लस घेतलेल्या व्यक्तींकडून लस घेतल्याची खात्री करावी -जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.मालेगांव तालुक्याचा लसीकरण आढावा

लस घेतलेल्या व्यक्तींकडून लस घेतल्याची खात्री करावी

                                                    -जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

मालेगांव तालुक्याचा लसीकरण आढावा

 

वाशिम, दि. 15 (जिमाका) : ओमिक्रॉन विषाणूचा संसर्गाचा धोका लक्षात घेता जिल्हयात सर्वच पात्र व्यक्तींचे कोविड लसीकरण करण्याची मोहिम वेगाने राबविण्यात येत आहे. लसीकरणात मालेगांव तालुका माघारल्यामुळे तालुका यंत्रणांनी सुक्ष्म नियोजनातून सर्वच पात्र व्यक्तींचे पहिल्या व दुसऱ्या डोसचे 100 टक्के लसीकरण त्वरीत करावे. ज्या व्यक्तींनी लस घेतली आहे, त्या व्यक्तींकडून लस घेतल्याची खात्री करण्यात यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.

आज 15 डिसेंबर रोजी नियोजन भवन सभागृहात मालेगांव तालुक्यातील तलाठी व ग्रामसेवकांच्या लसीकरण आढावा सभेत श्री. षण्मुगराजन एस. बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, मालेगांवचे नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, मालेगांव तहसिलदार रवि काळे व गटविकास अधिकारी श्री. खिल्लारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. षण्मुगराज म्हणाले, गावात आणि शहरात संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रत्येक घरी जाऊन भेट दयावी. किती व्यक्तींनी लस घेतली आहे, लस घेण्यापासून किती व्यक्ती बाकी आहे, बाहेरगावी लस घेतली असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र बघणे आवश्यक आहे. लस घेतली असल्याचे सांगून कोणी दिशाभूल करीत असेल यासाठी त्याबाबतची खात्री प्रमाणपत्रावरुन करावी. जे लोक कामानिमित्त किंवा रोजगारानिमित्त बाहेरगावी गेले आहेत त्यांच्याशी तलाठी व ग्रामसेवक यांनी संपर्क करुन लस घेतल्याची खात्री करावी. गावातील लोक कोणत्या डॉक्टरांकडे उपचारासाठी जातात त्या डॉक्टराची नांवे व संपर्क क्रमांक उपलब्ध करुन दयावे. म्हणजे त्या डॉक्टरांना फोन करुन ज्या व्यक्तींने लस घेतलेली नाही त्याला त्या डॉक्टराच्या माध्यमातून लस घेण्यास सांगण्यात येईल. असे ते म्हणाले.

जे व्यक्ती लस न घेता बाहेर फिरत असतील तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरत असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, अशाप्रकारे लस न घेता बिनधास्तपणे फिरणाऱ्या व्यक्तींवर ग्रामपंचायतीने कारवाई करावी. ज्यांना डॉक्टरांनी लस न घेण्याचा सल्ला दिला आहे, त्याबाबतचे डॉक्टरांचे लेखी पत्र त्या व्यक्तींकडून उपलब्ध करुन घ्यावे. अन्यथा त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी. 27 नोव्हेंबरच्या शासनाच्या आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी गावात करण्यासाठी लाऊडस्पीकर व दवंडीच्या माध्यमातून ग्रामस्थांना अवगत करावे. असे त्यांनी सांगीतले.

यावेळी उपस्थित तलाठी व ग्रामसेवक यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये किती व्यक्ती लसीकरणासाठी पात्र आहे, किती व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले, किती व्यक्तींचे लसीकरण करणे अद्याप बाकी आहे, किती व्यक्ती कामानिमित्त बाहेरगावी स्थलांतरीत झाले आहे तसेच किती व्यक्ती आजारी आहेत याबाबतची माहिती दिली. सभेला मालेगांव तालुक्यातील तलाठी व ग्रामसेवक उपस्थित होते.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश