कोविड दिलासा पॅकेजअंतर्गत आर्थिक मदतीसाठी प्रयोगात्मक कलावंतांकडून 31 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले

 

कोविड दिलासा पॅकेजअंतर्गत आर्थिक मदतीसाठी

प्रयोगात्मक कलावंतांकडून 31 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले

 

            वाशिम दि.27 (जिमाका) प्रयोगात्मक कलेच्या प्रकारातील कलावंतांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्यावतीने कोविड दिलासा पॅकेजअंतर्गत अर्थसहाय्य करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून 31 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहे. इच्छुक कलावंतांनी त्यांचे विहित नमुन्यातील अर्ज पुढील तारखेपर्यंत संबंधीत तहसिल कार्यालय येथे निवासी नायब तहसिलदार यांचेमार्फत जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावे.

          कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू होता. तसेच, लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतरही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, नाट्यगृहे, चित्रपटगृहे यांच्यावर बंदी असल्याने कलाकारांना सुमारे दीड वर्षापर्यंत कला सादरीकरण व त्यातून होणारे उत्पन्न यापासून वंचित राहावे लागले. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रमही या काळात स्थगित करण्यात आले होते. या काळात सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील संघटीत व असंघटीत कलाप्रकारातील विविध कलाकार, ज्यांचे उपजीविकेचे साधन केवळ सांस्कृतिक कार्यक्रम व कला सादर करणे असे आहे, त्यांची आर्थिक कुचंबना झाल्याने संघटित व असंघटित क्षेत्रातील प्रयोगात्मक कला प्रकारातील कलावंतांना शासनाच्यावतीने एकरकमी आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने 3 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयातून घेतला आहे. 

           पात्र एकल लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरील समितीने पात्र केलेल्या कलावंतांची यादी विहित तपशीलासह संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांचेकडे सादर केल्यानंतर त्यांचेमार्फत पात्र लाभार्थांच्या बँक खात्यात अनुज्ञेय अर्थसहाय्य वर्ग करण्यात येणार आहे.

          कोविड दिलासा पॅकेजसाठी एकल कलाकारांकरीता पात्रता निकष व अटी पुढीलप्रमाणे आहे. जिल्हयातील प्रयोगात्मक कलेतील केवळ कलेवर गुजराण असणारे आर्थिकदृष्टया दुर्बल कलाकार अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांचे महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य असावे, कलेच्या क्षेत्रात 15 वर्षे कार्यरत असावे, वार्षिक उत्पन्न रुपये 48 हजारच्या कमाल मर्यादेत असावे. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृध्द कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्याच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देता येणार नाही.

       एकल कलावंताने अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे : 3 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयातील परिशिष्ट-ब-1 नुसार विहित नमुन्यातील अर्ज, महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्याचा रहिवासी दाखला यात स्थानिक स्वराज्य संस्थेचा दाखलाही ग्राह्य राहील. तहसिलदारांकडून प्राप्त उत्पन्नाचा दाखला, कलेच्या क्षेत्रात 15 वर्षे कार्यरत असल्याबाबतचे पुरावे, आधार कार्ड व बँक खाते तपशील, शिधापत्रिका सत्यप्रत अर्जासोबत जोडावी.

          समुह लोककलापथकांचे चालक, मालक, निर्माते यांनी 3 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयातील परिशिष्ट-ब-2 नुसार सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे अर्ज सादर करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त एकल कलावंतांनी आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव संबंधित तहसिल कार्यालयात निवासी नायब तहसिलदार यांचेकडे सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

                                                                             *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश