मिशन लक्षवेध उपक्रम क्रीडा साहित्याची माहिती मागविली




मिशन लक्षवेध उपक्रम

क्रीडा साहित्याची माहिती मागविली

        वाशिम, दि. 14 (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने राज्यातील क्रीडा विकासाकरीता मिशन लक्षवेध हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील खेळ व खेळाडु,क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडाविषयक पायाभुत सुविधा, क्रीडा स्पर्धेचे आयोजन,क्रीडा वैद्यकशास्त्र, खेळाडूंना प्रोत्साहन व पुरस्कार, खेळाडूंना करीअर मार्गदर्शन, खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देश-विदेशी संस्थांचा सहयोग हे सर्व घटक विकसित करणे अभिप्रेत आहे. हे घटक विकसित करण्याकरीता आवश्यक प्रयत्न जिल्हास्तरावरुन होणे अपेक्षित आहे.

            मिशन लक्षवेधअंतर्गत राज्यातील सर्वोच्च कामगिरी असणाऱ्या क्रीडा प्रकारांना प्राधान्याने विकसित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनामार्फत मान्यता देण्यात आलेल्या क्रीडा प्रकारांचे गत दोन ऑलिंपिक, एशियन गेम्स व कॉमनवेल्थ गेम्समधील कामगिरीच्या आधारावर वर्गीकरण करण्यात आले आहे. या वर्गीकरणानुसार 'अ' वर्गात एकुण १२ क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. १२ क्रीडा प्रकार  एथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, कुस्ती, वेटलिफ्टिींग, शुटींग, रोईंग, सेलिंग, टेबल टेनिस व लॉन टेनिस आदी क्रीडा प्रकारांना विकसित करण्याकरीता या क्रीडा प्रकारांशी संबंधित प्रत्येक घटकाचा विकास प्राथमिक स्तरापासुन होणे आवश्यक आहे.

            जिल्हयातील शाळा, संस्था, महाविद्यालये, खाजगी संस्था, क्रीडा मंडळे, एकविध खेळ संघटना, विविध शासकीय कार्यालयाच्या अधिनस्त असलेले वरील खेळांच्या सुविधांची माहिती तसेच आजपर्यंत आपल्या अधिनस्त किंवा आपण घडवलेल्या खेळाडूंचा स्तर याबाबतची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करावी. तसेच या खेळ प्रकारामध्ये आपणाकडे सराव करीत असलेले आजपर्यंत उपलब्ध खेळाडू किंवा प्रशिक्षण केंद्रात असलेल्या खेळाडूंना स्पोर्टस् सायन्स अद्यावत क्रीडा प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याबाबत शासनस्तरावर उपक्रम राबविण्यात येणार आहे. तरी आपल्याकडे उपलब्ध असलेले क्रीडा साहित्य व त्यांची सद्यस्थिती क्रीडांगणाचे ठिकाण/ प्रशिक्षण केंद्राचे ठिकाण, क्रीडा मार्गदर्शक उपलब्ध आहे किंवा नाही याबाबतची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास उपलब्ध करुन द्यावी. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे