शोध मोहिमेतून शोधणार सक्रीय क्षयरुग्ण मोहिमेस नागरीकांनी सहकार्य करावे आरोग्य विभागाचे आवाहन



शोध मोहिमेतून शोधणार सक्रीय क्षयरुग्ण

मोहिमेस नागरीकांनी सहकार्य करावे

आरोग्य विभागाचे आवाहन

       वाशिम, दि. 03 (जिमाका) : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम ३ ते १२ आक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये अतिजोखमीच्या भागात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या घरी येणाऱ्या पथकास घरातील सर्व सदस्यांची तपासणी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे. या मोहिमेकरीता १३३ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याद्वारे शहरी भागातील ३६ हजार ९५० व ग्रामीण भागातील १ लक्ष १३ हजार ७६ लोकसंख्येच्या घरांना भेटी देऊन १ लक्ष ५० हजार २६ लोकसंख्येची या पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे.

         या तपासणीमध्ये क्षयरोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांचे समुपदेशन पथकातील आशा स्वयंसेवीकांमार्फत करून या संशयीत क्षयरुणांची मोफत थुंकी तपासणी व मोफत एक्स-रे तपासणी जवळच्या शासकीय दवाखान्यात करण्यात येणार आहे. यामधून क्षयरोगाचे निदान झालेल्या क्षयरुणांना त्वरीत मोफत औषधोपचार सुरू करण्यात येतील. निदान झालेल्या क्षयरुणांना केंद्र शासनामार्फत त्यांचे उपचार सुरू असेपर्यंत त्यांच्या बँक खात्यात दरमहा ५०० रुपये निक्षय पोषण योजनेंतर्गत पोषण आहारासाठी देण्यात येतात.

          या मोहिमेत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात निदान व उपचार सुविधा पुरविण्यात येणार आहे. तसेच प्रधाममंत्री क्षयरोग मुक्त कार्यक्रमांतर्गत समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, (निक्षय मित्र) यांच्या वतीने क्षयरुग्णांना मोफत शिधा वाटप करण्यात येतो यासाठी देखील नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवून क्षयरोग मुक्त भारत करण्यासाठी हातभार लावावा. तपासणी मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी मोहिमेदरम्यान गृहभेटी करीता येणाऱ्या आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करावे.                

           क्षयरोगाची लक्षणे -दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा खोकला, दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा ताप, वजनात लक्षणीय घट होणे, भूक मंदावणे, मानेवर गाठी येणे व थुंकीद्वारे रक्त पडणे अशा प्रकारची लक्षणे असलेल्या संशयित क्षयरुग्णांनी स्वतःहून पुढे येऊन तपासणी करून घ्यावी. असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश परभणकार यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे