मिशन मोडवर लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी व्हावी

मिशन मोडवर लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी व्हावी

                                                                     - षण्मुगराजन एस.

लसीकरणाबाबत तालुका यंत्रणेचा व्हिडीओ कॉन्फरन्सींग आढावा

          वाशिम, दि. 20 (जिमाका) : ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लस घेणे हा एकमेव उपाय आहे. जिल्हयातील कोणताही पात्र व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी कोविड लसीकरण मोहिमेची मिशन मोडवर अंमलबजावणी करण्यात यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.

             आज 20 डिसेंबर रोजी कोविड लसीकरणाबाबतचा तालुका यंत्रणांचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतांना श्री. षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी सर्वश्री संदीप महाजन, सुहासिनी गोणेवार, नितीन चव्हाण, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. धर्मपाल खेळकर, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

            कोविडची पहिली लस घेतलेल्या व्यक्तींना दुसरी लस केंव्हा घ्यायची आहे, याबाबतची माहिती गावपातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला दयावी असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, विहीत कालावधीत दुसरा डोस घेतला पाहिजे. यासाठी त्या व्यक्तीला आरोग्य कर्मचाऱ्याने लक्षात आणून दयावे. गर्भवती महिला व स्तनदा माता यांचे देखील लसीकरण करण्यात यावे. जिल्हयातील जवळपास 10 हजार गर्भवती महिला व स्तनदा माता हया लसीकरणापासून आजही दूर आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन लस घेण्यास त्यांना प्रोत्साहित करावे. त्यांच्या मनात असलेली लसीबाबतची भिती दूर करावी. प्रत्येक गावाच्या ग्रामसेवक व तलाठयाला लसीकरणाबाबची संपुर्ण माहिती असावी. ज्यांना याबाबतची व्यवस्थित माहिती नाही त्यांना त्याबाबत विचारणा करण्यात यावी. प्रत्येक समुदायात यंत्रणांनी पोहोचून ज्यांनी अद्यापही लस घेतली नाही. त्यांना लस घेण्यास प्रोत्साहित करावे असे ते म्हणाले.

             श्री. षण्मुगराजन पुढे म्हणाले, लस घेतलेल्या व्यक्तींची डाटा एन्ट्रीची प्रलंबित कामे त्वरीत पुर्ण करण्यात यावी. तसेच डाटा एन्ट्रीचे व्हेरीफिकेशन करण्यात यावे. 31 जानेवारीपर्यंत दुसरा डोस पुर्ण करण्याचे यंत्रणांनी तालुकापातळीवर नियोजन करावे. लसीकरणाचे वेळापत्रक निश्चित करुन येत्या 31 डिसेंबरपर्यंत 11 दिवसाचे नियोजन करुन पहिला डोस न घेतलेल्या व्यक्तींना तसेच दुसरा डोससाठी पात्र असलेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्यात यावे. लसीकरणाची कामे तालुका यंत्रणांनी गांभिर्याने करावी. मिशन वात्सल्यचा लाभ पात्र व्यक्तींना देण्याच्या दृष्टिने तालुका यंत्रणांनी कार्यवाही त्वरीत पुर्ण करावी. असे त्यांनी सांगीतले.

             श्रीमती पंत म्हणाल्या, पहिल्या डोससाठी ज्याप्रमाणे सुक्ष्म नियोजन करण्यात आले होते तशाच प्रकारचे नियोजन दुसऱ्या डोससाठी करावे. तालुका यंत्रणांनी एकत्र बसून हे नियोजन करुन लसीकरण पुर्ण करावे. दुसऱ्या डोसमध्ये वाढ झालेली दिसून येत नसल्याने गावपातळीवर जनजागृती करण्यात यावी. आशा कार्यकर्तीच्या माध्यमातून घरोघरी जावून दुसरा डोस घेण्यासाठी पात्र व्यक्तींना सांगावे. जिल्हयातील गर्भवती महिला व स्तनदा माता यांचे देखील त्वरीत लसीकरण करण्याची कार्यवाही यंत्रणांनी करावी असे त्यांनी सांगीतले.

             श्री. हिंगे म्हणाले, दुसऱ्या डोससाठी संबंधित व्यक्तीला यंत्रणांनी संपर्क करावा. दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या व्यक्तींच्या भ्रमणध्वनीवर जिल्हाधिकारी यांचा लस घेण्याबाबतचा संदेश पाठविण्यात येणार आहे. तालुकास्तरावर दुसऱ्या डोसचे नियोजन करण्यात यावे. ज्या गावात लस घेण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. याबाबतची पुर्व कल्पना ग्रामस्थांना दयावी. दुसरा डोस, डाटा एन्ट्री करणे आणि पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण करण्याचे नियोजन उद्यापर्यंत सादर करावे असे त्यांनी सांगीतले. या आढावा सभेत सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी सहभागी होते.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश