शेतकरी हिताच्या निर्णयामूळे कृषी क्षेत्राला संजीवनी ..वर्षभरात कोटयवधी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात.. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे मनोबल उंचावले




शेतकरी हिताच्या निर्णयामूळे कृषी क्षेत्राला संजीवनी

वर्षभरात कोटयवधी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे मनोबल उंचावले

        वाशिम, दि. 06 (जिमाका) :  शेतकरी सुखी तर राज्य सुखी या उक्तीप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वातील गतीमान सरकारने नेहमीच शेतकरी हिताचे धोरण अवलंबिले आहे. अनेक लोककल्याणकारी योजना राबवून शेतीचा पोत आणि प्रत सुधारण्यासाठी सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांमुळे बळीराजाला मोठा हातभार मिळत आहे. कितीही संकटे आली तरी शेतकरी नेटाने उभा राहीला आहे. कारण त्याच्या पाठीशी राज्यातील गतीमान सरकार भक्कमपणे उभे आहे. परंतू वर्षभरात निसर्गाच्या अवकृपेमूळे अनेक ठिकाणी अवकाळी पाउस, वादळी वारा आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले. शेतकरी राजा हताश झाला. परंतू राज्यातील सरकारने शेतकऱ्यांचे अश्रृ पुसून त्यांना उभारी देण्यासाठी कोटयवधी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर जमा केला आणि उर्वरित शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर जमा करण्याचे काम मोठया वेगाने सुरु आहे. यामूळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत असून शेतकरी अधिक जोमाने खरीपाच्या पेरणीत व्यस्त झाला आहे.

           जुन ते जुलै २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे १२9७.७२ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने ५ हजार ८५६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १ कोटी ७६ लाख ५१ हजार ६७२ रुपयांच्या अनुदानाची गरज होती. शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने तातडीने सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात थेट जमा केली. ऑगस्ट २०२२ मध्ये पुन्हा शेतकऱ्यावर नैसर्गिक संकट ओढवले. अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने १ लाख ४३ हजार ६३६.५३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याने १ लाख ६६ हजार ७८६ शेतकरी बाधित झाले. याकरीता १९५ कोटी ४७ लाख ३२ हजार ५५२ रुपयाच्या अनुदानाची गरज होती. त्याकरीता १९५ कोटी ४७ लाख ३३ हजार रुपयाचे अनुदान सरकारकडून प्राप्त झाले. प्राप्‍त अनुदानापैकी 177 कोटी 48 लाख 47 हजार 740 बाधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. उर्वरित निधीची मागणी करण्यात आली आहे.

           सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १९४७९.९१ हेक्टर क्षेत्र बाधीत होऊन २७ हजार ६३० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नुकसानीपोटी २६ कोटी ५१ लाख २५ हजार ८४६ रुपये अनुदानाची आवश्यकता होती. शेतकऱ्यांना मदतीत कमतरता भासू नये याकरीता २६ कोटी ५१ लाख २८ हजार रुपयाचे १५ डिसेंबर २०२2 रोजी अनुदान प्राप्त होताच ऑनलाईन वाटप करण्यात आले. ऑक्टोंबर २०२२ मध्ये पुन्हा अतिवृष्टी झाल्याने २४०७४.०८ हेक्टर क्षेत्रावरील शेत पिकांचे नुकसान झाले. यामध्ये ३१ हजार ९४५ शेतकऱ्यांवर संकट ओढवले परंतू राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी प्रयत्न केले आणि २३ नोव्हेंबर २०२२ रोजी ३२ कोटी ७७ लाख ३१ हजार 768 रुपये अनुदानाची आवश्यकता असतांना राज्य सरकारने 32 कोटी 77 लाख 31 हजार रुपये अनुदान उपलब्ध करुन दिले. उपलब्ध अनुदानाचे ऑनलाईन वाटप करण्यात आले.

           मार्च २०२३ मध्ये अवेळी पाऊस झाल्यामूळे शेत पिकांचे १६७४.६७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याने २ हजार ५७२ शेतकरी बाधीत झाले. शेतकऱ्यांना अनुदानाकरीता २ कोटी ८५ लाख ९९ हजार ४१५ रुपयाची गरज होती. त्यापैकी २ कोटी ८५ लाख ९९ हजार रुपयाचे अनुदान १० एप्रिल २०२३ रोजी प्राप्त होताच ऑनलाईन पध्दतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप करण्यात आले. एप्रिल २०२३ मध्ये पुन्हा अवेळी पावसामुळे ३४१३.१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान होऊन ५ हजार ६८० शेतकरी बाधीत झाले. अनुदानाकरीता ५ कोटी ९२ लाख ८७ हजार ७५५ रुपयाची गरज होती. त्यापैकी ७७ लाख ९० हजार ३२० रुपयाचे अनुदान प्राप्त झाले. उर्वरित कमी पडलेले ५ कोटी १४ लाख ९७ हजार ४३५ रुपये अनुदान कमी पडले होते. लगेच उर्वरित कमी पडलेल्या अनुदानाची मागणी करण्यात आली. अनुदान प्राप्त होताच उर्वरीत अनुदान शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. मे २०२३ मध्ये अवेळी झालेल्या पावसामुळे ८१.६९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्यामूळे २०६ शेतकरी बाधीत झाले. त्याकरीता १४ लाख ६३ हजार ७६० रुपयाच्या अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.

           जुन ते जुलै २०२२ मध्ये सततच्या पावसामुळे शेती पिकांचे ३३ टक्केपेक्षा कमी जास्त नुकसान झाल्याने २२६६४.२5 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान होऊन २८ हजार 8०७ शेतकरी बाधित झाले. त्याकरीता ३० कोटी ८२ लाख ३३ हजार ८०० रुपयाच्या अनुदानाची गरज असून अनुदान प्राप्त होताच अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. तर ऑक्टोंबर २०२२ मध्ये सततच्या पावसामुळे २९४६३.८३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ३५हजार २४८ शेतकऱ्यांना ४ कोटी ०८ लाख ६५ हजार ६३८ रुपयाचे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमूळे केवळ पिकांचेच नुकसान झाले नाही तर घरे, जनावरे आणि मनुष्यहानी देखील झाली आहे. परंतू तेथेही राज्य सरकारकडून मदत करण्यात आली आहे. जुन ते ऑगस्ट २०२२ या तीन महिन्याच्या कालावधीत घरांची पडझड झाल्याने ७९ लाख ४४ हजार ९०० रुपयांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी १६ लाख ८० हजार रुपयाचे अनुदान प्राप्त झाले आहे. त्यामधून ७५००० रुपये खर्च झाले आहे. २६ लाख ४२ हजार रुपयांचे अनुदान कमी पडले असून १३ लाख ९५ हजार रुपये शिल्लक आहे.

           सन 2022 च्या पावसाळी हंगामातील अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत शासनास जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्तांमार्फत प्रस्ताव पाठविला होता. 13 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारीत दराने व निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला. याचा लाभ जिल्हयातील 63 हजार 716 शेतकऱ्यांच्या 47 हजार 29 हेक्टर बाधित क्षेत्राला होणार असून त्यासाठी 39 कोटी 98 लक्ष 49 हजार रुपये बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

            मार्च ते मे २०२३ मध्ये मृत पशुधनावर १ लाख ८ हजार ५०० रुपये अनुदानाची आवश्यकता असतांना तेवढेच अनुदान प्राप्त झाले आहे. त्यापैकी ९६ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. तर १२ हजार ५०० रुपये शिल्लक आहे. मार्च ते मे २०२३ या कालावधीत दोन व्यक्तींची मनुष्यहानी झाली. त्याकरीता ११ लाख ३३ हजार रुपयांचे अनुदानाची मागणी केली असता हे अनुदान प्राप्त झाले. त्यापैकी १० लाख २० हजार रुपये अनुदानाचे वितरण करण्यात आले. राज्यात शेतकऱ्यांवर जेव्हा जेव्हा संकट ओढवले तेव्हा तेव्हा राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहील. राज्य सरकारचे आर्थिक पाठबळ लाभत असल्यामुळे कितीही नैसर्गिक संकटे आली तरी शेतकऱ्यांचे मनोबल उंचावत आहे. बळीराजा शेतात घाम गाळून अन्नदाता बनला असल्यामूळे त्यांच्या संकटात राज्य सरकार देखील सहभागी होत असल्याची बाब नक्कीच स्वागतार्ह आहे. राज्य सरकारने केवळ पीकांच्या नुकसानीपोटीच मदतीचा हात पुढे केला नाही तर झालेल्या अवकाळी पावसात घरांची पडझड असेल, जनावरांचे नुकसान असो वा मनुष्यहानी राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरभरुन मदत दिली आहे. आणि यामुळे बळीराजा फिनिक्स पक्षाप्रमाणे नव्याने शेती कसण्यासाठी पुन्हा कंबर कसून उभा आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे