पावसामुळे ६६४३ हेक्टरवरील पिके बाधित ६ व्यक्तींचा वीज पडून व पुरात वाहून मृत्यू
पावसामुळे ६६४३ हेक्टरवरील पिके बाधित
६ व्यक्तींचा वीज पडून व पुरात वाहून मृत्यू
वाशिम दि २१( जिमाका) जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६६४३.५ हेक्टरवरील शेत पिके बाधित झाली आहे.तर १ एप्रिल ते १९ जुलै दरम्यान सहा व्यक्तींचा अंगावर वीज पडून, पुरात पाहून गेल्याने आणि प्रवासी निवारा अंगावर पडल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या.
५ जुलै रोजी आलेल्या पावसाने कारंजा तालुक्यातील येवती येथील दोन हेक्टरवरील कपाशी व सोयाबीनची, १२ जुलै रोजी उंबरडा बाजार व येवता येथील ३६ हेक्टरवर असलेल्या कपाशी,तूर व सोयाबीन, १४ ते १७ जुलै रोजी मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील १११ हेक्टरवरील तूर,सोयाबीनचे मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी(ताड) येथे ३४० हेक्टरवरील तूर व सोयाबीनचे,१८ जुलै रोजी कारंजा तालुक्यातील खिर्डा(बु) आणि पोहा येथील ४३११ हेक्टर असलेल्या तूर,सोयाबीन,कापूस,उडीद व मूग मंगरूळपीर येथील १४६३ हेक्टर आणि १९ जुलै रोजी कारंजा येथील ३३५ हेक्टर आणि मालेगाव तालुक्यातील वाडी (रामराव) व पिंपळशेंडा येथील ४५ हेक्टर असे एकूण ६६४३.५ हेक्टरवरील तूर व सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे.
संततधार पावसामुळे कारंजा तालुक्यातील खिर्डा व पोहा येथील १३.८ हेक्टर आणि मालेगाव येथील पाच हेक्टर अशी एकूण १९.१ हेक्टर शेत जमीन खरडून गेली.
एक एप्रिल ते १९ जुलै दरम्यान आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ६ व्यक्तींचा मृत्यू झाला यामध्ये वाशिम तालुक्यातील कोंडाळा (झांबरे) येथील ज्ञानेश्वर इंगोले, रिसोड तालुक्यातील भर जहागीरच्या संदीप काळदातेचा आणि मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी येथील निवास कदमचा वीज पडून,येवताच्या विष्णू हागोणेचा,कारंजा तालुक्यातील विळेगाव येथील ज्ञानेश्वर राठोड याचा नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने आणि १९ जुलै रोजी मंगरूळपीर तालुक्यातील धोत्रा येथील प्रवासी निवाऱ्यात उभे असलेल्या देवाजी ठोंबरेचा अंगावर प्रवासी नवरा पडल्याने त्याखाली दबून मृत्यू झाला.
Comments
Post a Comment