विधी दुतांनी गावागावात कायदे कायदेविषयक जनजागृती करावी न्या.विजय टेकवाणी
विधी दुतांनी गावागावात कायदे कायदेविषयक जनजागृती करावी
न्या.विजय टेकवाणी
वाशिम दि.०२(जिमाका) गावा गावात विविध प्रकारचे वाद उद्भवत असतात. त्यावेळी गावातील वाद समुपदेशाने मिटवण्यासाठी विधीदूतांनी गावागावात जनजागृती करून कायदेविषयक माहिती देत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. विजय टेकवाणी यांनी केले.
न्याय विभाग भारत सरकार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,यशदा पुणे व जिल्हा परिषद वाशिम यांच्या संयुक्त वतीने आज नवीन आयुडीपी कॉलनी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या,विदाता भवन येथे आयोजित दिशाअंतर्गत विधी साक्षरता व जागरूकता प्रशिक्षण कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशदा पुणेचे सत्र संचालक डॉ.रामप्रसाद पोले यांनी केले.
यावेळी मुख्य लोक अभिरक्षक ऍड.परमेश्वर शेळके यांनी महिलाविषयक कायद्याबाबत माहिती दिली.उपमुख्य लोक अभीरक्षक ऍड.वर्षा रामटेके यांनी बालमजुरी व बालकांचे कायदेबाबतची माहिती दिली. सहाय्यक लोक अभिरक्षक ऍड. हेमंत इंगोले यांनी सक्तीचे शिक्षण,बालविवाह बंदी कायद्याबाबत माहिती दिली. विधि स्वयंसेवक सुशील भिमजीयाणी यांनी भारतीय संविधान मूलभूत हक्क व कर्तव्ये या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यशदा पुणेकडून राज्यातील ४ विकासोन्मुख जिल्ह्यातील निवडक ग्रामपंचायतस्तरीय विधिदूत यांना विधी साक्षरता व जागरूकता प्रशिक्षण दिले जाणार आहे. यशदाच्या विधी प्रशिक्षणाकरिता वाशिम जिल्ह्यातील निवडक ग्रामपंचायतचे सरपंच,बचत गटाच्या अध्यक्ष,बाल संरक्षण समितीच्या अध्यक्ष, सामुदायिक संसाधन व्यक्ती
(सी.आर.पी) महिला व पुरुष उपस्थित होते.सूत्रसंचालन पीएलव्ही प्रभू कांबळे यांनी केले.
Comments
Post a Comment