ऍड. संगीता चव्हाण यांची पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट
ऍड. संगीता चव्हाण यांची पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट
वाशिम दि.०७ (जिमाका) राज्य महिला आयोगाच्या सदस्या ऍड.संगीता चव्हाण यांनी ४ जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.यावेळी सहाय्यक पोलिस अधीक्षक श्रीमती कृतिका,वाशिम उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित सभेत ऍड.श्रीमती चव्हाण यांनी महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती घेतली.पोलीस प्रशासनाकडून महिला तक्रारदार, पीडित व गरजू महिलांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा आढावा घेतला. यावेळी ऍड.चव्हाण यांनी महिला सुरक्षा विशेष कक्षाला भेट देऊन कक्ष अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वाती इथापे यांच्याकडून कक्षाच्या कामकाजाची माहिती घेतली.कक्षाला एकूण किती तक्रारी प्राप्त झाल्या, किती तक्रारींचा निपटारा केला तसेच किती तक्रारी समोपचाराने सोडविल्या याची माहिती घेतली.
तसेच डायल ११२ येथे प्राप्त झालेले कॉल व प्रतिसाद वेळ याबाबत ऍड.श्रीमती चव्हाण यांनी विचारणा केली असता मागील २० महिन्यामध्ये प्रतिसादाची वेळ २० मिनिटांवरून ६ मिनिटापर्यंत कमी करण्यात आल्याचे सांगितले.सेवा टॅब प्रणालीचे कामकाज सेवा टॅबमध्ये घेण्यात येणारा तक्रारीची माहिती व कशाप्रकारे या माहितीचा निपटारा करण्यात येतो याबाबतची देखील माहिती त्यांनी घेतली.जिल्हास्तरावर व प्रत्येक पोलीस स्टेशनस्तरावर निर्भया पथक स्थापन करण्यात आले असून निर्भया पथकातील नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना पुरविण्यात आलेली वाहने याबाबतची माहिती श्रीमती चव्हाण यांना देण्यात आली.निर्भया पथकाने आजपर्यंत केलेले जाणीव जागृती कार्यक्रम,शाळा महाविद्यालयांना देण्यात आलेल्या भेटी तसेच निर्भया पथक करत असलेल्या पेट्रोलिंगची माहिती यावेळी दिली.
" दृष्टी " प्रणाली ही क्यूआर कोड स्कॅनिंग,गस्त पेट्रोलिंग वाहनाची जीपीएस प्रणालीद्वारे पर्यवेक्षण, ग्रामभेट,फिक्स पॉईंट बंदोबस्त या चार घटकांवर आधारित असून ही या प्रणालीची वैशिष्ट्य असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्री.सिंह यांनी दिली. सभेला पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकारी,महिला अंमलदार व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment