*लसीकरणाचा वेग वाढवून लस न घेतलेल्या व्यक्तींवर दंड आकारा* षण्मुगराजन एस.
*लसीकरणाचा वेग वाढवून लस न घेतलेल्या व्यक्तींवर दंड आकारा*
षण्मुगराजन एस.
व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तालुका यंत्रणांचा लसीकरण आढावा
वाशिम दि.4 (जिमाका) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लस घेणे हा एकमेव उपाय आहे हे महत्व नागरिकांना पटवून द्यावे.शासनाच्या 27 नोव्हेंबरच्या आदेशाने पात्र व्यक्तींना लस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासोबतच ओमिक्रॉन या नव्या विषाणूचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढवून येत्या 10 डिसेंबरपर्यंत पहिल्या डोसचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे व लस न घेतलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.त्यांना घराबाहेर निघण्यास व प्रवासास प्रतिबंध करण्यात यावा.असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.
3 डिसेंबर रोजी कोविड लसीकरण आणि 27 नोव्हेंबरच्या शासनाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने तालुकास्तरीय यंत्रणांचा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आढावा घेतांना आयोजित बैठकीत श्री.षण्मुगराजन बोलत होते.यामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धर्मपाल खेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अविनाश आहेर, नोडल अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी सुनील विंचनकर, सुहासिनी गोणेवार, कारंजा उपविभागीय अधिकारी राहुल जाधव व मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी श्री. मुळे प्रामुख्याने सहभागी होते.
श्री.षण्मुगराजन म्हणाले, लसीकरण मोहिमेत समन्वयाचा अभाव नसावा. सुट्टीच्या दिवशीही लसीकरण मोहीम राबवावी.लसीकरण टीम संबंधित गावात वेळेत पोचल्या पाहिजे. ज्या गावांची लोकसंख्या जास्त आहे आणि तिथे लस न घेणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त आहे अशा गावांमध्ये संबंधित गावात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी भेट देऊन लस घेण्यास नागरिकांना प्रोत्साहित करावे. संपूर्ण दिवसभर लसीकरण टीम या गावांमध्ये असावी. गावपातळीवर काम करणाऱ्या संबंधित गावातील कर्मचाऱ्यांना गावाची संपूर्ण लसीकरणविषयक माहिती असावी. ज्या गावांमध्ये जास्त लसीकरण करणे बाकी आहे, अशा गावांमध्ये लसीकरण पूर्ण होईपर्यंत तर लसीकरण केंद्र सुरु असावी असे ते म्हणाले.
कोविड अनुरूप वर्तनाचे पालन, लसीकरणाची आवश्यकता, लसीकरण झालेल्या व्यक्तींना प्रवासाची मुभा, कार्यक्रम व समारंभ आदींच्या उपस्थितीवरील निर्बंध आणि नियम व दंड आकारण्याबाबत शासनाने 27 नोव्हेंबर रोजी आदेश काढला असून या आदेशाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी असे सांगून श्री.षण्मुगराजन म्हणाले, गावपातळीवर या आदेशाची व्यापक प्रसिद्धी ग्रामस्थांपर्यंत झाली पाहिजे. दवंडीच्या माध्यमातून ग्रामस्थांना या आदेशाबाबतची माहिती द्यावी. लसीकरण न झालेले लोक गावात किती बाकी आहे याची माहिती प्रत्येक घरी जाऊन गावपातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घ्यावी. मतदारयादीतील बुथनिहाय किती लोक गावात आणि बाहेरगावी आहे याचा शोध घेण्यासाठी आशा व अंगणवाडी सेविकांची मदत घ्यावी असे ते म्हणाले.
सार्वजनिक ठिकाणी व दुकानांमध्ये लस घेतल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही याबाबतची माहिती ग्रामस्थांना व नागरिकांना देण्यात यावी असे सांगून श्री.षण्मुगराजन म्हणाले, ज्या दुकानदाराने किंवा ग्राहकाने लस घेतली नसेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. पेट्रोल पंपासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात अशा ठिकाणी लस न घेतलेल्या व्यक्तींवर कारवाई करून तेथेच लसीकरण केंद्र सुरू करावे. कोणत्याही परिस्थितीत पहिल्या रोजचे 100 टक्के लसीकरण 10 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावे. काही अडचणी असल्यास त्याबाबत अवगत करावे, असे त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment