जिल्हयाच्या संभाव्य वित्त पुरवठा आराखडयाचे विमोचन

 



जिल्हयाच्या संभाव्य वित्त पुरवठा आराखडयाचे विमोचन

           वाशिम, दि. 23 (जिमाका) : जिल्ह्याचा सन २०२२-२३ करीता संभाव्य वित्त पुरवठा आराखड्याचे (पीएलपी : २०२२-२३) प्रकाशन २२ डिसेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या सभेत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, रिजर्व्ह बँकेचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक उमेश भंसाळी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार, विविध बँकांचे अधिकारी आणि विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

               राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डकडून प्रत्येक वर्षी जिल्ह्याचा पत पुरवठा आराखडा तयार करण्यात येतो. यासाठी विविध विभागांकडून माहितीच्या आधारे तसेच जिल्ह्यात उपलब्ध असलेली  सिंचन क्षमता, शेती धारणा, घेतले जाणारे पीक आणि त्याला उपलब्ध असणारी बाजारपेठ, मूलभूत सोई-सुविधा, नवीन सरकारी धोरण आणि शेतीपूरक व्यवसायाच्या संधी इत्यादी बाबींचा लेखाजोखा घेऊन वित्त धोरण ठरविले जाते. या बरोबरच शेती पूरक व्यवसाय, लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना अपेक्षित असलेला कर्ज पुरवठा देखील विचारात घेतला जातो. महिला बचत गट, शेतकरी कंपन्या, ग्रामीण भागातील दळणवळणाची साधने, धान्य साठवण क्षमता, ग्रामीण व्यवसाय वृद्धी  या प्रमुख बाबींचा देखील या आराखड्यामध्ये समावेश आहे. या वित्त आराखड्याचा उपयोग अग्रणी बँकेला जिल्ह्यासाठी वार्षिक पत धोरण निश्चित करण्यासाठी तसेच बँकांना वित्त पुरवठ्यासाठी उपलब्ध होणाऱ्या संधी या करिता होणार आहे.

              सन २०२२-२३ या वर्षाकरीता वाशीम जिल्ह्याचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा एकूण २४६१ कोटी ८४ लक्ष रुपयांचा असून यामध्ये प्रामुख्याने शेती/शेतीपुरक क्षेत्रासाठी २०८२ कोटी ८१ लक्ष, सुक्ष्म/लघु/मध्यम उद्योगासाठी १६६ कोटी ६४ लक्ष आणि इतर प्राथमिक क्षेत्रासाठी २१२ कोटी ३९ लक्ष रुपये प्रस्तावित केले आहेत.

              शेती/शेतीपुरक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने पिक कर्जासाठी १८८७ कोटी ६५ लक्ष, सिंचनासाठी ४९ कोटी ४७ लक्ष शेती यांत्रिकीकरणासाठी ८ कोटी २७ लक्ष, मत्स्य, कुक्कुटपालन, पशुपालन आणि दुग्ध व्यवसायासाठी ६८ कोटी ७८ लक्ष, गोदामे/शीतगृहासाठी २० कोटी ७३ लक्ष, शेतीमाल प्रक्रिया उद्योगांसाठी ५ कोटी ५६ लक्ष प्रस्तावित करण्यात आले आहेत. इतर प्राथमिक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज तसेच जे एल जी /महिला बचत गटासाठी वित्त पुरवठा प्रस्तावित करण्यात आला आहे. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी वित्त आराखड्यात प्रस्तावित केल्याप्रमाणे बँकांनी कर्ज पुरवठा करून जिल्ह्याच्या विकासात हातभार लावण्याचे आवाहन उपस्थित अधिकाऱ्यांना केले.

                                                        
                                                               *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश