भूजल पुनर्भरण, नाला खोलीकरणासह तलावातील ग ाळ काढण्याची कामे यंत्रणांनी प्राधान्याने करावी -षण्मुगराजन एस. जलशक्ती, जलयुक्त व गाळमुक्तचा आढावा
- Get link
- X
- Other Apps
भूजल पुनर्भरण, नाला खोलीकरणासह तलावातील
गाळ काढण्याची कामे यंत्रणांनी प्राधान्याने करावी
जलशक्ती, जलयुक्त व गाळमुक्तचा आढावा
वाशिम, दि. 30 (जिमाका) : भूगर्भातील पाण्याच्या पातळीत मोठया प्रमाणात वाढ करण्यासाठी पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब भूगर्भात संचयन करण्याकरीता भूजल पुनर्भरणाची कामे यंत्रणांनी मोठया प्रमाणात करण्यासोबतच जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणात करण्याकरीता नाला खोलीकरणाची कामे करावी. तसेच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून शेतातील पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकण्यासाठी प्रोत्साहित करावे. संबंधित यंत्रणांनी भूजल पुनर्भरण, नाला खोलीकरणासह जिल्हयातील तलावातील गाळ काढण्याची कामे मोठया प्रमाणात करण्यासाठी या कामांना प्राधान्य दयावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जलशक्ती अभियान, जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या अभियानाचा आढावा घेतांना श्री. षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. षण्मुगराजन म्हणाले, जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून यंत्रणांनी पाण्याच्या पुन:र्भरणाची कामे करतांना विहिर पुन:र्भरणाची कामे मोठया प्रमाणात करावी. यंत्रणांनी कामाचे आराखडे जलशक्तीच्या पोर्टलवर अपलोड करावी. ग्रामीण व शहरी भागात शोषखड्डे मोठया प्रमाणात करण्यासाठी नागरीकांना प्रोत्साहित करावे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. शहरी व ग्रामीण भागातील शासकीय व सार्वजनिक इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे करावी. खाजगी इमारतीच्या बांधकामांना परवानगी देतांना त्या इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे करण्याची अट टाकावी. ग्रामीण व शहरी भागातील नादुरुस्त बोअरवेल्सच्या दुरुस्तीची कामे हाती घेवून मोकळया व आवश्यक त्या जमीनीवर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे असे त्यांनी सांगितले.
पावसाळा सुरु होण्यास काही दिवसाचाच अवधी असल्याचे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून यंत्रणांनी मोठया प्रमाणात नाला खोलीकरणाची कामे हाती घ्यावीत. तांत्रिकदृष्टया जी कामे या उपक्रमातून करता येतील तीच कामे निवडावी. जलयुक्तमध्ये प्राधान्य क्रमानुसार कामांची निवड करावी. जिल्हा नियोजन समितीमधून जलयुक्त शिवार अभियानाची कामे करण्यासाठी यंत्रणांना निधी उपलब्ध देण्यात येईल. असे ते म्हणाले.
श्री. षण्मुगराजन पुढे म्हणाले, जिल्हयातील तलावातील पाणी साठयात मोठया प्रमाणात वाढ व्हावी, तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली पाहिजे. यासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना जिल्हयासाठी महत्वपूर्ण आहे. तलावातील गाळ शेतात टाकल्यास शेतीतील पिकांची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक होईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी त्यांच्या गावाजवळ असलेल्या तलावातील गाळ शेतात मोठया प्रमाणात टाकतील यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम यंत्रणांनी करावे. नगर पालीकांनी सुध्दा त्यांच्या क्षेत्रात असलेल्या तलावांचा गाळ काढण्याचे काम प्रस्तावित करावे. या आठवडयात जिल्हयात यंत्रणांनी गाळमुक्त धरणाची 60 कामे सुरु करावी. कोणत्याही तलावातील गाळ शेतकऱ्यांना काढता येणार आहे, त्यामुळे संबंधित विभागाने कामांचे अंदाजपत्रके तयार करुन मान्यता घ्यावी. शेतकऱ्यांना शेतात गाळ घेवून जाण्यास मदत करावी. असे श्री. षण्मुगराजन यावेळी म्हणाले.
श्रीमती पंत म्हणाल्या, जलशकती अभियानातून ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे मोठया प्रमाणात करावी. वृक्ष लागवडीसाठी आतापासूनच खड्डे तयार करण्यात यावी. शोषखड्डयांची कामे जास्तीत जास्त करुन पाण्याची भूगर्भात साठवणूक करावी. असे त्या म्हणाल्या.
यावेळी विविध यंत्रणांच्या विभाग प्रमुखांनी जलशक्ती अभियानांतर्गत आतापर्यंत करण्यात आलेल्या व करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली. जलयुक्त शिवार अभियान राबविणाऱ्या यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी अभियानाच्या कामाच्या सद्यस्थितीची, अंदाजपत्रकांची व प्रशासकीय मान्यतेची माहिती दिली. जिल्हयात जलशक्ती अभियानात 4 मार्च ते 29 मेपर्यंत 55 हजार 76 कामे पुर्ण करण्यात आली आहे.
श्री. मापारी यांनी जिल्हा परिषदेच्या 67 तलावातून गाळ काढण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. त्यापैकी 56 तलावातून गाळ काढण्याचे काम सुरु असून 15 तलवातून गाळ काढण्यात आले असून 41 तलावातून गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तलावातून आतापर्यंत 3 लक्ष 57 हजार 422 घनमीटर गाळ काढण्याचे त्यांनी सांगितले.
सभेला उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर (वाशिम), ललीत वऱ्हाडे (कारंजा), सर्व गटविकास अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, नगर पालिकांचे मुख्याधिकारी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी व भारतीय जैन संघटनेचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment