पिडीत महिलांना न्याय देण्यासाठी महिला आयोग कटिबध्द - अध्यक्षा रुपाली चाकणकर जनसुनावणीत 54 तक्रारी प्राप्त


पिडीत महिलांना न्याय देण्यासाठी महिला आयोग कटिबध्द

                                                             - अध्यक्षा रुपाली चाकणकर

जनसुनावणीत 54 तक्रारी प्राप्त

       वाशिम, दि. 11 (जिमाका) :  शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारीत महिला आयोग आपल्या दारी म्हणून महिला आयोग थेट जिल्हयात दाखल झाला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हयातील कानाकोपऱ्यातून पिडीत महिलांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय दिला जाणार आहे. न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या महिलांचे प्रश्न सोडविण्यास महिला आयोग कटिबध्द आहे. असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केले.

          आज 11 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात आयोजित जनसुनावणी दरम्यान श्रीमती चाकणकर बोलत होत्या. यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती आभा पांडे,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,अपर पोलीस अधिक्षक भारत तांगडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय जोल्हे,जिल्हा महिला व बाल‍ विकास अधिकारी बाळासाहेब सुर्यवंशी,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधिक्षक श्री.भुरे व सामाजिक कार्यकर्त्या सोनाली ठाकूर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

          श्रीमती चाकणकर म्हणाल्या, राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथील बांद्रा येथे कार्यरत आहे. न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील कानाकोपऱ्यातील पिडीत महिलांना या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन तक्रार करणे शक्य होत नाही. यासाठी राज्य महिला आयोग राज्यातील प्रत्येक जिल्हयात प्रत्यक्ष जावून महिलांची समस्या सोडविण्याचे काम करीत आहे. आतापर्यंत 30 जिल्हयात या कार्यक्रमाचे आयोजन करुन महिलांच्या समस्या सोडविण्यात आल्या. वाशिम हा 31 वा जिल्हा आहे. न्यायालयातसुध्दा न सुटणाऱ्या महिलांच्या तक्रारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोडविण्यात येत आहे. समाजात बालविवाह, कौटूंबिक वाद, स्त्री भ्रूणहत्या, हुंडाबळी, कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा छळ, सायबर गुन्हेगारी, मानवी तस्करी अशा विविध प्रकारच्या तक्रारींची दखल घेवून त्याचे निराकरण महिला आयोग सातत्याने करीत आहे. राज्यात बालविवाहाचे प्रमाण कमी झाले पाहिजे. बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार ज्या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह होत असेल तर त्यांची रितसर तक्रार दाखल करावी. तक्रार दाखल न झाल्यास सरपंच,पोलीस पाटील, ग्रामसेवक,अंगणवाडी सेविका यांनाच दोषी माणून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

         श्रीमती चाकणकर पुढे म्हणाल्या,ही लढाई फक्त प्रशासनाचीच नसून समाजातील प्रत्येक व्यक्तीची आहे. शासन कायदे तयार करुन त्याची कठोर अंमलबजावणी करीत असते. पण शासनाने कठोर कायदे करायचे आणि आपण तितक्यात ताकदीने मोडायचे अशी स्पर्धा समाजात लागली आहे. समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. न्याय देतांना समोरची व्यक्ती,महिला कोण आहे हे न पाहता त्यांना योग्यप्रकारे न्याय द्यावा. संबंधित यंत्रणेकडून न्याय देतांना विलंब झाल्यास थेट आयोगाला कळवावे. असेही श्रीमती चाकणकर यांनी यावेळी सांगितले.

         श्रीमती पांडे म्हणाल्या,राज्य महिला आयोगाच्या स्थापनेपासून राज्यातील कानाकोपऱ्यात असलेल्या महिलांच्या समस्या सोडविण्याचे काम महिला आयोग करीत आहे. महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत महिलांच्या तक्रारी ऐकूण जनसुनावणीत निपटारा करण्यात येत आहे. सुनावणीत येणाऱ्या महिलांच्या अडचणी दूर करुन पती,पत्नी एकत्रित होण्यास मदत मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

         श्री.ठाकरे म्हणाले,शासन आपल्या दारी या उपक्रमाप्रमाणे महिला आयोग आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत महिला व मुलींच्या तक्रारी सोडविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पिडीत महिलांना फायदेशीर ठरणार आहे.त्यांच्या तक्रारी ऐकून याच ठिकाणी त्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

         सुनावणी दरम्यान कौटुंबिक वाद असणारे दांम्पत्यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांचे समुपदेश करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपसी सहमतीने आपल्या अपत्य व कुटूंबासाठी एकत्र होण्याचा निर्णय घेतला. यावेळी अशा दांम्पत्याचा श्रीमती चाकणकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले.

         तक्रारींमध्ये वैवाहिक व कौटुंबिक 35, सामाजिक 2,आर्थिक, मालमत्ताविषयक 3,आणि इतर 14 अशा एकूण 54 तक्रारी सुनावणीसाठी प्राप्त झाल्या. काही तक्रारींचे पिडीत दामप्त्यासमक्ष निराकरण करण्यात आले. उर्वरित तक्रारी संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आल्या.

         प्रास्ताविक परीविक्षाधिन अधिकारी गजानन पडघान यांनी केले. कार्यक्रमाला परिवीक्षाधिन अधिकारी गणेश ठाकरे,विधी स्वयंसेवक, विधी अधिकारी, समुपदेशक, जिल्हा संरक्षण अधिकारी, तालुका संरक्षण अधिकारी, समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी, स्वयंसेवी संस्था, महिला तक्रार निवारण कक्षातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह महिला व बाल विकास कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे