पिकांवरील शत्रु किडीच्या नायनाटासाठी दशपर्णी अर्क गुणकारी : तयार करुन ठेवण्याचे आवाहन
- Get link
- X
- Other Apps
पिकांवरील शत्रु किडीच्या नायनाटासाठी
दशपर्णी अर्क गुणकारी : तयार करुन ठेवण्याचे आवाहन
वाशिम, दि. 31 (जिमाका) : खरीप हंगाम तोंडावर आला असून या हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग आणि भाजीपाला या पिकांवरील मित्रकिडींचे संरक्षण आणि शत्रूकिडींचे निर्मूलन करण्यासाठी दशपर्णी अर्क गुणकारी आहे आणि तो वरदान ठरु शकतो. दशपर्णी अर्क हे उत्तम प्रतीचे किडनाशक, बुरशीनाशक व टॉनिक इत्यादी सर्वच प्रकारचे कार्य करते. दशपर्णी अर्क तयार होण्याकरीता ३० दिवसाचा कालावधी लागत असल्यामुळे दशपर्णी अर्क तयार करण्याची ही योग्य वेळ आहे. दशपर्णी अर्क तयार करण्याकरीता १० प्रकारच्या वेगवेगळया उग्र वासाच्या वनस्पतीच्या पाल्याचा उपयोग करण्यात येतो.
दशपर्णी अर्क तयार करण्याची पध्दत - पाणी २०० लिटर, शेण २ किलो, गोमुत्र १० लिटर, हळद पावडर २०० ग्रॅम, अद्रक पेस्ट ५०० ग्रॅम, तंबाखु १ किलो, हिरवी तिखट मिर्ची १ किलो, लसुन १ किलो, करंज पाला २ किलो (छोटया फांदयासह), सिताफळ पाला २ किलो, एरंडी पाला २ किलो, पपई पाला २ किलो, कडुलिंब पाला ५ किलो, निरगुडीचा पाला २ किलो, रुईचा पाला २ किलो, धोतऱ्याचा पाला २ किलो, गुळवेल पाला २ किलो, बेलाचा पाला २ किलो, झेंडुचा पाला २ किलो, तुळशी पाला २ किलो, कन्हेरी पाला २ किलो, कारल्याचा पाला २ किलो, शेवगा पाला २ किलो, आघाडयाचा पाला २ किलो, चिंचेचा पाला २ किलो अशाप्रकारे दशपर्णी अर्क तयार करतांना कमीत कमी १० प्रकारच्या वनस्पतीचा पाला घेणे आवश्यक आहे.
वरील सर्व वनस्पतीचा पाला समप्रमाणात घेऊन पाला कुटुन देशी गायीचे ताजे शेण २ किलो व गोमुत्र १० लिटर व २० ते २५ लिटर पाणी २०० लिटरच्या टाकीमध्ये द्रावण तयार करुन कपडयाच्या सहाय्याने झाकुन ठेवावे. मिश्रण दिवसातुन कमीत कमी २ वेळा ढवळावे व ढवळुन झाल्यानंतर झाकन पुन्हा व्यवस्थीत झाकुन ठेवावे. ही ढवळण्याची क्रीया ३० दिवस चालु ठेवावी. या कालावधीत सर्व मिश्रण व्यवस्थीत तयार होईल. तयार झालेले मिश्रण पातळ कपडयाच्या सहाय्याने गाळुन घ्यावे.
दशपर्णी अर्काचा वापर - दशपर्णी अर्क तयार केल्यापासुन तीन महीन्यापर्यंत वापरता येतो. फक्त साठवणुक करतांना बंद झाकणाच्या कॅनमध्ये व्यवस्थीत साठवुन ठेवावा. दशपर्णी अर्काचा वापर किडी व रोग नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. दशपर्णी अर्कात वेखंड पावडरचा वापर करता येऊ शकतो. १५ लिटर पाण्यात २ ते २.५ लिटर दशपर्णी अर्क मिसळुन फवारणी करावी. दोन फवारणीतील अंतर ३ ते ४ दिवसापेक्षा जास्त असु नये. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. कारंजा तालुक्यातील शेतकरी गटाने दशपर्णी अर्क तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये विळेगांव - 400 लिटर, जयपुर -400 लिटर, शहा -2200 लिटर, दोनद -2200 लि., धानोरा (ताथोड) -2600 लि., बेंबळा - 800 लि., रामटेक -400 लि., मेहा- 400 लि., मनभा - 200 लि., कामरगाव - 200 लि. असे एकुण 9800 लिटर दशपर्णी अर्क तयार केलेला आहे. या गावातील शेतकऱ्यांचा दशपर्णी अर्क तयार करण्याचा आदर्श इतर गावातील शेतकऱ्यांनी घ्यावा व आपल्या पिकाचे किड व रोगापासुन संरक्षण होण्याकरीता होणाऱ्या खर्चात बचत करावी.
दशपर्णी अर्क तयार करण्याकरीता लागणारे साहीत्य हे सहज उपलब्ध होत असल्याने कमी मेहनतीमध्ये घरच्या घरी उत्तम प्रकारे किटकनाशक, टॉनिक तयार करु शकतो. तरी सर्व शेतकरी बांधवांनी दशपर्णी अर्क तयार करुन त्याचा वापर करावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकरराव तोटावार यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment