पीक नुकसानीचे व जमीन खरडून गेल्याचे पंचनामे तातडीने करा -पालकमंत्री संजय राठोड .. नुुकसानीचा एकत्रित प्रस्ताव सादर केल्यास निश्चितच निधी उपलब्ध करुन देवू -अनिल पाटील.. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा 29 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज





पीक नुकसानीचे व जमीन खरडून गेल्याचे

पंचनामे तातडीने करा

                                                         -पालकमंत्री संजय राठोड

नुकसानीचा एकत्रित प्रस्ताव सादर केल्यास

निश्चितच निधी उपलब्ध करुन देवू

                                                         -अनिल पाटील

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा

29 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज

 

        वाशिम, दि. 23 (जिमाका) : जिल्हयात 19 आणि 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने मोठया प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच पिके असलेली जमीन देखील खरडून गेली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे आणि जमीन खरडून गेल्याचे पंचनामे यंत्रणांनी वस्तुनिष्ठ पध्दतीने तातडीने करावे. असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

            आज 23 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हयात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा आयोजित सभेत घेतांना पालकमंत्री श्री. राठोड बोलत होते. यावेळी मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस व सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम. यांची प्रमुख उपस्थिती होती.

           श्री. राठोड पुढे म्हणाले, ज्या गावातील पिण्याचे पाणी पुरामुळे दुषीत झाले आहे, त्याचे तातडीने निर्जंतुकीकरण करण्यात यावे. त्यामुळे जलजन्य साथीचे आजार टाळता येईल. ज्या जमिनी पुर्णत: खरडून गेल्या आहे, त्या जमिनीचे वेगळे सर्व्हेक्षण करण्यात यावे. त्यालाही मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे. अतिवृष्टी व पुरामुळे जिल्हयातील ज्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्याचे देखील सर्व्हेक्षण करुन प्रस्ताव पाठविण्यात यावा. त्यासाठी निधी उपलबध करुन देण्यात येईल. सर्व यंत्रणांनी पावसाळयाच्या दिवसात दक्ष राहून काम करावे. असे ते म्हणाले.

           श्री. पाटील म्हणाले, जिल्हयात अतिवृष्टीमुळे पीकांचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तसेच पुरामुळे शेतकऱ्यांची जमीन देखील खरडून गेली आहे. त्या नुकसानीचे पंचनामे करुन जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांमार्फत तातडीने मदत मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासनास पाठवावा. निश्चितपणे त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे तसेच जे अतिक्रमण करुन राहतात त्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांना देखील मदत देण्याचे धोरण ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

           जिल्हयातील काही सिंचन तलावांचे या अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. तसेच काही सिंचन प्रकल्प धोकादायक स्थितीत आहे, त्या तलावांची दुरुस्ती जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून करावी. असे सांगून श्री. पाटील म्हणाले, झालेल्या नुकसानीचे काळजीपूर्वक पंचनामे यंत्रणांनी करावे. ज्या शहरातील नाल्यांचे पाणी नागरीकांच्या घरात घुसले त्यामागची कारणे शोधून उपाययोजना कराव्यात. ग्रामीण भागातील ज्या रस्ते व पुलांचे नुकसान झाले असेल त्याचा एकत्रित आराखडा मदत व पुनर्वसन विभागाला सादर करावा. निश्चितपणे त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. ज्या गावातील पिण्याचे पाणी दुषीत झाले आहे त्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी. जी गावे नदी आणि नाल्याच्या काठावर आहे त्या काठावर संरक्षण भिंती उभारणे व आवश्यक ठिकाणी पुलाची निर्मिती करण्याचे प्रस्ताव तयार करुन शासनाकडे मान्यतेसाठी पाठवावे. सन 2022-23 मध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले. त्या नुकसानीचे 48 कोटी रुपये लवकरच जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देणार असल्याचे श्री. पाटील यावेळी म्हणाले.

           जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. जिल्हयातील 6 तालुक्यात एकूण 46 मंडळ असून 19 जुलैच्या अतिवृष्टीने 12 मंडळातील 52 गावे प्रभावित झाली. सर्वाधिक 37 गावे मंगरुळपीर तालुक्यातील 7 मंडळातील आहे. 22 जुलैच्या अतिवृष्टीने 5 मंडळातील 57 गांवे प्रभावित झाली. यामध्ये कारंजा तालुक्यातील 8 मंडळातील 23 गांवे आणि मानोरा तालुक्यातील 2 मंडळातील 34 गावांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

          23 जुलै रोजीच्या अतिवृष्टीने मानोरा तालुक्यातील 3 मंडळातील 78 गांवे आणि मंगरुळपीर तालुक्यातील एका मंडळातील 18 गावांचा समावेश असल्याचे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, 22 जुलै रोजी कारंजा तालुक्यतील हिवरा (लाहे), कामरगांव व खेर्डा मंडळात आणि मानोरा तालुक्यातील इंझोरी व उमरी मंडळात तर 19 जुलैच्या पावसाने वाशिम तालुक्यातील नागठाणा, मालेगांव तालुक्यातील शिरपूर व चांडस, मंगरुळपीर तालुक्यातील मंगरुळपीर, शेलुबाजार, पोटी, पार्डी, कवठळ व मानोरा तालुक्यातील इंझोरी मंडळात अतिवृष्टी झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

          21 जूनपासून ते 23 जुलैपर्यंत 2 व्यक्तींच्या अंगावर वीज पडून, 2 जणांचा पुरात वाहून व एका व्यक्तीच्या अंगावर प्रवाशी निवारा पडून त्याखाली दबून मृत्यू झाला. 5 पैकी 4 व्यक्तींच्या वारसांना मदत करण्यात आली असून एका व्यक्तीच्या वारसाला लवकरच मदत देण्यात येईल. 11 जनावरांचे मृत्यू झाले तर 365 घरांची पडझड झाली. जिल्हयात 3 मध्यम प्रकल्प असून त्यापैकी एकबुर्जी प्रकल्प 37.25 टक्के, सोनल प्रकल्प 100 टक्के आणि अडाण प्रकल्प 63.36 टक्के भरला असल्याची माहिती यावेळी श्री. षण्मुगराजन यांनी दिली.

           पुराचे पाणी ओसरल्यानंतर घराच्या व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांना दिले असल्याचे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, 5 जुलै ते 21 जुलैपर्यंत जिल्हयात कापूस, सोयाबीन या पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे अंदाजे 29 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.

           सभेला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, सखाराम मुळे, मृद व जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, लक्ष्मण मापारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय गोरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेश चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) दिगांबर लोखंडे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांचेसह सर्व तहसिलदार व सर्व नगर पालिका व नगर पंचायतचे मुख्याधिकारी उपस्थित होते. सभेचे संचालन व उपस्थितांचे आभार आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी मानले.   

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे