विधवा महिला व अनाथ बालकांना विविध योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही करा - जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश जिल्हा कृती दल समितीची सभा

 

विधवा महिला व अनाथ बालकांना

विविध योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही करा

                                         - जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जिल्हा कृती दल समितीची सभा

          वाशिम, दि. 22 (जिमाका) : कोरोना या जागतिक महामारीमुळे अनेकांना आपल्या जवळ
च्या व्यक्तींना गमाविण्याची वेळ आली. कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना स्वावलंबनाने चांगले जीवन जगता यावे तसेच अनाथ झालेल्या बालकांना भविष्यात चांगले शिक्षण घेवून एक जबाबदार नागरीक म्हणून पुढे येण्यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ यंत्रणांनी मिळवून देण्याची कार्यवाही करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.

             आज 22 डिसेंबर रोजी जिल्हा कृती दल समितीची सभा वाकाटक सभागृहात जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. जयश्री गुट्टे, उपमुख कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आलोक अग्रहरी यांची प्रमुख उपस्थित होती.

             श्री. षण्मुगराजन म्हणाले, विधवा महिला व अनाथ बालकांना शासनाच्या 24 योजनांसह इतर योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टिने संबंधित विभागाने नियोजन करुन अंमलबजावणी करावी. मृत्यु झालेल्या महिलांपैकी किती महिलांनी जीवन विमा काढला होता याची माहिती घेऊन मृत महिलांच्या वारसांना लाभ देण्याच्या दृष्टिने विमा कंपन्यांशी संपर्क साधावा. तहसिलदारांनी विशेष मोहिम राबवून बालकांना जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाई तातडीने करावी. बालकांना त्यांच्या मालमत्तेचे मालकी अधिकार देण्याची देखील कार्यवाही करावी. शैक्षणिक शुल्क माफीचे अनाथ बालकांचे प्रस्ताव तातडीने तयार करुन पुढील कार्यवाहीसाठी सादर करावे. मिशन वात्सल्य योजनेची तालुकास्तरावर प्रत्येक आठवडयाला सभा घेऊन जिल्हा कृती समितीला अहवाल सादर करावा, असे त्यांनी सांगितले.

             विधवा महिला व अनाथ बालकांना कौशल्य विषयक प्रशिक्षण देण्याच्या दृष्टिने कौशल्य विकास विभागाने पुढाकार घ्यावा, असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, समाज कल्याण विभागाच्या ज्या विविध योजना आहे त्यापैकी कोणत्या योजनांचा संबंधित महिला व बालकांना लाभ देता येतो, याबाबत सहायक आयुक्त समाज कल्याण यांनी कार्यवाही करावी. मिशन वात्सल्य योजनेचा लाभ संबंधित महिला, पुरुष व अनाथ बालकांना देण्याच्या दृष्टिने महिला व बाल कल्याण विभागाने विशेष लक्ष देऊन काम करावे, असे ते म्हणाले.

             जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. अग्रहरी यांनी कोविड- 19 मुळे एक पालक व दोन्ही पालक गमाविलेल्या 190 बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आल्याचे सांगितले. कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांपैकी 39 महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात आला आहे. दोन्ही पालक गमाविलेल्या 4 बालकांना राज्य शासनाचे एक रक्कमी 5 लक्ष रुपये अर्थसहाय्य मिळण्यासाठी बँकेत खाते उघडण्यात आले आहे. तर या 4 बालकांना केंद्र शासनाच्या एक रक्कमी 10 लक्ष रुपये अर्थसहाय्य मिळण्यासाठी पोस्ट खाते उघडले आहे. 12 बालकांचे शैक्षणिक शुल्क माफ व्हावे. याबाबतची माहिती वरिष्ठांना पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

            जिल्हयात कोविडमुळे  मृत्यु पावलेल्या 640 स्त्री/ पुरुषांची माहिती प्राप्त करुन सदर कुटूंबातील मयत झालेल्यांच्या वारसांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगून श्री. अग्रहरी म्हणाले, एक पालक मृत्युमुखी पावलेल्या 18 वर्षाखालील बालकांची संख्या 186, दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 4, वडील गमावलेल्या बालकांची संख्या 160, आई गमावलेल्या बालकांची संख्या 30, आई-वडील गमावलेले तीन कुटूंब असल्याची माहिती श्री. अग्रहरी यांनी यावेळी दिली.

             सभेला वाशिम तहसिलदार विजय साळवे, रिसोड तहसिलदार अजित शेलार, मंगरुळपीर तहसिलदार नरसैय्या कोंढागुरले, मालेगाव, मानोरा व कारंजा तहसिलदार यांचे प्रतिनिधी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी, (नागरी) श्रीमती मिनाक्षी भस्मे, मंगरुळपीरचे बालविकास प्रक्रल्प अधिकारी एन.एस. लुंगे, कारंज बाल विकास प्रकल्प अधिकारी एम.आर. नायक, मानोरा बाल विकास प्रकल्प अधिकारी पी. व्ही. नन्नावरे, मालेगावचे प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. एस.एच. पदमावार, वाशिमचे प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले, कनिष्ठ संरक्षण अधिकारी रामदास वानखेडे, धीरज उचित, महादेव जऊळकर, गोपाल घुगे, बंडु धनगर यांची उपस्थिती होती.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश