नाला खोलीकरणाची व तलावातील गाळ काढण्याची कामे यंत्रणांनी प्राधान्याने करावी षण्मुगराजन एस. जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरणचा आढावा
- Get link
- X
- Other Apps
नाला खोलीकरणाची व तलावातील गाळ
काढण्याची कामे यंत्रणांनी प्राधान्याने करावी
जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरणचा आढावा
वाशिम, दि. 22 (जिमाका) : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसाक्षरतेवर भर देण्यात आला आहे. जलसाक्षरतेची कामे करतांना गावाच्या शाश्वत विकासाला गती मिळणार आहे. यामधून नाला खोलीकरणाची कामे करण्यासोबतच तलावातील साचलेल्या गाळाचा उपसा करुन शेतात पसरविल्याने तलावाची मुळ साठवण क्षमता पुन:र्स्थापित होणार आहे. कृषी उत्पन्नात देखील भरीव वाढ होणार आहे. त्यामुळे यंत्रणांनी नाला खोलीकरणाची आणि तलावातील गाळ काढण्याची कामे प्राधान्याने करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जलयुक्त शिवार अभियान 2.0, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार व जलशक्ती अभियान - 2023 चा आढावा घेतांना श्री. षन्मुगराजन बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, लक्ष्मण मापारी, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर (वाशिम), सखाराम मुळे (मंगरुळपीर), व ललीत वऱ्हाडे (कारंजा) यांची प्रमुख उपस्थिती होती.
जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात येणाऱ्या कामांचे अंदाजपत्रके तातडीने तयार करावी. असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, प्रशासकीय मान्यता घेवून त्वरीत कामे सुरु करावी. नाला खोलीकरणाची व सिमेंट नाला बंधाऱ्याची कामे हाती घेतल्याने पाणी साठवणूक क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. ज्या गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली आहे, त्या गावात एका कामाची सुरुवात तातडीने करण्यात यावी. जे काम या अभियानातून करण्यात येणार आहे, त्या कामाची माहिती लोकप्रतिनिधींना देण्यात यावी. त्यांना विश्वासात घेवून कामे करावी. ज्या संस्था अटी व शर्तीची पुर्तता करीत असतील त्यांनाच कामे उपलब्ध करुन द्यावी. नाला खोलीकरणाची आणि गाळ काढण्याची कामे कृषी विभागाने हाती घ्यावे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
मृद व जलसंधारण विभागाकडे जे अंदाजपत्रके प्राप्त झाली आहे, त्याची तपासणी करुन त्रृटीची पुर्तता करण्यात यावी. असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, कामाचे आराखडे समितीसमोर ठेवून त्याला मंजूरी घ्यावी. निवड केलेल्या गावात समप्रमाणात कामे घ्यावी. गावातील कामाच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत नसावी याची दक्षता घ्यावी. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानाबाबत शेतकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्याचे काम यंत्रणांनी करावे. यंत्रणांनी शेतकऱ्यांना गाळाचे महत्व पटवून देवून शेतात गाळ टाकण्यास प्रोत्साहित करावे. शेतकरी गटांना देखील गाळ शेतात मोठ्या प्रमाणात टाकण्यास प्रवृत्त करावे.
प्रत्येक तालुक्यात गाळ काढण्यासाठी जेसीबी आणि पोकलॅन्ड ही यंत्रे किती आहेत ही माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांनी एकत्र करावी. असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कामे सुरु झाली तर यंत्रांचा तुटवडा पडू नये, यासाठी आतापासूनच यंत्रणांनी नियोजन करावे. जलशक्ती अभियानातून रेन वॉटर हार्व्हेस्टिंगची कामे मोठ्या प्रमाणात करावी. तसेच आपल्या कार्यालयासोबतच इतर शासकीय कार्यालयाच्या छतावर देखील पाण्याच्या पुनर्भरणाची कामे करावी. वृक्ष लागवड करतांना त्या वृक्षाच्या संगोपनाकडे विशेष लक्ष द्यावे. प्रत्येक झाड जगून चांगले बहरले पाहिजे यासाठी कार्यालयातील प्रत्येक अधिकारी -कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे. भूगर्भात पाण्याची साठवण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी भूजल पुनर्भरणाची कामे हाती घ्यावी. असे ते यावेळी म्हणाले.
सभेला गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment