तातडीने सुरु करा जलयुक्त शिवारची कामे जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन




तातडीने सुरु करा जलयुक्त शिवारची कामे

                                                               जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन

       वाशिम, दि. 16 (जिमाका) : जिल्हयात सुक्ष्म सिंचनाचा वापर वाढविण्यासोबतच पाण्याच्या ताळेबंदाच्या माध्यमातून जल साक्षरता वाढविणे गरजेचे आहे. येत्या पावसाळयात पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी संरक्षित करण्यासाठी आणि विकेंद्रीत जलसाठे निर्माण करुन संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासोबतच जलस्त्रोतांची साठवण क्षमता पुनर्स्थापित करण्यासाठी तातडीने जलयुक्त शिवार अभियानाची कामे यंत्रणांनी सुरु करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.

          जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जलयुक्त शिवार अभियान 2.0, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, जलशक्ती अभियान 2023 आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा आढावा आजा आयोजित सभेत घेतांना श्री. षण्मुगराजन बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांची प्रमुख उपस्थिती होती.

          श्री. षण्मुगराजन पुढे म्हणाले, या अभियानाची अंदाजपत्रके त्वरीत तयार करावी. यंत्रणांचे आराखडे तयार असून वॉटर बजेटिंग देखील तयार आहे. ज्यांची अंदाजपत्रके तयार आहे, त्यांनी प्रशासकीय मान्यता मिळवून घ्यावी. जलयुक्त शिवार अभियानासाठी निधी हा जिल्हा नियोजन समिती व जलयुक्त निधीमधून ही कामे करण्यात यावी. यंत्रणांनी 90 टक्के कामे जलयुक्त शिवार अभियानासाठी करण्यात यावी. या अभियानाची जास्तीत जास्त यंत्रणांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी. त्यामुळे या अभियानाला लोकांचा सहभाग मोठया प्रमाणात मिळण्यास मदत होणार आहे. असे ते म्हणाले.

         जलशक्ती अभियानाबाबत बोलतांना श्री. षण्मुगराजन म्हणाले, या अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या कामांचे जिओ टॅगींग फोटो संबंधित पोर्टलवर अपलोड करावीत. यंत्रणांनी आपले उद्दिष्ट निश्चित करुन आराखडा तयार करावा. सप्टेंबरपर्यंत जलशक्ती अभियानाची कामे पूर्ण करावीत. येत्या दोन दिवसात सर्व यंत्रणांनी जलशक्ती अभियानाची आराखडे मृद व जलसंधारण विभागाकडे सादर करावी. यंत्रणांनी मोठया प्रमाणात वृक्ष लागवडीची कामे हाती घेतांना वृक्ष संवर्धनाकडे देखील लक्ष दयावे. रेनवॉटर हार्वेस्टिंगची कामे करतांना शासकीय इमारतीवर तसेच शाळांवर ही कामे प्राधान्याने करावी. असे त्यांनी यावेळी सांगितले.

          यावेळी संबंधित यंत्रणांनी त्यांच्यामार्फत जलशक्ती अभियान 2023, जलयुक्त शिवार अभियान 2.0, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना याबाबत करण्यात येत असलेल्या कामाची माहिती दिली. सभेला वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, कारंजा उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे, मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, सर्व गटविकास अधिकारी, सर्व उपविभागीय जलसंधारण अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच तालुका पातळीवर या योजनांशी संबंधित काम करणाऱ्या यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. 

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे