आपत्तीवर मात करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा मोलाचा वाटा अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार एकदिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

आपत्तीवर मात करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा मोलाचा वाटा

                                                                  
                          अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार

एकदिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

       वाशिम, दि. 06 (जिमाका) :  जिल्हा हा आपत्तीच्या दृष्टिने संवेदनशील नाही. जिल्हयात कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आजपर्यंत आलेली नाही. परंतू भविष्यात येणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी आपणा सर्वांना सज्ज रहावे लागणार आहे. आपत्तीच्यावेळी लोकांचे जीव कसे वाचविता येईल यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून प्रशिक्षण दिले जाते. ज्याठिकाणी आपत्ती येते अशा ठिकाणी या दलाच्या वतीने माणसाचे जीव वाचविण्याचे काम केले जाते. आपत्ती व्यवस्थापनात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा मोलाचा वाटा आहे. असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी केले.

           आपत्तीला तोंड देण्यासाठी पूर्वतयारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या संयुक्त वतीने या तंत्रशुध्द प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री.पवार अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

           आज 6 ऑक्टोबर रोजी वाशिमला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणाच्या उद्यानात मॉक ड्रिल ॲन्ड फ्लड एक्जरसाईज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) कैलास देवरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस निरीक्षक ब्रिजेशकुमार यादव, प्रा.डॉ.शैलेश सोनुने, पोलीस निरीक्षक देविदास झुगे, पोलीस निरीक्षक श्रीमती इंगळे, श्री.मेसरे, श्रीमती कुंभरे, श्री.खंडारे, प्रा.इंगोले, प्रा.सांडसकर, श्रीमती राऊत, श्री.नफते, गजानन मेसरे व स्वप्नील काळबांडे यांची उपस्थिती होती.

           श्री. भगत म्हणाले,सन 2005 या वर्षी आपत्ती व्यवस्थापन कायदा अस्तित्वात आला. यात पुलाची उभारणी करणे, पुलाची उंची वाढविणे अशाप्रकारच्या खूप मोठया तरतूदी केल्या आहे. नदीकाठच्या गावांना पूर परिस्थितीमध्ये जास्त धोका असलेल्या गावांना पूर संरक्षण भिंती असणे आवश्यक आहे. या भिंतीची उभारणी लवकरच शासनाकडून उभारण्यात येणार आहे. यासाठी संबंधित विभागानी प्रस्ताव सादर करावे. आपत्तीच्या काळात मी फक्त माझ्यासाठीच नसून इतरांना मदत करु शकतो ही भावना आपल्या मनात असली पाहिजे. आपल्याला समाजासाठी काही तरी देणं लागते. समाजाचे ऋण फेडावे लागते. रस्ते अपघातात सेल्फीचा मोह टाळून त्या जखमी झालेल्या व्यक्तीला मदत करावी. संकटकाळी धावून जाणाऱ्यालाच खरी माणूसकी म्हटले जाते. शाळेत सेफ्टी कार्यक्रम महत्वाचा आहे. यासाठी विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.  

           श्री.ब्रिजेशकुमार म्हणाले, आपत्तीच्या काळात आपण स्वत: तयार असावे. आपल्यात कौशल्य असेल आपण सुरक्षित जीवन जगु शकतो आणि आपण इतरांचे जीवही वाचवू शकतो. कोणतीही आपत्ती ही जास्त वेळ राहत नाही. कमी वेळा पुरतेच राहते पण त्याच्या तिव्रतेनुसार नुकसान होते. आपत्तीच्या स्वरुपानुसार आपल्याला त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी त्यांची माहिती असावी. आपत्तीमध्ये कोणतीही मदत लवकर मिळणे शक्य नाही. अशावेळी काही वेळासाठी आपण स्वत: स्वत:ची मदत करावी. देशातच नाही तर पुर्ण विश्वात वेगवेगळया प्रकारच्या आपत्ती येत आहे. या आपत्तीत लोकांचे जीव वाचविण्यासाठी या दलाकडून काम केले जात आहे. परंतू हे दल काही प्रमाणात कमी पडत आहे. यासाठी केंद्रात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि जिल्हयाच्या ठिकाणी जिल्हा आपत्ती प्रतिसाद दल कार्यरत आहे. या दलाच्या माध्यमातून काही लोकांना समन्वयक म्हणून तयार करण्यासाठी या दलाच्या वतीने प्रशिक्षण दिले जाते. देशात 16 बटालियन तर राज्यात 5 बटालियन कार्यरत आहे. हे दल वेगवेगळया भागात काम करीत आहे. कोणत्याही आपत्तीला तोंड देण्याची क्षमता या दलात असल्याचे त्यांनी सांगितले. 

           श्री. गावंडे म्हणाले,अतिवृष्टी झाल्यामुळेच पूर येतो. ही अतिवृष्टी येणार असल्याची पूर्व कल्पना आपणाला प्रशासनाकडून दिली जाते. प्रशासनाकडून अतिवृष्टीची माहिती मिळताच आपण सुरक्षितस्थळी जावे. तसेच आजारी व्यक्तींनी आपली औषधी व महत्वाचे कागदपत्रे व जीवनावश्यक साहित्य घेवून ती जागा सोडून सुरक्षितस्थळी स्थलांतरीत व्हावे. प्रत्येक व्यक्तीला पोहता येणे आवश्यक आहे. पोहणे येत असल्यामुळे पूर परिस्थीतीमध्ये आपण स्वत: तर वाचू शकतोच परंतू इतरांचासुध्दा जीव वाचवू शकतो. ज्यांना पोहता येत नसेल त्यांनी घरीच थर्माकॉल व पाण्याच्या खाली बॉटलीपासून पूर परिस्थीतीमध्ये वापरण्यासाठी साहित्य तयार करावे. पूर परिस्थीतीमध्ये जोपर्यंत आपल्यापर्यंत प्रशासन अथवा हे दल पोहचत नाही. तोपर्यंत आपण या साहित्यामुळे आपला जीव वाचवू शकतो. तसेच पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला कसे वाचवावे. त्याला पाण्यातून बाहेर काढल्यावर काय उपचार करावा. याबाबतची माहिती त्यांनी यावेळी दिली.

           श्री. वाघमारे यांनी सांगितले की, साप हे वेगवेगळया प्रकारचे असतात. काही विषारी तर काही बिनविषारी असतात. विषारी साप चावला तर आपला जीव जातो. बिन विषारी सापामुळे आपल्याला काही होत नाही. विषारी सापाचे दोन दात असतात. आपल्याला जर साप चावला आणि त्याठिकाणी दाताच्या दोन खुना असतील तर तो साप विषारी आहे असे समजावे. अशावेळी घाबरुन न जाता तात्काळ दवाखान्यात त्या व्यक्तीला घेवून गेले पाहिजे. भोंदूबाबावर विश्वास ठेवू नये किंवा घरीच काही प्रयोग करु नये. तसेच सापाला घाबरु नये, साप हा शेतकऱ्यांचा मित्र असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

           यावेळी लाईफ जॅकेट, लाईकबॉय, इम्प्रोवाईज, फ्लोटिंग डिव्हाईस व आयआरबी बोटीविषयक माहिती प्रात्याक्षिकासह उपस्थितांना या दलाच्या वतीने देण्यात आली.  

           कार्यक्रमाला सहायक पुरवठा अधिकारी राजेश वजीरे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जैनुद्दीन शेख, विनोद गावंडे, हेड कॉन्सटेबल दिलीप राऊत, कॉन्सटेबल नारायण शिरसाठ, विनोद डोके, परशुराम साहू, प्रा.स्वप्नील काळबांडे, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातील विनोद मारवाडी, श्री.खंडारे, जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी,मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक, सरपंच, पोलीस पाटील, एनजीओ, होमगार्ड, पट्टीचे पोहणारे व्यक्ती, राजस्थान आर्य महाविद्यालय येत विद्यार्थी व विद्यार्थींनी, राऊत महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थींनी राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी व इतर विद्यार्थी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन राधिका दंडे या विद्यार्थीनीने केले तर उपस्थितांचे आभार आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी मानले. 

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे