लस न घेतलेल्या 53 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई* 23 हजार 800 रुपये दंड आकारला
*लस न घेतलेल्या 53 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई*
23 हजार 800 रुपये दंड आकारला
वाशिम दि.4 (जिमाका) राज्य शासनाने 27 नोव्हेंबर रोजी काढलेल्या आदेशाने सर्व पात्र व्यक्तींना लस घेणे बंधनकारक केले असताना जिल्ह्यात काही व्यक्ती लस घेण्यास टाळाटाळ करीत आहे.राज्य शासनाच्या या आदेशाची जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांच्या मार्गदर्शनात कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात आज 4 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या कारवाईत लस न घेतलेल्या 53 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून 23 हजार 800 रुपयांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई महसूल विभागाच्या वतीने करण्यात आली.
लस घेण्यास टाळाटाळ करून ज्यांनी आतापर्यंत लसीचा एकही डोस घेतला नाही, त्यांचा शोध घेऊन जिल्ह्यात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे लस न घेता बिनधास्त फिरणाऱ्या व्यक्तींना लगाम बसणार आहे.
आज कारंजा उपविभागीय अधिकारी यांनी कारंजा शहरात लसीकरण न करता खासगी आस्थापनांमध्ये प्रवेश करणाऱ्या तीन व्यक्तींना प्रत्येकी पाचशे रुपये दंड आणि लस न घेता प्रवाशी वाहतूक करणाऱ्या 7 चालकांना 800 रुपये दंड ठोठावला.
तहसीलदार मालेगाव यांनी शहरातील दहा आणि ग्रामीण भागातील तीन अशा एकूण 13 खासगी आस्थापनांना 6 हजार 500 रुपये, मंगरूळपीर तहसिलदार यांनी शहरातील 9 खासगी आस्थापनांना 4500 रुपये आणि तहसीलदार कारंजा यांनी शहरी भागातील 18 आणि ग्रामीण भागातील 3 अशा एकूण 21 खाजगी आस्थापनांच्या व्यक्तींवर 10 हजार 500 रुपये दंड आकारला.यापुढेही जिल्ह्यात लस न घेतलेल्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment