तृतीयपंथीयांसाठी काम करण्यास इच्छुक स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविले





तृतीयपंथीयांसाठी काम करण्यास इच्छुक

स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविले

        वाशिम, दि. 20 (जिमाका) : तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करणेबाबतचा मुद्दा तिसऱ्या महिला धोरणामध्ये समाविष्ट आहे. तृतीयपंथीय/ट्रान्सजेंडर हा समाजातील एक दुर्लक्षित घटक आहे. या घटकास समाजाकडून सापत्न व भेदभावाची वागणूक दिली जाते. नेहमीच भेदभाव,सापत्न वागणुकीमुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रियेपासून दुर्लक्षित राहिलेला आहे. त्यामुळे या समाज घटकांचे शासनामार्फत मुलभूत अधिकारांचे संरक्षण करुन त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

          तृतीयपंथीय/ट्रान्सजेंडर यांना कायद्याने निश्चित अशी ओळख/स्थान मिळवून देणे,त्यांना सामाजिक संरक्षण प्राप्त करुन देणे, तृतीयपंथीयांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होवू नये. यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देवून त्यांचा आर्थिक व सांस्कृतिक विकास घडवून आणणे. त्यासाठी संघटित प्रयत्न करणे तसेच या समाज घटकांची सर्वांगिण उन्नती व्हावी, त्यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणले जावे. याकरीता तृतीयपंथीय व्यक्तींच्या कल्याणाच्या प्रयोजनासाठी इच्छूक असणाऱ्या स्वयंसेवी संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

          जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींचे सर्व्हेक्षण करणे/नोंदणी करणे तसेच जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची यादी, नाव व पत्त्यांसह उपलब्ध करुन देणे. तृतीयपंथीय नागरिकांना प्रमाणपत्र /ओळखपत्र जारी करण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाने विकसीत केलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म (transgender.dosje.gov.in) चा वापर करुन सदर यादीतील तृतीयपंथीय यांना विहीत नमुन्यात प्रमाणपत्र/ओळखपत्र देणे यासाठी विशेष शिबीर आयोजित करणे, तृतीयपंथी व्यक्तींना रेशनकार्ड प्राप्त होण्याच्या अनुषंगाने मदत करणे, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सहकार्याने मोहिम राबविणे, तृतीयपंथीय नागरिकांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शक सुचना लक्षात घेवून विशेष शिबीर आयोजित करणे/ मोहिम राबविणे यासाठी विविध सरकारी विभागांच्या कार्यालयामध्ये व अन्य वर्दळीच्या ठिकाणी जागरुकता कार्यक्रम आयोजित करणे/प्रचार प्रसिद्धीचे कार्यक्रम आयोजित करणे, जाणीव- जागृती कार्यशाळा आयोजित करणे, तृतीयपंथीयांसाठी आरोग्य शिबीरांचे आयोजन करणे, तृतीयपंथी व्यक्तींसाठी स्वयंरोजगार मेळावे आयोजित करणे, व्यावसायीक प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे व तृतीयपंथी व्यक्तींसाठी कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन केंद्र सुरु करणे आदी कामे करणे अपेक्षित आहे.

          तरी तृतीयपंथीयांसाठी कल्याणकारी कामे करण्यास इच्छूक असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी तृतीयपंथीयांच्या कल्याणकारी योजनांतर्गत राबविलेले उपक्रम तसेच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची छायाचित्र/ पुरावे आदी कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,वाशिम येथे तात्काळ सादर करावे. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त, मारोती वाठ यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे