पानथळ व नदी नाले काठावरील जमीनीत सोयाबीन लागवड सरी वरंबा/ बीबीएफ टोकण यंत्राने कराकृषी विभागाचे आवाहन
- Get link
- X
- Other Apps
पानथळ व नदी नाले काठावरील जमीनीत
सोयाबीन लागवड सरी वरंबा/ बीबीएफ टोकण यंत्राने करा
कृषी विभागाचे आवाहन
वाशिम, दि. 31 (जिमाका) : जिल्हयात खरीप हंगाम २०२३ मध्ये एकुण खरीप क्षेत्रापैकी ३ लक्ष ४ हजार ८० हेक्टर (७६ टक्के) क्षेत्रावर सोयाबीन या मुख्य पिक लागवडीचे नियोजन आहे. मागील तीन वर्षातील जिल्हयाची सोयाबीन उत्पादकतेचा विचार करता सन २०२० मध्ये १७६१ किलो प्रति हेक्टर, सन २०२१ मध्ये १६४१.४० किलो व सन २०२२ मध्ये १३८१.०८ किलो प्रति हेक्टर उत्पादन झालेले आहे. झालेले सोयाबीनचे उत्पादन पाहता यामध्ये वाढ करणे सहज शक्य आहे.
सरासरी उत्पादकता कमी येण्याची प्रमुख कारणे, हलक्या जमीनीत सोयाबीन पिक घेणे, वाणाची निवड जमीनीच्या मगदुराप्रमाणे न करणे, घरगुती बियाणे प्रतवारी न करता वापरणे, पेरणीपुर्वी उगवणशक्तीची खात्री न करणे, बुरशीनाशक व किटकनाशकाची बिजप्रक्रिया न करणे, पेरणी ५ से.मी. पेक्षा जास्त खोलीवर करणे, शिफारशीप्रमाणे रासायनिक खत न वापरणे, हेक्टरी रोप संख्या योग्य न ठेवणे व पारंपारीक पध्दतीने बहुपिक पेरणी यंत्राणे पेरणी करणे या कारणामुळे उत्पादन कमी आल्याचे दिसुन येते.
मागील वर्षी ३६२२ शेतकऱ्यांच्या ३ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर घेण्यात आलेल्या सोयाबीन पिकाच्या प्रात्यक्षिकात शेतकऱ्यांनी वापरलेल्या एसओपी व टोकण पध्दतीने लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात सन २०२१-२२ मधील पारंपारीक पध्दतीने पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनात ५३.८३ टक्क्याने व सन २०२२-२३ मधील पारंपारीक पध्दतीने पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनात ४४.६८ टक्के वाढ झाल्याचे दिसुन आले आहे. मागील वर्षी पानथळ, नदी नाला काठावरील जमीनीत ज्या शेतकऱ्यांनी सरी वरंब्यावर टोकण पध्दतीने लागवड केली, अशा शेतकऱ्यांना अतिवृष्टी होऊनही उत्पादन चांगले आलेले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पाणबसन, नदी नाल्याच्या काठच्या जमीनी, पाणी साचनाऱ्या जमीनीत सरी वरंबा पध्दत किंवा बीबीएफ यंत्राद्वारे टोकण पध्दतीने पेरणी करावी. या पध्दतीने पेरणी केल्यास एकरी १६ ते २२ किलो बियाणे लागत असल्यामुळे बियाण्याची २५ ते ५० टक्के बचत होऊन बियाण्यावरील खर्च कमी होतो.
नदी नाले काठी असणाऱ्या पाणबसन व रस्ते सुविधा नसणाऱ्या शेतकऱ्यांनी आताच ट्रॅक्टर किंवा बैलजोडीच्या सहाय्याने ६० से.मी. रुंदीचे बेड व ६० से.मी. सरी पाडून ठेवावे, बेड पाडण्यापुर्वी एकरी १८७ किलो सिंगल सुपर फॉस्फेट जमीनीत मिसळुन देऊन सऱ्या पाडाव्या व उर्वरीत युरीया २६ किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश २० किलो लागवडीच्या वेळी द्यावे. संयुक्त खते जसे डीएपी, १०:२६:२६, १२:३२:१६ इत्यादी खतासोबत एकरी ८ किलो गंधक पेरणीच्या वेळी द्यावे. चांगला पाऊस (७५ ते १०० मीमी) झाल्यावर बेडवर हस्तचलित टोकण यंत्राद्वारे किंवा मजुराकडून टोकण पध्दतीने एकरी १४ ते १६ किलो बियाणे बिजप्रक्रिया करुन टोकण करुन घ्यावी.
पेरणीचा अल्प कालावधी व उपलब्ध संसाधनाचा विचार करता एकाचवेळी पेरणीची घाई होते व पेरणी करतांना शेतकरी / ट्रॅक्टर चालकाकडुन चुका होतात परिणामी उगवण चांगली होत नाही व उत्पादन कमी येते किंवा वेळप्रसंगी शेतकऱ्यास दुबार पेरणीचे संकट ओढावते हे धोके टाळण्याकरीता पेरणीचे नियोजन योग्य पध्दतीने केल्यास हे शक्य होते. तसेच वाढत्या इंधनाचे दर पाहता मशागत/ पेरणीच्या खर्चात सुध्दा वाढ झालेली आहे. ती आपण हस्तचलित टोकण यंत्राचा वापर करुन कमी करु शकतो.
चालु खरीप हंगामात एल निनोचा प्रादुर्भाव असल्यामुळे पाऊस वेळेवर येईल, कोणत्या स्वरुपात पडेल किंवा पाऊसात खंड पडेल हे अनिश्चित असल्याने सरी वरंबा किंवा बीबीएफद्वारे टोकण केल्यास याचा निश्चीत फायदा होईल. तसेच बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी केल्यास आंतर मशागतीचे सर्व कामे यंत्राद्वारे करता येत असल्याने वेळेवर डवरणी, फवारणी इत्यादी कामे कमी खर्चात करणे शक्य होईल व उत्पादनात निश्चित वाढ होईल. खरीप २०२३ हंगामामध्ये सोयाबीनची टोकण पध्दतीने लागवड करण्याकरीता मौजे नागठाणा तालुका वाशिम येथे आतापर्यंत ७० एकर क्षेत्रावर बेड तयार करण्यात आले आहे. २०० एकरापर्यंत बेड तयार करण्याचे नियोजन झालेले आहे. अशाच प्रकारे जिल्हयातील सर्व गावातील शेतकऱ्यांनी पेरणीपुर्वी सरी वरंबे तयार करुन ठेवावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकरराव तोटावार यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment