गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ..145 तलावातील 15 लक्ष घ.मी.गाळ 928 हेक्टर क्षेत्रात पसरविला..1 अब्ज 50 कोटी 93 लक्ष लिटर पाणी साठणार..




गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार

145 तलावातील 15 लक्ष घ.मी.गाळ 928 हेक्टर क्षेत्रात पसरविला

1 अब्ज 50 कोटी 93 लक्ष लिटर पाणी साठणार

        वाशिम, दि. 06 (जिमाका) : दिवसेंदिवस शेतीत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या रासायनिक खताच्या वापरामुळे शेतीची सुपिकता कमी होत आहे. पारंपारीक पाणीसाठे असलेल्या तलाव व धरणात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ शेतात टाकून शेतीची उत्पादकता टिकविण्यासोबतच ती वाढविण्यासाठी सोबतच या पारंपारीक पाणीसाठ्यात वाढ करण्यासाठी गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार ही योजना वाशिमसारख्या मागास जिल्हयासाठी उपयुक्त ठरत आहे. या योजनेतून यावर्षी जिल्हयातील 145 तलावातून 15 लक्ष 9 हजार 312 घनमीटर गाळ काढण्यात येवून तो शेतकऱ्यांच्या 928 हेक्टर क्षेत्रावर टाकण्यात आल्यामुळे शेतीची उत्पादकता तर वाढण्यास मदत होणार आहेच सोबतच या तलावात 1 अब्ज 50 कोटी 93 लक्ष 12 हजार लिटर पाणी साठवण क्षमतेपेक्षा जास्त पाणी साठणार आहे.

          जिल्हयात 26 जून 2023 पर्यंत निती आयोगाच्या माध्यमातून 79 लहाने मोठ्या तलावातून 6 लक्ष 72 हजार 784 घनमीटर गाळ काढण्यात आला. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतून 25 कामे पूर्ण करण्यात आली. यामधून 6 लक्ष 66 हजार 497 घनमीटर गाळ काढण्यात आला. शेतकऱ्यांनी 21 तलावातून लोकसहभाग व स्वखर्चाने 56 हजार 793 घनमीटर गाळ उचलून आपल्या शेतात टाकला. ही कामे जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडून करण्यात आली आहे.

            गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून 9 मोठ्या तलावातील 89 हजार 120 घनमीटर गाळ काढून लाभधारक शेतकऱ्यांनी शेतात पसरविला. लोकसहभाग/ स्वखर्चाने 11 तलावातून 24 हजार 118 घनमीटर गाळ काढला. राज्य शासनाचा मृद व जलसंधारण विभाग आणि जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार योजना आणि निती आयोगाच्या माध्यमातून जिल्हयातील 145 तलावातील 15 लक्ष घनमीटरपेक्षा जास्त गाळ काढून शेतात पसरविल्यामुळे या शेतीचे उत्पन्न तर वाढणार आहेच ज्या 145 तलावातून गाळ काढण्यात आला आहे, त्या तलावात 1 अब्ज 50 कोटी 93 लक्ष लिटरपेक्षा जास्त पाणी साठणार असल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. तसेच या पाण्याचा उपयोग वन्यजीवांसाठी तर होणार आहेच सोबतच तलाव परिसरातील शेतकऱ्यांना काही काळासाठी संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण होण्यास देखील मदत होणार आहे.

           जिल्ह्याचे पर्जन्यमान कमी असल्यामुळे आणि जिल्हयातील बहूतांश शेतकरी हे कोरडवाहू पध्दतीने शेती करीत असल्यामुळे गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न शेतात गाळ टाकल्यामुळे वाढणार आहे. तलाव व धरणातील गाळ काढल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठवण होणार आहे.

*******

 


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे