महिलांच्या अडचणी दूर करणार -अध्यक्षा रुपाली चाकणकर“महिला आयोग आपल्या दारी” चा आढावा
- Get link
- X
- Other Apps
महिलांच्या अडचणी दूर करणार
“महिला आयोग आपल्या दारी” चा अढावा
वाशिम, दि. 13 (जिमाका) : महाराष्ट्र हे मिसींग केसेसमध्ये देशात प्रथम क्रमांकावर आहे. आपल्या दुर्लक्षपणामुळेच या घटना घडत आहे. आपण कुठे चुकतो आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे. त्रृटी भरुन काढण्यासाठी महिला आयोगाला कळविल्यास महिला आयोग पूर्णपणे मदत करेल. अशी ग्वाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
11 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या आयोजित आढावा सभेत श्रीमती चाकणकर बोलत होत्या. यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.जी.बी. गवलवाड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बाळासाहेब सुर्यवंशी व उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती चाकणकर म्हणाल्या, यंत्रणांनी जिल्हयात बालविवाह होणार नाही याकडे विशेष लक्ष दयावे. पोलीस विभागाने सरपंच व पोलीस पाटील यांची बैठक घेवून त्यांना निर्देश द्यावे.जर बालविवाह झालाच तर सरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व पोलीस पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करावे. शहरी भागात धर्मदाय आयुक्त, प्रिटींग प्रेस व मंगल कार्यालयांना सूचना द्याव्यात. यांचेकडून बालविवाह होता कामा नये. या ठिकाणी जर बालविवाह झालाच तर त्यांच्यावर कारवाई करावी. प्रत्येक विभागात महिला कर्मचारी कार्यरत आहे. महिला आयोग आपल्या दारीच्या माध्यमातून महिलांच्या अडचणी दूर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती चाकणकर पुढे म्हणाल्या, राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथील बांद्रा येथे कार्यरत आहे. न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील कानाकोपऱ्यातील पिडीत महिलांना या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन तक्रार करणे शक्य होत नाही. यासाठी राज्य महिला आयोग राज्यातील प्रत्येक जिल्हयात प्रत्यक्ष जावून महिलांची समस्या सोडविण्याचे काम करीत आहे. तुळशी विवाहानंतर बालविवाहाचे प्रमाण वाढतात. बालविवाहाला प्रतिबंध करण्याची चळवळ सुरु ठेवणे महत्वाचे आहे. शाळेतील मुलींना विवाह करण्याचे वय किती असावे याबाबत माहिती द्यावी. जर मुलींचे बालविवाह होत असेल तर मुलींनी न घाबरता संबंधितांविरुध्द तक्रार दाखल करावी. जिल्हयात महिला ऊसतोड कामगार किती आहे त्याची टक्केवारी काढावी. शासकीय व खाजगी रुग्णालयात प्रत्यक्ष जावून स्त्रीभ्रूण हत्या होत आहे का याबाबतची माहिती घ्यावी. जर त्याठिकाणी स्त्रीभ्रूण हत्या होत असेल तर दोषींवर तात्काळ कार्यवाही करावी. माविमच्या माध्यमातून बचतगटांचा मेळावा घेवून या उपक्रमात त्यांना सहभागी करुन घ्यावे. जिल्हयात पिडीत महिलांसाठी स्वाधारगृह व वसतीगृह महत्वाचे असल्याने त्यासाठी संबंधितांनी प्रस्ताव सादर करावा. लोकांना तक्रार दाखल करण्यासाठी तक्रार निवारण समिती आवश्यक आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेनी रुग्णालयात तक्रार निवारण समिती गठीत करावी. तसेच रुग्णालयात मिळणाऱ्या सोयी-सुविधांविषयी तपासणी करण्याबाबत सूचनाही श्रीमती चाकणकर यांनी यावेळी दिल्या.
प्रास्ताविकातून श्री.गवळी यांनी जिल्हयात राबविण्यात येत असलेल्या मिशन वात्सल्य योजना, अंतर्गत तक्रार निवारण समिती, बालविवाहबाबत प्राप्त तक्रारी, नैसर्गिक आपत्ती विभाग व कृषी विभागाच्या वतीने आत्महत्या शेतकरी कुटूंब व त्यांच्याकरीता राबविण्यात आलेल्या योजना, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना देण्यात आलेला लाभ, महिला ऊसतोउ कामगारांचे प्रश्न व त्यांच्यासाठी घेण्यात आलेले शिबीर, पीसीपीएनडीटी अंतर्गत दाखल झालेल्या तक्रारी, आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या महिलांना देण्यात आलेले व्यावसायीक प्रशिक्षण व त्यांना दरमहा देण्यात आलेले विद्यावेतन, मनोधैर्य योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्यात आलेली माहिती, माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मुलींच्या प्रगत भविष्यासाठी आर्थिक तदतुद करण्यात आलेली माहिती, पुरग्रस्त व दुष्काळग्रस्त महिलांना देण्यात आलेला लाभ, सरकारी कामगार अधिकारी यांचेकडून राबविण्यात येत असलेल्या योजना, आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येत असलेल्या योजनाचा लाभ, शिक्षण विभागाकडून जिल्हयात कार्यरत असलेल्या मुलींच्या शाळेची आणि राज्य परिवहन विभागाकडून महिलांना पुरविण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची माहिती यावेळी दिली. सभेला जिल्हयातील विविध विभागाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment