नर्मदा सॉल्व्हेक्सकडून 44 क्षयरुग्ण दत्तक आवाहनाला दानशूर व्यक्ती व संस्थांकडून प्रतिसाद




नर्मदा सॉल्व्हेक्सकडून 44 क्षयरुग्ण दत्तक

आवाहनाला दानशूर व्यक्ती व संस्थांकडून प्रतिसाद

        वाशिम, दि. 07 (जिमाका) : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत आज 7 जुलै रोजी नर्मदा सॉल्व्हेक्स प्रा.लि. उद्योग, वाशिम यांनी 44 क्षयरुग्णांना दत्तक घेऊन पोषण आहाराचे वाटप केले. प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियानामध्ये ‘निक्षय मित्र’ नर्मदा सॉल्व्हेक्स, वाशिम यांनी 44 क्षयरुग्णांना दत्तक घेतले आहे. तालुका क्षयरोग पथक वाशिम (टीयु) अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपचार घेत असलेल्या 44 क्षयरुग्णांना सामाजिक बांधिलकी आणि क्षयरोग मुक्त भारत अभियानास सहाय्य म्हणून पुढील ६ महिने नर्मदा सॉल्व्हेक्स 'निक्षय मित्रा' कडून पोषण आहार देण्यात येणार आहे. 

           जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.काळबांडे, व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. परभणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नर्मदा सॉल्व्हेक्सचे संचालक संजय रुहाटिया, एच. आर.मॅनेजर, शहाजी सोनुने व रविंद्र शर्मा यांच्या हस्ते पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. 

         हा कार्यक्रम संजय रुहाटिया व जिल्हा क्षयरोग कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रुईकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सर्व रुग्णांनी नियमित उपचार घेऊन बरे व्हावे. देश क्षयरोग मुक्त करण्यासाठी शासनासोबतच समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा असल्याचे श्री. रुहाटिया यांनी सांगितले. जिल्हा क्षयरोग कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रुईकर यांनी क्षयरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार असून नियमित उपचारासोबत पोषक आहार घेणे आवश्यक असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

       वैद्यकीय अधिकारी डॉ. रुईकर व जिल्हा कार्यक्रम समन्वयक श्री. लोणसूने यांनी नर्मदा सॉल्व्हेक्स प्रा. लि. वाशिम यांनी क्षयरुग्णांना दत्तक घेऊन पोषण आहार वाटप केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. यापुढे देखील अधिकाधिक क्षयरुग्णांना पोषण आहार मिळवुन देण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन करुन करुन उपस्थितांचे आभार मानले.

        कार्यक्रमाला जिल्हा कार्यक्रम समन्वयक श्री. लोणसूने, जिल्हा पब्लिक प्रायव्हेट मिक्स समन्वयक श्री. सोनुने वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक श्री. सोनुने, टीबी हेल्थ विझिटर श्री. शिंदे व नर्मदा सॉल्व्हेक्स प्रा. लि. चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

         जिल्हा क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत समाजातील सामाजिक कार्यकर्ते, संस्था, औद्योगिक संस्था, संघटना यांना क्षयरुणांना पोषण आहार देण्यासाठी ‘निक्षय मित्र’ म्हणून पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांकडून प्रतिसाद मिळत आहे. क्षयरुग्णांना मदत करण्यासाठी ज्या संस्था व व्यक्ती पुढे येतात आणि सहाय्य करतात त्यांना ‘निक्षय मित्र’ म्हटले जाते. दानशूर व्यक्तींनी क्षयरुग्णांना मदत करण्यासाठी पुढे येवून सामाजिक बांधिलकी जपत क्षय रुग्णांचे ‘निक्षय मित्र’ व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे