मानव विकास मिशन व कृषी विभागाचा पुढाकारशेतकऱ्यांच्या बांधावरील प्रयोगशाळा देत आहेजैविक शेतीला प्रोत्साहन· जिल्हयात 20 शेतबांधावरील प्रयोगशाळा· 13 प्रयोगशाळेतून 37 लक्ष जैविक निविष्ठांची विक्री· प्रयोगशाळेशी जुळले 6 हजार 500 शेतकरी

मानव विकास मिशन व कृषी विभागाचा पुढाकार

शेतकऱ्यांच्या बांधावरील प्रयोगशाळा देत आहे

जैविक शेतीला प्रोत्साहन

·        जिल्हयात 20 शेतबांधावरील प्रयोगशाळा

·        13 प्रयोगशाळेतून 37 लक्ष जैविक निविष्ठांची विक्री

·        प्रयोगशाळेशी जुळले 6 हजार 500 शेतकरी

       वाशिम,दि. 17 (जिमाका) : दिवसेंदिवस रासायनिक खते व किटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे सिंचनाच्या पाण्याची गुणवत्ता व शेतातील मातीचा दर्जा खराब होत आहे. जमिनीची क्षारता वाढली आहे. पिकांच्या उत्पादकतेसोबतच पोषणमुल्ये कमी होत आहे. यावर मात करण्यासाठी मानव विकास मिशन आणि कृषी विभागाच्या पुढाकाराने जिल्हयात शेतकऱ्यांच्या बांधावर तयार करण्यात आलेल्या प्रयोगशाळा महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. जिल्हयात शेतकऱ्यांच्या शेतबांधावर 20 प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या आहे. या प्रयोगशाळेंशी 6 हजार 500 शेतकरी जुळले आहेत. यापैकी 13 प्रयोगशाळेतून 37 लक्ष रुपयांच्या जैविक कृषी निविष्ठांची विक्री करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत तयार केलेल्या 2604 लिटर ट्रायकोडर्मा आणि 6880 लिटर कडधान्य स्लरीचा अनेक शेतकऱ्यांनी वापर करुन जैविक शेतीकडे वाटचाल सुरु केली आहे.

         शेत पिकातील पाण्याचा अती वापर आणि रासायनिक खतांच्या व किटकनाशकांच्या अति वापरामुळे शेत जमिनी या क्षारयुक्त होत आहे. जमिनीच्या खारवटपणामुळे पिकाची उत्पादकता कमी झाली आहे. जमिनीची विद्यूत वाहकता वाढत आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत आहे. अन्न साखळीतील रासायनिक किटकनाशकांचे अवशेष ही एक गंभीर समस्या बनत आहे. सुरक्षित शेती पध्दतीवर लक्ष केंद्रीत करणे त्यासाठी आवश्यक झाले आहे. सुरक्षित कृषी पिकांसाठी शाश्वत उपाय शेतकऱ्यांच्या बांधावरील प्रयोगशाळेत करणे जिल्हयात सुरु केले आहे. जैव सेंद्रीय पदार्थ व दाणेदार खते या प्रयोगशाळेत तयार करण्यात येत आहे. उपयुक्त बुरशी, लॅक्टीक ॲसीड, बॅक्टेरीयावर आधारीत, कचरा विघटनकर्ता म्हणून मिक्स कायक्रोबियल कंसोरर्शिया, वनस्पती अर्क आणि जनावरांचे शेण, साखर कारखान्यातील प्रेसमड व पिकांच्या अवशेषांचा वापर करुन थर्मल पध्दतीने विघटन करुन सेंद्रीय घटक या प्रयोगशाळेत तयार करण्यात येत आहे.

        जिल्हयातील जय किसान शेतकरी गट (एरंडा, ता. मालेगांव), कृषीरत्न शेतकरी उत्पादक कंपनी (डोंगरकिन्ही, ता. मालेगांव), जय हनुमान शेतकरी बचतगट (अटकळी, ता. वाशिम), अडबनेश्वर शेतकरी बचतगट (सावरगांव/जिरे, ता. वाशिम), वाशिम कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी (अडोळी, ता. वाशिम), योगायोग जैविक शेती मिशन फार्मर प्रोडयुसर कंपनी (बाभुळगांव, ता. वाशिम), अर्थवर्म ऑरगॅनिक शेतकरी उत्पादक कंपनी (अनसिंग, ता. वाशिम), पतंजली सेंद्रीय शेतकरी गट (नेतंसा, रिसोड), महाविदर्भ फार्मर प्रोडयुसर कंपनी (वाकद, ता. रिसोड), नाथांजली शेतकरी गट (डव्हा, ता. मालेगांव), जय पुंडलिक महाराज सेंद्रीय शेतकरी गट (बेलोरा, ता. मानोरा), मालेगाव तालुका फार्मर प्रोडयुसर कंपनी (मालेगांव, ता मालेगांव) व कृषीधन शेतकरी बचतगट या शेत बांधावरील प्रयोगशाळेतून ट्रायकोडर्मा, सी विड ग्रॅनुल, कडधान्य स्लरीची व दाणेदार खते या नैसर्गिक कृषी निविष्ठांची निर्मिती करण्यात येत आहे.

         वाशिम तालुक्यातील सावरगांव (जिरे) या गावाचे उदाहण दयायचे झाल्यास हे गाव भाजीपाला उत्पादनाचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील बहुतांश शेतकरी हे भाजीपाला उत्पादक आहेत. उत्पादीत होणारा भाजीपाला हैद्राबाद, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, अमरावती यासह अन्य ठिकाणी मोठया प्रमाणात विक्रीसाठी पाठविला जातो. शेतबांधावरील प्रयोगशाळा सुरु होण्यापूर्वी या गावातील भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठया प्रमाणात रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर करायचे. परंतू जुलै 2021 मध्ये गावात अडबनेश्वर शेतकरी बचतगटामार्फत शेतबांधावरील प्रयोगशाळा सुरु झाल्याने या प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या जैविक निविष्ठांचा वापर या गावातील भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठया प्रमाणात करु लागले. त्यामुळे त्यांचा रासायनिक खते व किटकनाशके खरेदीवरचा खर्च मोठया प्रमाणात कमी झाला. आता विषमुक्त भाजीपाला उत्पादनासाठी या शेतीवरच्या बांधावरील प्रयोगशाळेत निर्माण होणाऱ्या जैविक निविष्ठांचा वापर या गावातील शेतकरी करीत आहे. शेजारच्या हिंगोली, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा या जिल्हयात देखील जिल्हयातील शेतबांधावरील प्रयोगशाळेतील उत्पादीत कृषी निविष्ठांचा वापर करण्यात येत आहे. राज्यातील शेतबांधावरील प्रयोगशाळेची सुरुवात वाशिम जिल्हयात जुलै 2021 मध्ये झाली. या प्रयोगशाळेचे यश पाहता राज्यातील पुणे, धाराशीव, अहमदनगर, पालघर येथे सुध्दा प्रयोगशाळा उभारणीला सुरुवात झाली आहे.               

         एक लिटर सुक्ष्मजीव व जैविक अर्कयुक्त स्लरी तयार करण्यासाठी केवळ 7 ते 8 रुपये खर्च येतो. जिल्हयातील या प्रयोगशाळेत तयार केलेली स्लरी पुणे, अहमदनगर व धाराशिव जिल्हयातील शेतकरी बांधवांनी द्राक्ष व डाळिंब पिकांवर वापरल्याने रोगांचे प्रमाण कमी झाले आहे. विशेषत: डाळिंब, तूर व हरभरा पिकांवरील मर रोग कमी होण्यास मदत झाली आहे. जिवाणुयुक्त खत किंवा औषधी बाजार भावामध्ये 150 ते 200 रुपये तर निम करंजा अर्क 800 ते 1000 रुपये बाजारभावाने मार्केटमध्ये उपलब्ध होत असेल तर बांधावरच्या प्रयोगशाळेत अर्ध्या किमतीत म्हणजे 400 ते 500 रुपयात उपलब्ध होतो. बाजारातील जैविक औषधे जरी खरेदी करायची असल्यास प्रयोगशाळेच्या चारपट खर्च येतो. त्यामुळे शेताच्या बांधावरील प्रयोगशाळेतून उत्पादीत होणाऱ्या जैविक कृषी निविष्ठांची खरेदी केल्याने 75 टक्के खर्च वाचतो. कृषी विभाग कशाप्रकारे हया जैविक कृषी निविष्ठा तयार करावयाच्या आहेत याबाबतचे शेतकऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षणसुध्दा देत आहे. राज्याच्या कृषी विभागाने सुध्दा शेताच्या बांधावरील प्रयोगशाळेची संकल्पना स्विकारण्याची तयारी दर्शविली आहे.

         शेत बांधावरील प्रयोगशाळेसाठी लागणारे साहित्य व त्याचा खर्च 2 लक्ष रुपयांच्या आसपास आहे. यामध्ये सुध्दा तीन प्रकारचे मॉडेल आहे. छोटे मॉडेल 25 ते 30 हजाराच्या आसपास आहे. हे मॉडेल शेतकरी घरीसुध्दा स्वत:च्या शेतीसाठी विकसीत करु शकतो. मध्यम मॉडेल 1 लक्ष रुपये खर्चाचे आहे. काही बांधावरील प्रयोगशाळेत सी-विड, पोटॅशियम हुमेट, निम व करंज तेलाचे कोटींग, साबुदाणा किंवा सोयाबीन वडी किंवा तांदुळ, गांडुळ खत अधिक सोयाबीन कुटार, हरभरा कुटार बायोगॅस स्लरी व लाल मातीचा वापर करुन दाणेदार खतांची निर्मिती करण्यात येत आहे.

           जिल्हयातील शेतकरी या प्रयोगशाळेत तयार करण्यात येणाऱ्या कृषी निविष्ठांमुळे जैविक शेतीकडे वळत आहे. शेतकरी मोठया प्रमाणात बांधावरच्या प्रयोगशाळेत तयार करण्यात येणारे ट्रायकोडर्मा, सी-विड ग्रॅनुल, कडधान्य स्लरी व दाणेदार खतांचा वापर करु लागल्याने बाजारातून खरेदी करण्यात येणाऱ्या कृषी निविष्ठांवर होणारा खर्च मोठया प्रमाणात वाचला आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनात मानव विकास मिशनच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या शेतीच्या बांधावरील प्रयोगशाळेला कृषी सचिव एकनाथ डवले आणि मानव विकास मिशनचे आयुक्त नितीन पाटील यांनीही भेट देऊन या प्रयोगशाळेचे कौतुक केले आहे. शेतीच्या बांधावरील प्रयोगशाळेच्या सभासद शेतकरी बांधवांनी राज्यस्तर आणि राष्ट्रीयस्तरावरील शेती परिषदेत सहभाग घेतला आहे. भारतीय सोयाबीन संशोधन केंद्र, इंदोर येथे राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात जय किसान गटाच्या शेतकरी बांधवांनी सहभाग घेऊन भारतातील इतर राज्यातील शेतकरी बांधवांना शेतबांधावरील प्रयोगशाळेबद्दल माहिती दिली आहे. जिल्हयातील शेतकरी आता प्रयोगशाळेतील निविष्ठांचा वापर करु लागल्यामुळे त्यांचा बाजारपेठेतील खरेदी करण्यात येणाऱ्या निविष्ठांवरील खर्च मोठया प्रमाणात कमी झालेला असून आता पिकांची उत्पादकता वाढत आहे.  

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे