जिल्हाधिकाऱ्यांनी केलीजलसंधारणाच्या मॉडेलची पाहणी
- Get link
- X
- Other Apps
जिल्हाधिकाऱ्यांनी केली
जलसंधारणाच्या मॉडेलची पाहणी
वाशिम, दि. 08 (जिमाका) : पानी फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देण्यात आलेल्या जलसंधारणाच्या मॉडेलची जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या प्रवेशव्दारावर पाहणी केली. मॉडेलबाबतची माहिती पानी फाऊंडेशनचे विभागीय समन्वयक सुभाष नानोटे यांचेकडून श्री. षण्मुगराजन यांनी जाणून घेतली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची उपस्थिती होती.
जलसंधारणाचे दोन मॉडेल तयार करण्यात आले आहे. पहिल्या मॉडेलमध्ये उपचारापूर्वीचे परिणाम अर्थात दुष्काळी गाव दाखविण्यात आले आहे. तर दुसऱ्या मॉडेलमध्ये उपचारानंतरचे परिणाम दाखवून जलसमृध्द गाव कसे तयार झाले हे दाखविण्यात आले आहे. माथा ते पायथा झालेले उपचार, समतल चर, डिप सीसीटी, दगडी बांध, गॅबियन बंधारा, कपार्टमेंट बेडींग, नाला खोलीकरण, नाला सरळीकरण, सिमेंट बंधारे, शेततळे व पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहीरी या उपचारातून दिसून येते. यामधून ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पाण्याने भरलेले शेततळे, विहीरीची वाढलेली पाण्याची पातळी यातून पाण्याच्या उपलब्धतेमुळे बहरलेली शेती व गाव हे एका मॉडेलमध्ये दाखविण्यात आले आहे. तर दुसऱ्या मॉडेलमध्ये उजाड व दुष्काळी गाव दाखविण्यात आले आहे.
या मॉडेलमधून धावत्या पाण्याला चालायला लावणे, चालत्या पाण्याला थांबायला लावणे आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत मुरवायला लावणे हे तीन टप्पे दिसून येते. जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरीकांना व शेतकऱ्यांना हे दोन्ही मॉडेल बघण्यासाठी प्रवेशव्दारावरच उपलब्ध असणार आहे. त्यामुळे जलसमृध्द गावाचे मॉडेल ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरीकांसाठी व शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment