डॉ आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हावा गोपाळराव आटोटे सामाजिक न्याय पर्वाचा समारोप


डॉ आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हावा 
                     गोपाळराव आटोटे 

सामाजिक न्याय पर्वाचा समारोप 

वाशिम दि.०१(जिमाका) देशात स्वातंत्र्य,समता, बंधुता आणि न्यायाचे राज्य निर्माण झाले पाहिजे. जाती-जाती आणि धर्माधर्मातील भेद नाहीसा झाला पाहिजे.फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा देश निर्माण होत नाही तोपर्यंत सामाजिक न्याय पर्व संपले असे म्हणता येणार नाही. नवभारताच्या निर्माणासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण झाला पाहिजे.असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत गोपाळराव आटोटे गुरुजी यांनी केले.    
           आज १ मे रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील सभागृहात सामाजिक न्याय पर्वाच्या समारोपीय कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून श्री. आटोटे बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य यु.एस.जमदाडे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ, प्रा डॉ.एस.एन.भदरगे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. 
           श्री आटोटे म्हणाले,प्रत्येकाचे कर्तव्य आहे की त्यांनी समता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. महात्मा फुलेंनासुद्धा जाती व्यवस्थेची चटके सोसावे लागले.ही व्यवस्था उलथून टाकण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस कष्ट केले.ही व्यवस्था उलथून टाकायची असेल तर त्यासाठी शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे हे त्यांनी ओळखले.शाहू महाराजांनी शिक्षणाला अतिशय महत्त्व दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतून शिक्षणासाठी कायदाच केला.पूर्वीच्या काळी आमच्याशिवाय कोणी शिकू नये ही व्यवस्था निर्माण करून ठेवली होती.या व्यवस्थेला छेद देण्यासाठी महापुरुषांनी आपले आयुष्य खर्ची घातले.
           समता प्रस्थापित करण्यासाठी महापुरुषांनी रात्रंदिवस मेहनत घेतली असे सांगून श्री.आटोटे म्हणाले,आज जगातील १३४ देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते.३०० वर्षाच्या इतिहासात कोलंबिया विद्यापीठात जे हुशार विद्यार्थी होऊन गेले त्यामध्ये अतिशय विद्वान विद्यार्थी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची या विद्यापीठाने निवड केली.ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे.या विद्यापीठाने त्यांचा पुतळा उभारला आणि त्या पुतळ्याखाली ' सिम्बॉल ऑफ नॉलेज ' असे नमूद केले आहे . हीदेखील आपल्यासाठी गौरवाची बाब आहे.आज आपण समतेच्या दिशेने वाटचाल करीत आहोत,या महापुरुषांनी आपल्यासाठी योगदान दिले.डॉ.आंबेडकरांनी देशासाठी आदर्श संविधान दिले.प्रत्येक व्यक्ती व समूहाला त्याचा अधिकार संविधानाने बहाल केला.जोपर्यंत फुले,शाहू आंबेडकरांच्या विचारांचा देश निर्माण होत नाही,तोपर्यंत सामाजिक न्याय पर्व संपले असे म्हणता येणार नाही.असे ते म्हणाले.
         श्री.खडसे म्हणाले,सामाजिक न्याय पर्वाच्या निमित्ताने एक महिन्याच्या कालावधीमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या अनेक योजना  लोकाभिमुख करण्यात आल्या.ह्या योजना सामाजिक न्याय पर्वाच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात आले आहे.सामाजिक न्याय विभाग मागासवर्ग आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी सातत्याने काम करीत असतो.या पर्वाच्या निमित्ताने अनेक योजनांची माहिती लाभार्थ्यांना झाली आहे.भविष्यात हे लाभार्थी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपली आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
        प्रा. डॉ.भदरगे म्हणाले,फुले शाहू आणि आंबेडकरांनी समता प्रस्थापित करण्यासाठी कार्य केले.महात्मा फुलेंनी त्याकाळी शिक्षणाची व्यवस्था निर्माण केली.ही व्यवस्था निर्माण करताना त्यांना अनेक समस्यांना सामना करावा लागला.तेव्हाची व्यवस्था ही समतेची पुरस्कार करणारी नव्हती.असमानतेच्या व्यवस्थेचे चटके महात्मा फुलेंना देखील बसले. व्यवस्था परिवर्तनासाठी महात्मा फुलेंनी काम केले.फुलेंनी शिक्षणाच्या माध्यमातून जागरूक वर्ग निर्माण केला.महात्मा फुलेंनी सामाजिक शिक्षणावर भर दिला.आंबेडकरांनी समतेसाठी संघर्ष केला. संविधानामुळेच पूर्वीची समाज व्यवस्था मोडीत काढण्यात आली. मानवी मूल्ये अनंत काळापर्यंत टिकून राहिले पाहिजे.यासाठी राज्यघटनेच्या १३ कलमात तरतूद केली. नागरिकांच्या हक्कांची तरतुद ३२ व्या कलमात करण्यात आली.डॉ. आंबेडकरांनी देखील सामाजिक शिक्षणावर भर दिल्याचे त्यांनी सांगितले.
            प्राचार्य जमदाडे म्हणाले, तळागाळापर्यंत समाज कल्याण विभागाच्या योजना पोहोचविण्यात सामाजिक न्याय पर्वाची मदत झाली आहे.कल्याणकारी राज्यात वंचितांच्या व मागास घटकांच्या विकासासाठी काम करण्यात येते.त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात असे त्यांनी सांगितले.
         प्रास्ताविकातून श्री.वाठ यांनी सामाजिक न्याय पर्वामागील भूमिका विशद केली व सामाजिक न्याय पर्वानिमित्त एका महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली.
     प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले,राजर्षि शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते समाज कल्याण विभागाच्या " यशोगाथा " या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
     सामाजिक न्याय पर्वाच्या या समारोप कार्यक्रमाला निवासी शाळा, व वस्तीगृहामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी,समाज कल्याण विभागातील अधिकारी - कर्मचारी,समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.     
कार्यक्रमाचे संचालन युवराज राठोड या विद्यार्थ्याने केले.आभार हरीश वानखेडे यांनी मानले.


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे