शेतकऱ्यांना नगदी पिकांसाठी प्रोत्साहन द्यावे - पालकमंत्री संजय राठोड खरीप हंगामपूर्व आढावा सभा


शेतकऱ्यांना नगदी पिकांसाठी प्रोत्साहन द्यावे

                                                                                     - पालकमंत्री संजय राठोड

खरीप हंगामपूर्व आढावा सभा

       वाशिम, दि. 12 (जिमाका) : जिल्हयातील शेतकरी पारंपरिक पध्दतीने पीके घेतात. शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना फळबाग, रेशीम, भाजीपाला यासारख्या नगदी पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे. असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

          आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात खरीप हंगामपूर्व आढावा सभेत पालकमंत्री श्री. राठोड बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे कृषी समिती सभापती वैभव सरनाईक, कृषी सहसंचालक किसनराव मुळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, अपर पोलीस अधिक्षक भारत तांगडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनेश बारापात्रे, महावितरणचे अधिक्षक अभियंता मंगेश वैद्य, जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय राठोड, महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गणेश गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

          श्री. राठोड बोलतांना पुढे म्हणाले, जिल्हयातील शेतकऱ्यांना रेशीम शेती व बांबू शेती कशी करता येईल यासाठी कृषी विभागाने मदत करावी. शेतकऱ्यांनी माती परिक्षण केले पाहिजे. त्यामुळे शेतीमध्ये कोणते घटक कमी आहे व कोणती पीके शेतात घेता येतील याबाबतची माहिती माती परिक्षण केल्यानंतर होते. लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेवून शेतीविषयक कार्यक्रमात सहभागी करुन घ्यावे. प्रगत कृषी तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती द्यावी. त्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कृषी निवीष्ठा वेळीच उपलब्ध होतील यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. जिल्हयातील सर्व कृषी केंद्र चालकांच्या कार्यशाळा घेण्यात याव्यात असे त्यांनी यावेळी सांगितले.

         जिल्हयातील शेतकरी ड्रोनव्दारे किटकनाशकांची फवारणी करतील यासाठी त्यांना आतापासूनच प्रोत्साहीत करावे असे सांगून श्री. राठोड म्हणाले, शेतकरी बचतगटांना ड्रोन खरेदी करण्यासाठी कृषी विभागाने सहकार्य करावे. शेतकरी बचतगटांना चांगल्या कंपन्यांचे ड्रोन देण्याबाबत विचार करण्यात येईल. सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी अष्टसुत्रीचा वापर करावा. अमरपट्टा पध्दतीने सोयाबीन व तूर पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करावे. येत्या खरीप हंगामात जिल्हयातील कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. सन 2018 पासून ज्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपाना वीज जोडणी देण्यात आलेली नाही, त्यांना प्राधान्याने वीज जोडणी देण्यात यावी. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शेतीसाठी ट्रान्सफार्मर देण्यात येईल. तसा प्रस्ताव महावितरणने सादर करावा. असे ते म्हणाले.

          श्री षन्मुगराजन म्हणाले, कृषी विभागाने जिल्हयातील शेतकऱ्यांना घरचे बियाणे वापरण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे. बीज प्रक्रीया कशी करावी याबाबतची माहिती प्रत्यक्षिकांसह देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाबाबत अवगत केल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करीत असल्याचे सांगितले.

          श्री. तोटावार माहिती देतांना म्हणाले, मागील वर्षी 109 टक्के पाऊस झाला. सोयाबीन 3 लक्ष 5 हजार हेक्टर, तूर 63 हजार 137 हेक्टर, कापूस 22 हजार 534 हेक्टर आणि अन्य पीके 6320 हेक्टरवर घेतली. अमरावती विभागात जिल्हयाची सोयाबीनची सरासरी उत्पादकता जास्त आहे. सन 2023-24 यावर्षात 3 लक्ष 4 हजार 80 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, 28 हजार 167 हेक्टरवर कापूस, 61 हजार 876 हेक्टरवर तूर पिक पेरणी प्रस्तावित आहे. यासाठी सोयाबीनचे 2 लक्ष 28 हजार क्विंटल, तुरीचे 7425 क्विंटल व कापसाचे 634 क्विंटल बियाणे लागणार आहे. घरगुती बियाणे पेरणीकरीता 1 लक्ष 61 हजार 923 क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. परंतू जिल्हयात ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमातून शेतकऱ्यांनी 3 लक्ष 4 हजार 381 क्विंटल सोयाबीन जतन करुन ठेवले आहे. जिल्हयासाठी रासायनिक खतांचे मंजूर आवंटन 70 हजार 50 मे. टन असून उपलब्ध खत साठा 58 हजार 460 मे. टन आहे. त्यापैकी 4226 मे. टन खताची विक्री करण्यात आल्याची माहिती श्री. तोटावार यांनी दिली.

          सन 2022-23 च्या खरीप हंगामात 1280 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले असता 997 कोटी 87 लक्ष रुपये पीक कर्ज वाटप केले. सन 2023-24 या वर्षात खरीप हंगामात 1404 कोटी रुपये व रब्बी हंगामासाठी 156 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले असल्याचे सांगून श्री. तोटावार म्हणाले, अतिवृष्टी, गारपिट व अवकाळी पावसामुळे जुलै ते 8 मे पर्यंत जिल्हयातील 2 लक्ष 40 हजार 675 शेतकऱ्यांचे 1 लक्ष 93 हजार 627 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाईपोटी 265 कोटी 45 लक्ष रुपयांची आवश्यकता आहे. 1 लक्ष 72 हजार 642 शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात 197 कोटी 23 लक्ष रुपये वर्ग करण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांचे 68 कोटी 22 लक्ष रुपये वाटप करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. जिल्हयात चांगल्याप्रकारे बीज प्रक्रीया करण्यात येते. सीड प्रोसेसिंग ड्रम शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिल्याने व जैविक शेती प्रयोगशाळेतून शेतकरी मोठया प्रमाणावर निविष्ठांची खरेदी करीत असल्यामुळे मागीलवर्षी 70 कोटी रुपयांचे औषधी व खते परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

          सभेला बॅंकांचे जिल्हा प्रतिनिधी, वाशिम उपविभागीय कृषी अधिकारी निलेश ठोंबरे, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी संतोष वाळके, तालुका कृषी अधिकारी सर्वश्री श्री. सावंत, श्री.राठोड, श्री. इंगोले, श्री घोडेकर, श्री. चौधरी, श्री. बारबैल, तंत्र अधिकारी दिलीप कंकाळ व एस. टी. धनोडे यांची उपस्थिती होती.

******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे