जत्रा शासकीय योजनांची एक लोककल्याणकारी पाऊल




जत्रा शासकीय योजनांची

एक लोककल्याणकारी पाऊल

        वाशिम, दि. 18 (जिमाका) : राज्याची संकल्पना ही लोककल्याणकारी आहे. राज्यातील जनतेच्या कल्याणाच्या दृष्टीने राज्य सरकार विविध योजनांची अंमलबजावणी करीत असते. महाराष्ट हे देशातील एक प्रगतीशील राज्य म्हणून ओळखले जाते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रगलभ विचारानेच राज्याचा प्रगतीशील आणि पुरोगामी राज्य म्हणून नावलौकीक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुरदृष्टीने राज्याच्या विकासाचा आलेख वाढतांना दिसत आहे.

          राज्यातील नागरीक विकासाच्या प्रवाहात यावेत व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून “ जत्रा शासकीय योजनांची ” हा उपक्रम 15 एप्रिल ते 15 जून 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्याला नुकतीच 75 वर्ष पुर्ण झाली आहे. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्यातील सर्व 36 जिल्हयातील प्रत्येकी 75 हजार विविध योजनांच्या लाभार्थ्यांना एकाच दिवशी एकाच छताखाली लाभ देण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. प्रत्येक जिल्हयात 75 हजार लाभार्थ्यांनाच नाही तर ती लाभार्थ्यांची संख्या लाखाच्याही वर राहू शकते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारचे विविध विभाग गावपातळीवर सुक्ष्म नियोजनातून काम करीत आहे. जो लाभार्थी ज्या योजनेच्या लाभासाठी पात्र आहे, त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे लाभार्थ्यांकडून एकत्र करणे सुरु आहे. गावपातळीवरचा कोणत्याही योजनेचा पात्र लाभार्थी हा लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षत घेवून यंत्रणा काम करत आहे.

         राज्य शासनाच्या विविध विभागाच्या लाभार्थ्यांसाठी वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी दरवर्षी अर्थसंकल्पात विशिष्ट आर्थिक तरतूद करण्यात येते. अनेकदा लाभार्थ्यांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती नसल्याने त्यांना योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागते. योजनेची अंमलबजावणी करणारा विभाग हा त्यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रचार-प्रसिध्दी करुन नियमितपणे अंमलबजावणी करीत असतात.

         “ जत्रा शासकीय योजनांची ” या उपक्रमातून एकाच ठिकाणी कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे या उपक्रमातून राज्य शासनाचे लोककल्याणकारी पाऊल पुढे पडतांना दिसत आहे. या उपक्रमाचे समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्हयात या उपक्रमाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनात जिल्हास्तर आणि तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. विविध योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती देण्याचे काम संबंधित विभाग करीत आहे. संबंधित योजनांच्या प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे तसेच त्या लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांसह परिपुर्ण अर्ज भरुन घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी हे या उपक्रमाचे जिल्हा प्रमुख आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली “ जत्रा शासकीय योजनांची ” या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय यंत्रणा प्रमुखांच्या सभा घेण्यात आल्या. यंत्रणांच्या जिल्हा प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या तालुका यंत्रणा प्रमुखांच्या देखील सभा घेतल्या. तसेच तालुका यंत्रणा प्रमुख यांनी त्यांच्या कार्यकक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सभा घेवून गावपातळीवरील प्रत्येक लाभार्थ्याला त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने त्यांचे परिपुर्ण अर्ज भरुन संबंधित लाभार्थ्याला लाभ देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु केली आहे.

         “ जत्रा शासकीय योजनांची ” या उपक्रमाच्या माध्यमातून यंत्रणा लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहे. संबंधित यंत्रणा लाभार्थ्यांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती देत आहे. या उपक्रमामुळे लाभार्थ्याला योजनेचा लाभ मिळेल हे निश्चित. कमी कालावधीत योजनांचा लाभ मिळणार असल्यामुळे लाभार्थ्याच्या आर्थिक व सामाजिक विकासाला अमृत महोत्सवी वर्षात हातभार लागण्यास या उपक्रमाची मदत होणार आहे.

        

 

(विवेक खडसे)

जिल्हा माहिती अधिकारी

वाशिम

                                                                                                                                      *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे