*जिल्हा रस्ता सुरक्षेबाबत सभा संपन्न*
*जिल्हा रस्ता सुरक्षेबाबत सभा संपन्न*
वाशिम दि.02(जिमाका) जिल्हा रस्ता सुरक्षेबाबत जिल्हास्तरावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली 2 डिसेंबर रोजी वाकाटक सभागृह येथे सभा संपन्न झाली.सभेला अप्पर पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धर्मपाल खेडकर, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद व शिक्षणाधिकारी रमेश तांगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन म्हणाले, जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांची पोलीस स्टेशन निहाय नोंद घ्यावी. अपघातांना आळा घालण्यासाठी वाहनचालकांमध्ये जागरूकता आणावी. वाहतूक नियमांचे पालन केले जावे. मर्यादित वेगात वाहन चालविणेबाबत वाहन चालकाला सांगावे. जिल्ह्यातील शहरी भागात कोणत्या ठिकाणी ट्रॉफीक सिग्नलची आवश्यकता आहे, त्याबाबत ठिकाण निश्चित करून करून कार्यवाही करावी. जिल्ह्याच्या ठिकाणी अपघात जास्त होतात,अशा ठिकाणांची ओळख करून त्या ठिकाणी रुग्णवाहिकेची व्यवस्था कशा प्रकारे करता येईल याचे नियोजन आरोग्य विभागाने करावे. कोणत्या ठिकाणी गतिरोधकाची आवश्यकता आहे, ते ठिकाण निश्चित करून शासन निर्णयानुसार कारवाई करण्यात यावी. असे त्यांनी सांगितले.
ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात अशा ठिकाणांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी असे सांगून श्री.षण्मुगराजन म्हणाले, वाशिम शहरात पुसद नाक्यावर वाहतुकीची कोंडी होणार नाही, याबाबत नियोजन करावे. रस्ता सुरक्षेशी संबंधित यंत्रणांनी आपआपली जबाबदारी पार पाडावी. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा. रस्ता सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांची गावातून रॅली काढण्यात यावी,असे ती म्हणाले.
श्री. हिरडे म्हणाले,जिल्ह्यात रस्ता सुरक्षेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाकडून अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात नवीन ब्लॅक स्पॉट असेल तर त्याबाबतची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी उपलब्ध करून द्यावी,असे त्यांनी सांगितले.
सभेत परिवहन विभाग, पोलीस विभाग, महामार्ग पोलीस विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी अपघातांची संख्या दहा टक्के कमी करणे, दर महिन्याच्या एक तारखेला आयआरएडी या ॲपवर पोलीस विभागाकडून अपघातांची माहिती अपलोड करणे, जिल्ह्यातील नवीन ब्लॅक स्पॉट निश्चित करणे, वाहतुकीची कोंडी दूर करून सिग्नल बसविणे, अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होऊन वैद्यकीय मदत मिळणे, आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसविणे, वाहतूक चिन्हे बसविणे, अवैध गतिरोधक काढणे आणि संयुक्त तपासणी मोहीम राबविणे या विषयावर सभेत चर्चा करण्यात आली.
सभेला राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक यांचे प्रतिनिधी निलेश नलावडे, वाशिम तहसीलदार विजय साळवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता एन.एस. देशपांडे, उपविभाग राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक अभियंता एस. एच.अली, राज्य मार्ग परिवहन महामंडळ अकोला विभाग नियंत्रक यांचे प्रतिनिधी वाशिम आगार प्रमुख विनोद इलमे, महामार्ग पोलीसचे पोलीस उपनिरीक्षक गजानन गिरी, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जयकांत राठोड, शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नागेश मोहोड व राष्ट्रीय महामार्गाचे बी एम कसबे उपस्थित होते.
Comments
Post a Comment