ॲड. संगीता चव्हाण यांची जिल्हा कारागृह व वसतीगृहाला भेट




ॲड. संगीता चव्हाण यांची

जिल्हा कारागृह व वसतीगृहाला भेट

        वाशिम, दि. 05 (जिमाका) : राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण हया 3 जुलै रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर आल्या असता त्यांनी वाशिम जिल्हा कारागृह, समाज कल्याणचे मुलींचे वसतीगृह आणि आदिवासी विकास विभागाच्या मुलींच्या वसतीगृहाला भेट दिली.

        जिल्हा कारागृहाच्या भेटीप्रसंगी ॲड.श्रीमती चव्हाण यांचे कारागृह अधिक्षक प्रदीप इंगळे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी कारागृहाचे जेलर गिरीधर गिरासे व वरिष्ठ तुरुंग अधिकारी ए.एल.आगासे प्रामुख्याने उपस्थित होते.

      यावेळी ॲड.श्रीमती चव्हाण यांनी कारागृहातील महिला विभागाला भेट देवून महिला बंदयाशी चर्चा करून आस्थेवाईकपणे त्यांची विचारपूस केली. कोणत्या घटनेमुळे आपणाला तुरुंगवास भोगावा लागत आहे, याची माहिती त्यांनी महिला बंदयाकडून घेतली. तुरुंगात मिळणारे भोजन, नास्ता, स्वच्छता व पिण्याचे पाणी याबाबत विचारपूस केली. आरोग्याची काळजी तुरुंग प्रशासनाकडून व्यवस्थितपणे घेतली जाते का याबाबतची माहिती त्यांनी महिला बंदयांकडून घेतली.

            वाशिम शहरात असलेल्या समाज कल्याण विभागाच्या आर्थिकदृष्टया मागास मुलींच्या वसतीगृहाला भेट दिली. यावेळी वसतीगृहाच्या गृहपाल श्रीमती लाकडे यांनी वसतीगृहात राहून शिक्षण घेत असलेल्या मुलींना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. वसतीगृहात मुलींसाठी जीमची सुविधा बघुन ॲड. श्रीमती चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले. वसतीगृहात उपलब्ध असलेलल्या ई-लायब्ररीचा जास्तीत जास्त मुलींना शिक्षणासाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयोग करण्यास वसतीगृह अधीक्षकाने प्रोत्साहन द्यावे. असे त्यांनी गृहपाल श्रीमती लाकडे यांना सांगितले. यावेळी त्यांनी वसतीगृहातील स्वयंपाकगृह व मुलींच्या निवासी खोल्यांना भेट दिली व उपस्थित मुलींशी संवाद साधून वसतीगृहात मिळणाऱ्या सुविधांबाबत आपण समाधानी आहात का याबाबतची माहिती घेतली. मुलींना आवश्यक त्यावेळी सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन द्यावे.मुलींचे शौचालय व स्नानगृह कायम स्वच्छ ठेवण्याकडे गृहपाल यांनी लक्ष द्यावे. तसेच त्या भविष्यात चांगले अधिकारी बनतील यासाठी त्यांना आतापासून स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यास मदत करावी. असे त्या यावेळी म्हणाल्या.

          आदिवासी मुलींच्या वसतीगृहाला देखील ॲड.श्रीमती चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे सहायक प्रकल्प अधिकारी प्रदीप नाईक व वसतीगृहाच्या गृहपाल श्रीमती देशमुख प्रामुख्याने उपस्थित होत्या. वसतीगृहातील मुलींच्या बॅंक खात्यावर भोजनाची रक्कम जमा करण्यात येत असल्यामुळे त्यांना टिफीनच्या माध्यमातून भोजन उपलब्ध होते. मुलींच्या आरोग्याची तसेच वसतीगृहाच्या स्वच्छतेकडे पुर्णता लक्ष देण्यात येत असल्याचे श्रीमती देशमुख यांनी सांगितले.

            ॲड. श्रीमती चव्हाण यांनी वसतीगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या आरोग्याकडे व शिक्षणाकडे दुर्लक्ष होणार नाही याकडे गृहपाल यांनी लक्ष द्यावे असे सांगितले. वसतीगृहात राहून चांगले शिक्षण घेवून ह्या मुली शासनाच्या विविध विभागात नोकरीत लागल्या पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी वसतीगृहातील मुलींशी संवाद साधून निवास खोल्यांची पाहणी करुन काही उपयुक्त सूचना गृहपाल यांना केल्या.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे