पोलीसांच्या कामामध्ये पोलीस पाटीलांचे योगदान महत्वाचे -पोलीस अधिक्षक बच्चन सिंह पोलीस पाटील यांची आढावा सभा
पोलीसांच्या
कामामध्ये पोलीस पाटीलांचे योगदान महत्वाचे
-पोलीस अधिक्षक बच्चन सिंह
पोलीस पाटील यांची आढावा सभा
वाशिम, दि. 23
(जिमाका) : गावपातळीवर पोलीस पाटील हा पोलीस दलाचा
महत्वाचा घटक आहे. पोलीस पाटील हे गाव आणि पोलीस यांच्या मधील महत्वाचा दुवा आहे.
कोरोना काळात गावपातळीवर पोलीस पाटीलांनी मोलाची कामगीरी पार पाडली. पोलीसांच्या
कामाध्ये पोलीस पाटीलांचे योगदान महत्वाचे आहे. असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक बच्चन
सिंह यांनी केले.
आज 23 डिसेंबर रोजी पोलीस
पाटलांच्या अडचणी व प्रश्न जाणून घेण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस पाटील
यांची आढावा सभा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरुन श्री. सिंह बोलत होते. अपर
पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
श्री. सिंह मार्गदर्शन करतांना
म्हणाले, जिल्हयात एकूण पोलीस पाटील यांची 682 पदे आहे. त्यापैकी 443 पोलीस पाटील
सध्या कार्यरत आहे. 249 पोलीस पाटील यांची रिक्त असलेली पदे भरण्याबाबत संबंधित
विभागासोबत पत्र व्यवहार करण्यात येत आहे. पोलीस पाटील यांचे ऑक्टोबर 2021
पर्यंतचे तीन महिन्याचे प्रलंबित मानधन निकाली काढण्यात आले आहे. पोलीस पाटील
यांना काम करीत असतांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करण्यात येईल. दृष्टी
संकल्पनेतून सर्व समावेशक पोलीस पेट्रोलींग दरम्यान ग्राम भेट हे मॉडेल सुरु
करण्यात आले आहे. यामध्ये पोलीस अधिकारी आणि अंमलदार जिल्हयातील सर्व 789 गावांना
भेट देतील. भेटी दरम्यान गावात असलेले जातीय प्रकारचे वाद, पाणी, जमीन,
धार्मिकस्थळ व स्मशानभूमि इत्यादीबाबत असलेले वाद याबाबतची सत्य माहिती पोलीस
अधिकाऱ्यांना पोलीस पाटील यांनी दयावी. असे आवाहन श्री. सिंह यांनी केले.
पोलीस पाटील यांच्या कार्याचा
नियमित आढावा घेण्यात येईल, असे सांगून श्री. सिंह म्हणाले, कर्तव्यात निष्काळजी व
हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस पाटीलांची गय केली जाणार नाही. प्रशंसनीय कामगिरी
करणारे पोलीस पाटील यांच्या कार्याची दखल घेतली जाईल. गावातील दैनंदिन
घडामोडीबाबतची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस पाटील यांनी दयावी.
गावातील सराईत गुन्हेगार यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. गावात गुन्हा घडल्यास
पोलीस अधिकारी यांना तात्काळ माहिती दयावी. तसेच पोलीस पाटलांनी नेहमी तटस्थ
भूमिका पार पाडून वस्तूनिष्ठ माहिती पोलीसांना दयावी असे त्यांनी सांगीतले.
कोरोना प्रादुर्भावाचा सामना करीत
असतांना जिल्हयातील तीन पोलीस पाटलांना वीर मरण आले. यावेळी त्यांना श्रध्दांजली
अर्पण करण्यात आली. पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष शामराव राठोड, कारखेडाचे
पोलीस पाटील वासुदेव सोनोने व कार्लीच्या पोलीस पाटील छाया डहाके यांनी पोलीस
पाटील कामकाजाबाबत मनोगत व्यक्त केले.
श्री. भामरे यांनी पोलीस पाटील
यांना त्यांचे कर्तव्य व अधिकाराबाबत मार्गदर्शन केले. तसेच पोलीस पाटील यांचे
पोलीस दलात असलेले महत्व समजावून सांगीतले. जिल्हयातील जवळपास 200 पोलीस पाटील या
सभेला उपस्थित होते.
*******
Comments
Post a Comment