शेतीतील उत्पादन वाढीला मिळणार जलयुक्त शिवारचा आधारकृषी विभाग करणार 166 गावात उपचारात्मक कामे





शेतीतील उत्पादन वाढीला मिळणार

जलयुक्त शिवारचा आधार

कृषी विभाग करणार 166 गावात उपचारात्मक कामे

       वाशिम, दि. 24 (जिमाका) : जिल्हयातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून केली जाते. पावसाच्या पाण्यावरील अवलंबित्वामुळे ऐन पिकाच्या वाढीच्या काळात पावसाची अनियमितता आणि पावसात पडणाऱ्या खंडामुळे टंचाईची स्थिती निर्माण होते. जिल्हयात सिंचनाच्या मर्यादित सुविधा, मोठे दुष्काळी क्षेत्र, जमिनीच्या हलक्या प्रतीचे असलेले मोठे क्षेत्र आणि बेभरवशाच्या पावसामुळे शेतीच्या क्षेत्रात वाढत जाणाऱ्या अनिश्चिततेमुळे टंचाई परिस्थितीवर मात करण्यासोबतच शेतीच्या उत्पादन वाढीला जलयुक्त शिवार अभियान 2.0 चा मोठा आधार जिल्हयातील 166 गावातील शेतीला मिळणार आहे.

          जलसंधारणासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना देखील जलयुक्त शिवार अभियानाप्रमाणे राबविण्यात येत आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पाणलोट विकास घटक 2.0) जिल्हयात वाशिम, मालेगांव आणि मंगरुळपीर तालुक्यात राबविण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्यासाठी जिल्हयातील 166 गावांची यावर्षी निवड करण्यात आली आहे. यामध्ये वाशिम तालुका- 26, रिसोड तालुका- 21, मालेगांव तालुका- 28, मंगरुळपीर तालुका- 23, मानोरा तालुका- 33 आणि कारंजा तालुक्यातील- 35 गावांचा समावेश आहे.

         जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड केलेल्या जिल्हयातील 166 गावातील शेतशिवारात मुलस्थानी जलसंधारणाचे उपचार करण्यात येणार असून, सुक्ष्म सिंचनाचा वापर वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. पाण्याच्या ताळेबंदाच्या माध्यमातून जलसाक्षरता वाढविण्याच्या उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या गावांच्या शाश्वत विकासाला हातभार लागणार आहे. या अभियानामुळे पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी संरक्षित होणार आहे. विकेंद्रीत जलसाठे निर्माण होवून पिकांसाठी संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण होईल. अस्तित्वात असलेल्या तसेच पाण्याच्या जुन्या संरचनाची देखभाल व दुरुस्ती होवून जलस्त्रोतांची साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्यास मदत होणार आहे.

         कृषी विभागाने जिल्हयातील 6 तालुक्यात कृषी उपचारनिहाय आराखडयानुसार 1988 कामे प्रस्तावित केली आहे. यामध्ये वाशिम तालुका- 411, रिसोड तालुका- 191, मालेगांव तालुका- 345, मंगरुळपीर तालुका- 614, मानोरा तालुका- 230 आणि कारंजा तालुक्यातील 197 कामांचा समावेश आहे. आराखडयानुसार या कामावर 67 कोटी 52 लक्ष 10 हजार रुपये खर्च प्रस्तावित आहे. 16 कोटी 37 लक्ष 21 हजार रुपयांचे 401 कामांचे अंदाजपत्रके तयार करण्यात आली आहे. 12 कोटी 65 लक्ष 61 हजार रुपयांच्या 302 कामांना तांत्रिक मान्यता मिळाली असून 2 कोटी 86 लक्ष रुपयांच्या 84 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यापैकी 40 कामांचे 1 कोटी 76 लक्ष रुपयांचे ई-टेंडरींग करण्यात आले असून ही 40 कामे सुरु असून त्यापैकी 12 लक्ष 42 हजार रुपये किमतीची 6 कामे पूर्ण करण्यात आली आहे.  

         आराखडयानुसार कृषी विभागाची सलग समतल चर- 10 कामे, खोल सलग समतल चर- 10 कामे, ढाळीचे बांध- 1222 कामे, अनघड दगडी बांध- 30 कामे, सुधारीत गॅबिअन स्ट्रक्चरची- 103 कामे, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 323 शेततळे, प्रधानमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 46 शेततळे, एमआयडीएच योनजेतून 2 शेततळे, 40 माती नाला बांध, नवीन साखळी सिमेंट बांध- 16 कामे, सिमेंट बांध दुरुस्तीची 32 कामे, सिमेंट नाला बांध खोलीकरणाची 106 कामे, माती नाला बांध दुरुस्तीची 47 कामे आणि माती नाला बांधातील गाळ काढण्याचे एक काम प्रस्तावित आहे.

         कृषी विभाग जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून शेतीतील पिकांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी, भूजल पातळीत वाढ करण्यासाठी, विकेंद्रीत जलसाठे तयार करण्यासोबतच संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्याचे मोठे काम या 166 गावात होणार आहे. कृषी विभागाच्या 14 प्रकारच्या उपचार पध्दतीमुळे या गावातील शेतीचे चित्र बदलण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात या अभियानामुळे वाढ होईल.

           प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 मुळे जिल्हयातील वाशिम, मालेगांव आणि मंगरुळपीर तालुक्यात सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे. आराखडयानुसार वाशिम तालुक्यात 108 कामे 3 कोटी 11 लक्ष रुपये, मालेगांव तालुक्यात 3 कोटी 68 लक्ष 99 हजार रुपयांची 118 कामे, आणि मंगरुळपीर तालुक्यात 93 कामांसाठी 3 कोटी 79 लक्ष रुपये असे एकूण तीन तालुक्यातील 319 कामांसाठी 10 कोटी 59 लक्ष 41 हजार रुपये आराखडयानुसार प्रस्तावित आहे. कृषी विभागाने या तीन तालुक्यातील 4 कोटी 77 लक्ष रुपयाचे 130 कामांचे अंदापत्रके तयार केले आहे. एवढयाच कामांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे. 2 कोटी 83 लक्ष रुपयांच्या 80 कामांना तांत्रिक मान्यता दिली असून 1 कोटी 76 लक्ष रुपयांची 40 कामे सुरु आहे. 10 लक्ष 17 हजार रुपयांची तीन कामे पूर्ण झाली आहे.

          जलयुक्त शिवार अभियान आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून कृषी विभागाच्या शेतीतून उत्पादन वाढीसाठी प्रस्तावित आराखडयातील कामातून 166 गावातील शेतकऱ्यांचे जीवनमान भविष्यात निश्चितच बदललेले दिसतील.   

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे