत्रासाठी सिंचनाची व्यवस्था निर्माण होण्यास मदत होणार आहे. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार असल्यामुळे टंचाई सदृश्य परिस्थितीवर मात करता येईल. लोकसहभागातून हे अभियान जिल्हयातील 166 गावात यशस्वी करण्यासाठी यंत्रणा काम करीत आहे.   

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे