मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम :नाव व फोटोबाबत मतदारांनी खात्री करावी




मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम

नाव व फोटोबाबत मतदारांनी खात्री करावी

        वाशिम, दि. 17 (जिमाका) : निवडणुक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत १९ जुलै २०२३ पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे ऑनलाईन मतदार नोंदणीबाबत नविन सॉफ्टवेअर हाताळण्याचे प्रशिक्षण नियुक्त पर्यवेक्षकामार्फत देण्यात येणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत घरोघरी जावून मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत करण्यात येणार आहे.

           मतदारांनी मतदार यादीतील आपले नांव व फोटो व्यवस्थित असल्याची खात्री करुन घ्यावी. मतदारांचे अस्पष्ट/ खराब फोटो बदलणे, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरणची कार्यवाही २२ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत करण्यात येणार आहे.

            १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचे पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नाव समाविष्ट/ वगळणी करण्यासाठी प्राप्त झालेले अर्ज निकाली काढण्यात येवून ३० सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मतदारांची पूर्ण यादी तयार करण्यात येणार आहे.

           पूर्व पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी १७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. याबाबत आक्षेप/ हरकती दाखल करण्यासाठी १७ ऑक्टोबर २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२३ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. प्राप्त दावे/ हरकती हया २६ डिसेंबर २०२३ पर्यंत निकाली काढण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२४ रोजी जे मतदार वयाचे १८ वर्षे पूर्ण करणार असतील, अशा मतदारांची अंतिम मतदार यादी ५ जानेवारी २०२४ रोजी संबंधित मतदान केंद्रावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

           तरी आवश्यक पुराव्यासह नमुना ६ चा अर्ज भरुन आपल्या गावासाठी/ क्षेत्रासाठी नियुक्त असलेल्या मतदान केंद्राच्या संबंधित बि.एल.ओ.कडे द्यावे किंवा ऑनलाईन पध्दतीने http://www.nvsp.in या वेबसाईटवर किंवा Voter helpline अँपच्या माध्यमातून आपल्या नावाची मतदान नोंदणी करावी. असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा वाशिम-मंगरुळपीरचे उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे आणि तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी गजेंद्र मालठाणे यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे