आजच्या लोक अदालतीत 934 प्रकरणे निकाली*

*आजच्या लोक अदालतीत 934  प्रकरणे निकाली*

*साडेचार वर्षापासून विभक्त राहणाऱ्या पती-पत्नींनी घेतला सोबत राहण्याचा निर्णय* 
                 लोकन्यायालयाचे यश 

वाशीम दि.11(जिमाका) जिल्ह्यात आज 11 डिसेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीचे औपचारिक उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा न्या. श्रीमती शैलजा सावंत यांनी जिल्हा न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीच्या पॅनलला भेट देऊन केले.
         वाशिम जिल्हा न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीमध्ये मोटार अपघात प्राधिकरणाद्वारे प्रलंबित असलेले श्रीराम आणि इतर विरुद्ध संतोष आणि इतर आणि आय.सी.आय.सी.आय, लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सच्या शाखा व्यवस्थापक यांच्यामध्ये न्या.डॉ. श्रीमती रचना तेहरा यांच्या पॅनलवर न्या. श्रीमती सावंत यांच्या समक्ष तडजोड झाली. या खटल्यामध्ये विमा कंपनीने मयत व्यक्तीच्या वारसांना 8 लाख 20 हजार रुपये नुकसान भरपाई दिली. 
         पॅनलवर क्रमांक 4 वर मागील साडेचार वर्षांपासून विभक्त राहत असलेल्या पती-पत्नीमध्ये त्यांच्या प्रलंबित असलेल्या फारकतीच्या प्रकरणामध्ये लोक न्यायालयामध्ये यशस्वी तडजोड झाली. आणि ते पती-पत्नी आज नांदण्यासाठी सोबत घरी गेले. मागील साडेचार वर्षांपासून विभक्त राहत असलेले जोडपे विभक्त होता होता एकत्र आले.
            आजच्या लोक न्यायालयात ठेवण्यात आलेल्या दाखलपूर्व प्रकरणांमध्ये देखील लोकांनी विशेष पुढाकार घेऊन आपली प्रकरणे दाखल करण्यापूर्वीच निकाली काढून घेतली. या लोक अदालतीमध्ये 5667  प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 794 प्रकरणे निकाली निघाली. तसेच दाखलपूर्व 4038 प्रकरणे या अदालतीत ठेवण्यात आली होती. त्यापैकी 140 प्रकरणे निकाली निघाली.जिल्ह्यात एकूण 934 प्रकरणे आजच्या लोक अदालतीत निकाली निघाली असून एकूण 3 कोटी 33 लक्ष 99 हजार 230 रुपये एवढ्या रक्कमेचे प्रकरणे निकाली निघालीत.
       8 ते 10 डिसेंबर 2021असे तीन दिवस जिल्ह्यात विशेष कलमांतर्गत प्रकरणे निकाली काढण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात आली.यामध्ये सर्व न्यायिक अधिकारी यांनी विशेष मेहनत घेऊन 690 प्रलंबित प्रकरणे निकाली काढली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश