*जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी केली ई- पीक पाहणी व लसीकरण केंद्राला भेट*
*जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी केली ई- पीक पाहणी व लसीकरण केंद्राला भेट*
वाशिम दि 24(जिमाका) जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 24 डिसेंबर रोजी रिसोड तालुक्यातील रिठद शिवारातील वसंता आरु आणि विठ्ठल ढोरे या शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देऊन रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केली. तसेच येवती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी तहसीलदार अजित शेलार प्रामुख्याने उपस्थित होते.
शेतकरी वसंता आरू यांच्या शेतातील गहू आणि विठ्ठल ढोरे यांच्या शेतातील हरभरा पिकाची ई -पीक पाहणी करून जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यावेळी म्हणाले की, प्रत्येक शेतकऱ्याने खरीप आणि रब्बी हंगामात ई- पीक पाहणी केली पाहिजे. अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील ई- पीक पाहणी करता येते. शासनाने त्यासाठी एक पीक पाहणी ॲप्स तयार केला आहे. ई - पीक पाहणी करून त्यामध्ये पिकांची नोंद घ्यावी. जर पिकांचे काही नुकसान झाले तर नुकसान भरपाई मिळणे सोयीचे होते. प्रशासनालासुद्धा नुकसान भरपाई देण्यास सुलभ होते असे त्यांनी उपस्थित शेतकर्यांना सांगितले.
तुरीवर आलेल्या रोगामुळे तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी यावेळी दिली. ही माहिती आपल्याला असल्याचे सांगून श्री षण्मुगराजन यांनी या शिवारातील देखील तूर नुकसानीची पाहणी केली. 31 डिसेंबर 2021 पर्यंत जिल्ह्यात ई - पीक पाहणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले. आजच जिल्हाधिकारी कार्यालयात पीक नुकसानीच्या संबंधाने कृषी विभागाचे अधिकारी आणि पिक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
यावेळी तलाठी धनंजय काष्ठे,शेतकरी धनंजय बोरकर, कैलास आरु, उत्तम आरू, बालाजी बोरकर, राजू बोरकर, गजानन शर्मा, राजू आरु, अशोक आरु, स्वप्नील बोरकर, विजय बोरकर अंभोरे गुरुजी यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.
श्री.षण्मुगराजन यांनी येवती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला भेट दिली.यावेळी तहसीलदार अजित शेलार,ग्रामसेवक श्री. खिल्लारे, आरोग्य सेवक श्री. थोरात,आरोग्य सेविका श्रीमती कुटे, व अंगणवाडी सेविका शालिनी जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तींशी देखील जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांनी संवाद साधून गावात किती व्यक्ती लसीकरणासाठी पात्र आहे, गावातील किती व्यक्तींनी पहिला आणि दुसरा डोस घेतला, कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या कीती व्यक्तीनी लस घेतली आहे, अद्याप किती व्यक्ती लस घेण्यास बाकी आहे याबाबतची माहिती त्यांनी ग्रामसेवक श्री. खिल्लारे व अंगणवाडी सेविका श्रीमती जाधव यांच्याकडून घेतली.
ज्यांनी अद्यापही लस घेतली नाही, त्यांच्या घरी कर्मचाऱ्यांनी जाऊन त्यांना लस घेण्यास प्रोत्साहित करावे. अन्यथा घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास अशा व्यक्तींना प्रतिबंध करावा. ज्यांनी डॉक्टरांचे कारण सांगून लस घेतली नाही, त्यांच्याकडे असे डॉक्टरांचे प्रमाणपत्र असल्याची कर्मचाऱ्यांनी खात्री करावी. ज्या डॉक्टरांकडे ते उपचार करण्यासाठी जातात त्याच डॉक्टरांकडून त्यांना लस घेण्यासाठी आम्ही कळविणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांनी यावेळी सांगितले.
Comments
Post a Comment