पावसाळा सुरू होण्यास काही दिवसच बाकी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गाळ मागणीसाठी नोंदणी करावीजिल्हा प्रशासनाचे आवाहन
- Get link
- X
- Other Apps
पावसाळा सुरू होण्यास काही दिवसच बाकी
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गाळ मागणीसाठी नोंदणी करावी
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
वाशिम, दि. 29 (जिमाका) : पावसाळा सुरू होण्यास काही दिवसच बाकी आहेत. त्यामुळे शेतातील पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी गावाशेजारी असलेल्या तलावातील गाळ शेतात टाकण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत किंवा मृद व जलसंधारण विभागाकडे गाळाची मागणी नोंदवावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना आणि नीती आयोगाच्या निधीतून तलावांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करण्यासाठी आणि तलावातील सुपीक गाळ शेतात टाकून शेतीची उत्पादन क्षमता वाढावी यासाठी तलावातील गाळ काढण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. ज्या गावाच्या परिसरात तलाव आहेत, त्या तलाव परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी तलावातील गाळाची मागणी मृद व जलसंधारण विभाग व ग्रामपंचायतीकडे नोंदविल्यास त्यांना तलावातील गाळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांना तलावातील गाळ आपल्या शेतात टाकायचा आहे, त्यांनी ग्रामपंचायत किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधावा. त्यामुळे त्वरीत गाळ उचलण्याची कार्यवाही करता येईल. जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या तलावातील गाळाची मागणी शेतकऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीकडे किंवा जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडे नोंदविल्यास त्यांना मशीन उपलब्ध करून देण्यात येईल. शेतकऱ्यांना स्वतः ट्रॅक्टर आणून गाळ घेऊन जाता येईल.
मृद व जलसंधारण विभागाच्या तलावातील गाळ विधवा, दिव्यांग आत्महत्याग्रस्त, अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाला अनुदानातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मोठ्या शेतकऱ्यांना ह्या तलावातील गाळ स्वखर्चाने घेऊन जावा लागेल. अशा तलावातील गाळाची मागणी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत किंवा मृद व जलसंधारण विभागाच्या उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्यांकडे नोंदवावी.
आता पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचाच अवधी बाकी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तलावातील जास्तीत जास्त गाळ काढून तो शेतात पसरवून शेतीची उत्पादन क्षमता वाढवण्यासोबतच तलावातील पाण्याची साठवण क्षमता वाढीसाठी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment